ठाणे महापालिकेचा अनियमित कारभार, विरोधी पक्षनेत्यांनी दाखल केली जनहित याचिका

प्रत्यक्ष महासभा घेण्याची  नगरसेवकांची मागणी

ठाणे,
 ठाणे महानगर पालिकेची वेबीनार पद्धतीने होणार्‍या महासभेमुळे अनेक नगरसेवकांना सभागृहात बोलणे शक्य होत नाही. किंवा, प्रभागातील अनेक समस्यांचा उहापोह होत नाही. या  वेबीनार महासभांमधील विषय घाईघाईत मंजूर करण्यात आले. कोणते विषय मंजूर झाले, ते बहूतांशी नगरसेवकांना समजले नाही. त्यामुळे विधीमंडळाच्या धर्तीवर नगरसेवकांची कोरोना चाचणी घेऊन गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महासभा भरवावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दरम्यान,  या जनहित याचिकेसोबतच आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही या संदर्भात पत्र दिले आहे, अशी माहिती शानू पठाण यांनी दिली.

कोरोनाचे कारण पुढे करुन प्रत्यक्ष महासभा न झाल्यामुळे ठाणे शहरातील अनेक महत्वांच्या विषयावर थेट चर्चाच होत नाही. या वेबीनार महासभेमधील इतिवृत्त योग्य पद्धतीने नगरसेवकांपर्यंत पोहचतच नाहीत. सर्वच नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्या मांडायच्या असतात. मात्र, इंटरनेटच्या असुविधेचे कारण पुढे करुन त्यांचा आवाज दाबला जात आहे. परिणामी, अनेक प्रभागातील समस्या-अडचणी चव्हाट्यावर येत नाहीत. महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगेन अगेनच्या धर्तीवर सर्वच व्यवहार सुरु झालेले आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्यामुळे महासभा आयोजित करणे शक्य आहे. त्यामुळे ठामपा प्रशासनाने सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करुन विधिमंडळाच्या धर्तीवर गडकरी रंगायतन किंवा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महासभा आयोजित करावी, अशी मागणी करणारी याचिका अ‍ॅड. सुहास ओक यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयानेही ही याचिका दाखल करुन घेतली असून जनहित याचिका क्रमांक 3450/2021 वर लवकरच सुनावणी घेतली जाणार आहे.  

या संदर्भात शानू पठाण यांनी, सध्या संसदेचे अधिवेशन सुरु आहे. संसदेच्या अधिवेशनामध्ये लोकसभेच्या सभागृहात साडेपाचशे तर राज्यसभेत अडीचशे खासदार उपस्थित रहात आहेत. तसेच, विधिमंडळाच्या अधिवेशनातही विधान परिषदेचे 78 अन् विधानसभेचे 289 सदस्य उपस्थित राहू शकत असतील तर ठामपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये 131 नगरसेवकांच्या उपस्थितीमुळेच कोरोना कसा वाढू शकतो? प्रत्यक्ष महासभा होत नसल्याने नगरसेवकांना आपल्या प्रभागातील समस्यांवर भाष्य करता येत नाही. त्यांना इतिवृत्ताबाबत साशंकता निर्माण होत आहे; अनेक नगरसेवकांना महासभेमध्ये बोलता येत नाही. या सर्व प्रकारामुळे प्रत्यक्ष महासभा होणे गरजेचे आहे. वेबीनार महासभेमुळे एवढ्या समस्या निर्माण होत असतानाही थेट महासभा घेण्यासाठी प्रशासनावर कोणाचा दबाव आहे, हे ठामपा प्रशासनाने जाहीर करावे,  असे म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA