Top Post Ad

भारतीय जनगणना 2021 : बौद्धांनी नोंद अशी करावी

Mission : Castless Buddhism 
       

भारतीय जनगणना 2021 : बौद्धांनी नोंद अशी करावी - 
जात-नाही, धर्म-बौद्ध

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने बौद्ध झालेल्या जनतेने आता “अल्पसंख्यांक” या वर्गात आपली नोंदणी करावी. अल्पसंख्यांक आयोगाने 1992 साली “अल्पसंख्यांक” अंतर्गत बौद्धांचा समावेश केलेला आहे. अल्पसंख्यांकांसाठी शिक्षणापासून तर नोकरीपर्यंत आणि आवासा पासून तर उद्योगधंद्यांना कर्ज देण्यापर्यंत योजना आहेत, त्याचा लाभ बौद्धांनी घ्यावा. तेव्हा, बांधवांनो, बौद्धांचे प्रश्न सोडवण्यासाठी, बौद्ध विवाह कायदा निर्माण करण्यासाठी, बौद्धांवरील अन्याय-अत्याचार थांबवण्यासाठी, बौद्धांना रोजगार व शिक्षण मिळण्यासाठी, आंतरराष्ट्रीय बौद्धांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी, जातीचे उच्चाटन करण्यासाठी, बौद्धांची लोकसंख्या वाढवण्यासाठी, सम्यक समाज आणि बौद्धांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी अशी नोंदणी करा-            जात-नाही,
धर्म-बौद्ध

सध्या अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी असलेल्या जाहिराती ह्या वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमातून येत आहेत. तेव्हा धर्मांतरित बौद्धांनी स्वतः आणि आपल्या पाल्याची ची नोंद “अनुसूचित जाती(SC) बौद्ध” करावी की “अल्पसंख्यांक बौद्ध” करावी असा गोंधळ उडत आहे. जो जातीची नोंदणी करतो आणि आणि धर्म बौद्ध लिहितो तो “अनुसूचित जाती(SC) बौद्ध” या वर्गात येतो  आणि जो जातीची नोंद न करता धर्म “बौद्ध” लिहितो तो “अल्पसंख्यांक बौद्ध” या वर्गात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1956 च्या धर्मांतराच्या धम्मक्रांती नंतर “धार्मिक अल्पसंख्यांक बौद्ध” हाच पर्याय योग्य असल्याचा निष्कर्ष आहे.

पार्श्वभूमी :- बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे तुमच्या सवलती जातील असा शहाजोगी सल्ला देताना ब्राह्मणाचा एक मुलगा बाबासाहेबां जवळ येऊन त्यांना म्हणाला “पार्लमेंटमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता !”. बाबासाहेब त्यास म्हणाले, “तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट असेम्ब्ली मध्ये भरा !” ते असेही म्हणाले की, “आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता ? असा माझा त्यांना सवाल आहे" . बाबासाहेब पुढे म्हणाले की "खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते. लाभ प्यारा नसतो. आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता ! मनुष्यमात्राला पूर्णावस्थेत नेण्याकरिता आम्ही तयारी करत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे”.

याचा स्पष्ट अर्थ असा की हिंदू धर्माने अनुसूचित जातीतून(SC) ज्या सवलती दिल्या असतील त्याची पर्वा न करता बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर पन्नास वर्षांचा कालावधी लोटलेला आहे. परंतु बौद्ध समाज हा अनुसूचित जाती(SC)-जमातीच्या आवरणातून बाहेर पडलेला नाही. कागदपत्रावर हिंदू आणि बाहेरून बौद्ध अशी स्थिती आहे. त्यामुळे भारतात बौद्धांची लोकसंख्या शासकीय आकड्यांनुसार फक्त 0.8% आहे. अर्थात बौद्धांची मोठी लोकसंख्या असूनही सरकारी आकड्यानुसार ही लोकसंख्या 1% पेक्षाही कमी आहे व ही बाब खरोखरच आंबेडकरी अनुयायांसाठी अतिशय शरमेची आहे.  हे केवळ अनुसूचित जातीतून(SC) मिळणाऱ्या आरक्षणाच्या भीतीपोटी घडत आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर करते वेळी ही भीती घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. हिंदुधर्मातील अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणापेक्षा बाबासाहेबांना धर्मांतर करून बौद्धांसाठी 'धार्मिक अल्पसंख्यांक' आंतर्गत आरक्षण अपेक्षित होते. 

बौद्धांनी या विषयाचा “धार्मिक अल्पसंख्यांक” दृष्टीने विचारच केलेला नाही. बौद्धांचा धार्मिक- अल्पसंख्यांकाच्या दृष्टीने विचार केला तर या देशात बाबासाहेबांना अपेक्षित सर्वांकश परिवर्तनाची लाट निश्चितपणे येईल.

भारतीय जनगणना : बौद्धांची नोंद 

भारतीय जनगणना ही प्रत्येक दहा वर्षांसाठी असते व दहा वर्षांचा कालावधी हा मोठा असतो. त्यामुळे येत्या 2021 च्या जनगणनेमध्ये बौद्धांनी त्यांची नोंद “जात-नाही, धर्म-बौद्ध” अश्या योग्य रीतीने करून  बौद्धांची संख्या वाढवावी लागेल. त्याचा परिणाम बौद्धांचा राजकीय सामाजिक संघटनांवर होईल. बौद्धांचे प्रश्न अर्थात बौद्ध विवाह कायदा, बुद्ध गया मुक्ती आंदोलन, आरक्षणाचा प्रश्न इत्यादी प्रश्न निकालात काढण्यासाठी बौद्ध म्हणून घ्यावे लागेल. 

इतर मागासवर्गीय समाजाचे लोक बौद्ध धर्माकडे आकर्षिले जातील. तेव्हा येत्या जनगणनेत प्रत्येक बौद्ध व्यक्तीने “जात नाही, धर्म बौद्ध” अशी नोंद करावी. असे केले तरच “अल्पसंख्यांक बौद्धांची” संख्या वाढेल व हीच खरी बौद्ध आंदोलनाची दिशा आहे.  यासंदर्भात रजिस्टर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. एच. बौद्ध यांनी स्पष्टपणे म्हटले की "बौद्ध बोलने वाले बौद्ध धर्मीय लोग गलतीसे अनुसूचित जाती(SC) नही बताये और अपने नाम के साथ बौद्ध शब्द लिखे.” 

अर्थात बौद्ध जनतेने जनगणनेत धर्म बौद्ध, जात नाही असा उल्लेख केल्यामुळे बौद्धांची नोंद ही अनुसूचित जातीत न होता बौद्ध अल्पसंख्यांकात होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिज्ञा केली होती “मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही”. बाबासाहेबांनी ती प्रतिज्ञा पूर्ण केली. बौद्ध झाल्यानंतर त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सदस्य पद सुद्धा त्यागले. परंतु त्यांची जनता बौद्ध होऊनही जवळपास अर्धशतक अनुसूचित जाती बौद्ध म्हणून जगत आहे.

याचा अर्थ  बॅरीस्टर सावरकर यांचे म्हणणेच खरे ठरत आहे. सावरकर असे म्हणाले होते की “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची उडी  हिंदू धर्माच्या अंगणातच पडल्याशिवाय राहणार नाही”. 

नेमके तेच झाले. बाबासाहेबांचे अनुयायी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊनही अनुसूचित जातीच्या कोषातून बाहेर पडले नाहीत. सावरकरांचे म्हणणे चुकीचे ठरवायचे असेल तर बौद्धांनी ‘अनुसुचित बौद्ध’(SC) न होता ‘अल्पसंख्यांक बौद्ध’ होण्याची गरज आहे. ‘अल्पसंख्यांक बौद्ध’ म्हटल्यानंतर तो हिंदू धर्माच्या परिघातून पूर्णपणे बाहेर येतो. तो बौद्ध समाज मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी यांच्या पंक्तीत बसतो. अल्पसंख्यांक धर्मियांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सवलती घ्यायच्या आहेत. तशी वर्गवारी अल्पसंख्यांक आयोगाने केलेली आहे. 

काही बाबतीत अनुसूचित जातींना(SC) मिळणाऱ्या सवलती पेक्षा जास्त सवलती ‘अल्पसंख्यांक बौद्धांना’ मिळतात. उदाहरणार्थ, अनुसूचित जातीच्या लोकांना अकरावीनंतर स्कॉलरशिप ची व्यवस्था आहे परंतु अल्पसंख्यांक बौद्धांना पहिल्या वर्गापासून टप्प्याटप्प्याने पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत विदेशात शिक्षण घेण्यापर्यंत सवलती आहेत व नोकरी पूर्व प्रशिक्षणाची व्यवस्था आहे.

बौद्धांना अनुसूचित जाती/जमाती(SC/ST) पेक्षा जास्त सवलती अल्पसंख्यांकांच्या नावाखाली  मिळतात, या संबंधी बौद्धांनाच माहिती नाही. हा परिचय झाला तर अनुसूचित जातीचे लोक धर्मांतर करून बौद्ध होतील आणि शासकीय कागदपत्रांवर धर्माच्या रकान्यात "बौद्ध" लिहिले तर या देशात बौद्धांची संख्या निश्चितपणे वाढलेली दिसेल.  त्यामुळे बौद्धांना अस्मिता आणि सवलती या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात.  धर्मांतरीत बौद्धांचे अनेक प्रश्न आहेत. सर्वात भीषण प्रश्न शिक्षणानंतर नोकरीचा आहे. जगात बौद्ध राष्ट्र अतिशय गर्भश्रीमंत आहेत. या देशातील अस्पृश्य अनुसूचित जातीचे यामुळे बौद्ध देश त्यांच्या विकासाकडे लक्ष देत नाहीत. परंतु धार्मिक अल्पसंख्यांक अंतर्गत बौद्ध जनता असेल तर त्यांच्या विकासासाठी बौद्ध राष्ट्र नेहमी पुढे येतात.

बौद्ध झाल्याबरोबर अस्पृश्यांच्या जीवनाचा कायापालट होतो. नवा समाज निर्माण होतो. नवा जन्म झाल्याचा आभास होतो. नवी संस्कृती निर्माण होते. तुम्ही या देशात एकटे नाहीत तर जगातील बौद्ध शक्ती तुमच्या पाठीशी आहे ही भावना मनात येते. जगातील बौद्धांशी तुमचे बंधुत्वाचे नाते जुळते. अनुसूचित जातीवर(SC) अन्याय झाला तर बौद्ध राष्ट्रांना त्याचे काही सोयरसुतक नसते. हा प्रश्न हिंदू धर्मांतर्गत आहे अशी त्यांची धारणा असते. पण बौद्ध समाजावर अन्याय झाला तर त्याची दखल जगातील बौद्ध राष्ट्रांना घ्यावी लागेल. या देशातील बौद्धांना मदतीचा हात बौद्ध राष्ट्र देऊ शकतात. त्यासाठी जगातील बौद्ध राष्ट्रांना तुमची बौद्धांची संख्या दाखवावी लागेल. धर्मांतरित बौद्धांनी अल्पसंख्यांक धर्माच्या रांगेत बसणे याचा अर्थ हिंदू धर्माच्या मगरमिठीतून स्वतःची सुटका करून घेणे होय. अनुसूचित जातीचा उल्लेख करून हिंदू धर्माला जिवंत ठेवणे होय .

 बौद्ध म्हणून अल्पसंख्यांकाच्या वर्गात नोंद केली तर त्यांचे स्थान स्वतंत्र राहील व धर्म स्वतंत्र धर्म राहील.  बाबासाहेबांनी आणि पंडित नेहरूंनी बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म हा वेगळा असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु अनुसूचित जातीच्या(SC) नावाखाली बौद्धधर्म हा स्वतंत्र धर्म होत नाही तर बौद्ध धर्म पंथ असतो आणि तो संविधानाच्या अनुच्छेद 25 मध्ये नमूद केल्या प्रमाणे हिंदू धर्माचा एक भाग मानला जातो. त्यामुळे 'अनुसूचित जाती(SC) : बौद्ध' व त्याद्वारे मिळणाऱ्या सवलती म्हणजे बौद्धांना हिंदू धर्मातच अडकवून ठेवण्याचे एक षडयंत्र आहे व हे षडयंत्र बौद्धांना समजून घेण्याची नितांत गरज आहे.

 बौद्ध धर्माला हिंदू धर्मापासून स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येक बौद्धने स्वतःचे नाव 'अल्पसंख्यांक बौद्ध' असेच नोंदवावे. हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे ‘अनुसूचित जाती : बौद्ध’ आणि ‘अल्पसंख्यांक : बौद्ध’ यांमधील फरक लक्षात घ्यावा.

अनुसूचित जातीच्या(SC) दुष्टचक्रातून बौद्ध धम्माला बाहेर काढण्यासाठी  ‘अल्पसंख्यांक : बौद्ध’ हाच पर्याय सर्वात हितकारक आणि कल्याणकारक आहे हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल. 

‘अल्पसंख्यांक : बौद्ध’ होणे म्हणजेच बौद्ध धर्माचा स्वतंत्र विचार करणे होय. स्वतःची वेगळी संस्कृती निर्माण करणे होय. जातीयतेच्या  गराड्यातून बौद्ध धम्माला मुक्त करणे होय. त्यासाठी सर्व आंबेडकरवाद्यांनी एक सुरात निर्णय घ्यावा. उद्याची पिढी संस्कारक्षम करण्यासाठी बौद्ध धर्माचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी कठीण काहीच नाही

.कागदपत्रावर बौद्ध होण्यासाठी भाग 2 मध्ये प्रक्रिया सांगितली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपापले सर्टिफिकेट बदलून घ्यावेत. कागदपत्रावर बौद्ध झाल्याची नोंद करावी. विद्यार्थ्यांनी आणि बौद्ध जनतेने यापुढे ‘अनुसूचित जाती’(SC)च्या सवलतींचा विचार सोडून द्यावा आणि ‘अल्पसंख्यांकांच्या’ नावाखाली बौद्धांना मिळणाऱ्या सवलतींचा विचार करावा.

बाबासाहेबांच्या ‘सारा भारत बौद्धमय करीन’, ह्या स्वप्नाला साकार करण्यासाठी सर्व आंबेडकरवाद्यांनी प्रतिज्ञा पूर्वक निर्धार करावा आणि येत्या 2021 च्या जनगणनेत सर्वांनी आपली नोंद अशी करावी -

             जात-नाही, धर्म-बौद्ध- हे Castless Buddhism मिशन आपल्या सर्व बौद्ध बांधवांना मिशनरी स्वरूपात  यशस्वीपणे राबवायचे आहे व आपल्या प्रत्येक बौद्ध बांधवांपर्यंत  पोचवायचे आहे व हीच आपल्या सर्वांची खरी धम्म सेवा ठरेल अशी कळकळीची विनंती मी आपणास व्यक्त करतो.

       भारतातल्या बौद्धांची जनजागृती करून त्यांची संख्या वाढवणे व बौद्ध धम्माची ताकद वाढविणे व ती ताकद जगातील सर्व बौद्ध राष्ट्रांना दाखवून आपल्या सर्व बौद्धांना  त्यांच्याकडून Support मिळवणे हे Article लिहिण्या मागचे व या मिशन चे खरे उद्धिष्ट आहे !!!

शासकीय कागदपत्रावर बौद्ध बनण्याची प्रक्रिया- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रेरणेने या देशातील दलित जनता बौद्ध झाली. त्यांचे आचार-विचार बौद्ध पद्धतीने होत आहेत. जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा सोहळा बौद्ध पद्धतीने होतो.  तरी पण त्यांना कायद्याच्या भाषेत बौद्ध म्हणता येणार नाही.  जोपर्यंत शासकीय कागदपत्रावर बौद्ध म्हणून नोंद होणार नाही तोपर्यंत त्याला शासकीय पातळीवर बौद्ध समजले जाणार नाही. बौद्ध समाजातील जनतेने धर्म बदलविण्याचा फार्म भरून बौद्ध बनण्याची महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रकात नोंद करावी आणि विद्यार्थ्यांनी ही आपल्या शालेय कागदपत्रावर बौद्ध म्हणून नोंद करावी.

यासाठी सरकारी नियमानुसार बौद्ध बनण्याची प्रक्रिया अशी आहे :-

1. जिल्हाधिकारी कार्यालयातून धर्म बदलविण्याचा नि:शुल्क फॉर्म घ्यावा.
2. हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे अशा प्रकारची माहिती 100 रु. च्या स्टॅम्प पेपरवर लिहून सेतू केंद्रामार्फत तहसीलदार यांची सही असलेला हलफनामा फार्म सोबत जोडावा.
3. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रकाची फी 120 रुपये भरणे बंधनकारक आहे.
4. धर्म बदलविण्याचा फार्म व हलफनामा किंवा बौद्ध दीक्षा प्रमाणपत्र हे दोन्ही शासकीय मुद्रणालय येथे पाठवावे.
5. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रकात तुमचा धर्म बदलण्याची नोंद करून ते पत्रक दोन महिन्यानंतर घरपोच मिळेल.
अशाप्रकारे धर्म बदलविण्याची प्रक्रिया आहे याच प्रक्रियेचा अवलंब व इतर राज्यात सुद्धा करता येईल


संदर्भ :
"बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक"  - लेखकःडॉ. धनराज डाहाट  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com