पाच वर्षांत मंजूर केलेल्या निविदा, केलेले करार, स्मार्ट सिटी कंपनीने केलेली कामे आदींची चौकशी करा- आ.डावखरे

 ठाणे :
निविदा प्रक्रिया न राबविता कंत्राटदारांना कामे देऊन जनतेचा कोट्यवधी रुपयांचा पैसा वाया घालवणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे,  आपला दवाखाना प्रकल्पावरून महापालिका प्रशासनाची बेफिकिरी उघड होत आहे. ठाणेकरांनी कररुपाने भरलेल्या पैशांची सत्ताधाऱ्यांकडून बेसुमार उधळपट्टी सुरू आहे,अशी टीका भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली आहे. आपला दवाखाना प्रकल्पाच्या कार्यादेशावरून उघड झालेला घोळ हे हिमनगाचे टोक आहे. महापालिकेत पाच वर्षांपासून अनेक गैरप्रकार घडल्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत मंजूर केलेल्या निविदा, महापालिकेने केलेले करार, स्मार्ट सिटी कंपनीने केलेली कामे आदींची चौकशी करावी. सामान्य करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या कामांचा सामान्य करदात्यांचा काय फायदा झाला, हे सत्ताधारी व महापालिका प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

दिल्लीतील `मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर `आपला दवाखाना’ प्रकल्प सुरू झाला. मात्र, जनसेवेच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करुन घेण्याचा उद्योग महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाचा होता. एकिकडे महापालिकेने ३७ वर्षांत केवळ २८ आरोग्य केंद्रे उभारली. तब्बल चार लाखांची लोकसंख्या असलेल्या दिवा परिसरात महापालिकेचे आरोग्य केंद्र नाही. त्यात सुविधांची वानवा असताना `आपला दवाखाना’द्वारे ५० दवाखाने कंत्राटदारामार्फत उघडून कंत्राटदाराला १६० कोटी दिले जाणार आहेत. आता तर निविदा प्रक्रियेत नसलेल्या कंपनीलाच कार्यादेश देण्याचा उद्योग महापालिका प्रशासनाने केला आहे, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेत कररुपाने पैसा जमा करणाऱ्या प्रामाणिक ठाणेकरांची ही फसवणूक आहे, अशी टीका आमदार डावखरे यांनी केली. या संदर्भात आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे.


दरम्यान दिव्यात रुग्णालयाच्या आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रार वारंवार केल्याने भाजप पदाधिका-यावर प्रशासनाने सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप भाजपाचे दिवा-शिळ मंडल अध्यक्ष आदेश भगत यांनी केला आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष निलेश पाटील यांच्यावर एमआरटीपी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा खोटा असल्याचा आरोप स्थानिक भाजप पदाधिका-यांनी केला आहे. दिव्यातील नागरिकांसाठी शासकीय रुग्णालय व्हावे, यासाठी भारतीय जनता पार्टी अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहे. रुग्णालयासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण प्रशासन पुढे करत असले तरी ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम सर्रास सुरू आहे. याविरुद्ध भारतीय जनता पार्टी दिवा विभागाने आवाज उठवल्याने सत्ताधारी पक्षाने पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपा पदाधिका-यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप आदेश भगत यांनी केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA