Top Post Ad

सिध्दांर्थ लॅा कॅालेज डॉ.बाबासाहेबांनी काढले नसते तर मी न्यायमूर्ती झालो नसतो: जस्टीस पी.बी.सावंत

 सिध्दार्थ कॅालेज आता जिथेआहे , त्याठिकाणी नव्हते.चर्चगेट स्टेशनच्या समोर ईन्कम टॅक्स बिल्डींगआहे,त्याच्या पुढे म्हणजे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ठिकाणी ब्रिटीशांनी बॅरेक्स ऊभ्या केल्या होत्या,त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सकाळचे लॅा कॅालेज सुरू केले होते.जस्टीस पी.बी.सावंत यांची घरची परिस्थिती बेताचीच होती.त्यावेळी ते मेट्रो सिनेमा जवळील लोहार चाळीत रहात होते.दुपारी एका हॅाटेलमध्ये काम करीत.सकाळी या लॅा कॅालेजमध्ये जात असत असत.त्यावेळी हे ऐकमेव लॅा कॅालेज होते त्याचे वर्ग सकाळी भरत.त्यामुळे सावंतसाहेब एलएलबी करू शकले .त्याची त्यांना एवढी जाणीव होती की ते मुंबईत स्वामिनारायण नारायण मंदीराच्या मागे दादर पूर्वेला रहात होते आणि तिथे प्रसिध्द कामगार पुढारी,कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे रहात होते.त्यांना सावंत साहेब म्हणाले मी जो काही वकील आहे,तो केवळ बाबासाहेबांमुळेच! तुम्ही लोकांनी उच्च प्रतिभेच्या बाबासाहेबांना (कम्युनिस्टांनी )  मुंबईतून लोकसभेला बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते ! सावंत साहेब मला म्हणत असत ही मोठी चूकच कम्युनिस्टांनी केली होती.

 निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत 
यांचे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने आज सकाळी साडेनऊ वाजता निधन

 माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आणि माझी मैत्री ५० वर्षांची होती. न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वच क्षेत्रात आदर्श माणूस कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नावर त्यांनी जे निर्णय दिले त्यावर संसदेत कायदे करावे लागले. खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणी त्यांच्यातील एकही दोष दाखवू शकत नाही. माणसाने माणसासोबत कसं वागावं याचं ते उत्तम उदाहरण होते".   निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करताना बी.जी.कोळसेपाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने सकाळी साडेऊन वाजता निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी पुण्यातील बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. पी. बी. सावंत यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला. पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी हे त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी एक आहे. 1989 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. 1995 मध्ये ते निवृत्त झाले. 

देशातील लोकशाही विचार जीवंत रहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतरही सातत्याने सामाजिक जीवनात सक्रिय  १९८९ साली न्यायमुर्ती सावंत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदी नियुक्ती करण्यात आली. १९९५ साली ते या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून काम पाहिले. १९८२ साली झालेल्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायमुर्ती पी.बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर २००२ साली गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या प्रमुख पदी आणि शेवटी महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील ४ मंत्र्याच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे चार मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. सर्वोच्च न्यायालय आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर लोकशासन आंदोलनाची त्यांनी स्थापना करत आर्थिक दुर्लब घटकातील, गरीब कष्टकरी जनतेला आवाज देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय लोकशाहीवादी विविध संघटनांशी ते संबधित होते.

-----------------------------


सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती परशुराम बाबाराम तथा पी.बी. सावंत यांच्या निधनामुळे घटनेचे व कायद्याचे गाढे अभ्यासक, एक निस्पृह न्यायाधीश आणि लोकशाही मूल्ये व सामाजिक न्याय- मानवाधिकारांच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत झटणारे पुरोगामी विचारवंत आपण सर्वांनी गमावला आहे. पुण्यात सोमवारी त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्‍वभूमी लाभलेले जे विचारवंत आता काळाच्या पडद्याआड जात आहेत त्यातील ते एक महत्त्वाचे व्यक्ती ठरावेत. अलिकडेच त्यांच्या पिढीतील कामगार नेते र.ग.कर्णिक काळाच्या पडद्याआड गेले. पी.बी. सावंतांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात वकिली व्यवसायाकडे कधीच व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे एक साधन म्हणून त्यांनी याकडे पाहिले होते. असे करण्यामागे त्यांची पुरोगामी विचारसरणी व कष्टकर्‍यांशी असलेली बांधिलकी कारणीभूत होती. आपल्या तारुण्यात त्यांनी पुरोगामी विचारांचा वसा हाती घेतला तो शेवटपर्यंत. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन सचिव म्हणून त्यांनी तरुणपणातच काम सुरु केले होते. त्यांनी आपली ही वैचारिक बांधिलकी व पुरोगामी विचारधारा शेवटपर्यंत जपली. वकिली सुरु केल्यावर त्यांनी निपक्षपणे काम करता यावे, म्हणून कोणत्याही पक्षाला वाहून न घेण्याचे ठरविले. मात्र त्यांनी शेकापचा डावा विचार व पुरोगामित्व कधीच सोडले नाही. त्यांचा हा निर्णय योग्यच होता. त्यांनी ज्यावेळी न्यायमूर्ती म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी कोणत्याही सत्ताधार्‍यांना मोकळे सोडले नाही. घटनेच्या चौकटीत राहून कष्टकर्‍यांना न्याय देणारे अनेक ऐतिहासिक निकाल दिले. यातून त्यांचे पुरोगामित्व अधिकच उजळून निघाले. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केल्यावर मुंबई उच्च न्यायालयात व त्यानंतर काही काळ सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. 1989 मध्ये त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी झाली. 1995 साली निवृत्त झाल्यानंतर अखेरपर्यंत विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी झाले. आपल्या कृतीतून नेहमीच त्यांनी कष्टकरी समाजाचे भले कसे होईल यासाठी आपले योगदान दिले. पुरोगामी विचारसरणी, परखड व स्पष्ट मांडणी, करारी व्यक्तीमत्त्व आणि निस्पृह न्यायाधीश म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. कडक शिस्तीचे न्यायमूर्ती व घटनेच्या चौकटीत राहून काम करणारे अशी त्याची खास करुन ओळख होती. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिलीच्या प्रदीर्घ अनुभवनानंतर त्यांनी न्यायमूर्ती म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांनी दिलेले अनेक निर्णय आजही संदर्भासाठी वापरले जातात. त्यांचा घटनेचा अभ्यास फार गाढा होता. त्यामुळेच त्यांचे निकाल हे पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. निवृत्तीनंतरही याच मूल्यांच्या आधारे त्यांनी विविध मार्गांनी योगदान दिले. ङ्गप्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाफ चे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. यात त्यांनी अनेकदा श्रमिक पत्रकारांना न्याय मिळवून दिला. पत्रकारांमध्ये आलेल्या कंत्राटी पद्धतीचा तसेच त्यांच्या स्वातंत्र्यावर होणार्‍या हल्ल्याचा नेहमीच निषेध केला होता. त्यांनी श्रमिक पत्रकारांसाठी नियुक्त केलेल्या वेतन आयोगाची अंमलबजावणी न करणार्‍या मालकांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यातून टाईम्स ऑफ इंडिया असो किंवा इंडियन एक्स्प्रेसचे व्यवस्थापन सुटले नाही. गुजरात दंगलींच्या चौकशी समितीचे सदस्य या नात्याने त्यांनी राज्यातील तत्कालीन सत्ताधार्‍यांवरही परखड ताशेरे ओढले होते. अण्णा हजारे यांनी राज्यातील चार मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या आरोपांसंदर्भात न्या. सावंत यांच्या एक सदस्य आयोगाची नियुक्ती झाली, तेव्हा ही चौकशी निष्पक्षपणे होईल, अशी सर्व घटकांची खात्री पटली, ती त्यांच्या निस्पृहतेमुळेच. चौकशी आयोगांच्या कामकाजातील गोपनीयतेला छेद देत न्या. सावंत यांनी खुल्या आणि पारदर्शक पद्धतीने ही चौकशी केली. त्यांच्या अहवालानंतर सुरेश जैन व नबाब मलिक या दोघा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. प्रसंगी अण्णा हजारे यांनाही चार गोष्टी सुनावण्यास ते कचरले नाहीत. अण्णा हजारेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी सव्वा दोन लाख रुपये ट्रस्टमधून खर्च करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ट्रस्टचा पैसा असा वैयक्तिक कारणासाठी खर्च करता येत नाही असे अण्णांना सुनावले होते. मराठा आरक्षणासाठीच्या समन्वय समितीचे ते काही काळ अध्यक्ष होते. मराठा समाजातील मागासलेपण लक्षात घेऊन त्यांनी या समाजाच्या उद्धारासाठी आरक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले होते. आरक्षण, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या चळवळींना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. सुस्पष्ट आणि अभिनिवेशरहित विचारांद्वारे त्यांनी या चळवळींना नेहमी मार्गदर्शन केले. त्यातूनच पुण्यात भरलेली पहिली एल्गार परिषद त्यांच्या नेतृत्वाखाली भरली होती. कायदा किंवा घटना याविषयीच्या कळीच्या मुद्यांंवर न्या. सावंत यांची भूमिका समाजास मार्गदर्शक ठरली. अलिकडे, न्यायसंस्थेचा हा स्तंभ वादाच्या भोवर्‍यात सापडण्याचे प्रकार समोर येत आहेत. अगदी निवृत्त न्यायमूर्तीही न्यायालयात न्याय मिळत नाही असे म्हणू लागले आहेत. तसेच न्यायमूर्तींनाही त्यांच्या कामात होत असलेल्या हस्तक्षेपासाठी आंदोलन करावे लागत आहे. सार्वजनिक व्यासपीठांवरुन आपापल्या भूमिकेनुसार कायद्याचा अन्वयार्थ लावला जात असल्याने या गलबल्यात सर्वसामान्य गोंधळून जात आहेत. अशा काळात न्यायव्यवस्थेची विश्‍वासार्हता जपण्यासाठी आणि तिला जनमानसात पुन्हा आदराचे स्थान देण्यासाठी न्या. सावंत यांचे कार्य आणि विचार मार्गदर्शक ठरतील. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com