Top Post Ad

ठाणे महापालिका क्षेत्रातील 190 दिव्यांग व्यक्तींना सदनिका वाटप

ठाणे,
 ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शासनाच्या धोरणानुसार आज शहरातील  दिव्यांग व्यक्तींना पात्रतेनुसार लॉटरी पध्दतीने सदनिकांची  ठिकाणे  निश्चित करण्यात आली. या सर्व प्रक्रियेमध्ये कोणतेही राजकारण न करता अत्यंत पारदर्शकपणे महापालिकेकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन 190 जणांना सदनिकांची निश्चिती करण्यात आली. बीएसयूपी योजनेतंर्गत प्राप्त झालेल्या सदनिका दिव्यांगांना कायमस्वरुपी मालकी हक्काने  देणारी ठाणे ही भारतातील पहिली महापालिका असल्याचे वक्तव्य महापौर नरेश म्हस्के यांनी येथे केले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी    समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती,  विरोधी पक्ष नेते शानू पठाण, भाजपा गटनेते संजय वाघुले, उपायुक्त अश्वीनी वाघमळे, समाज  विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर तसेच  दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

                ठाणे महापालिका क्षेत्रातील पात्र 190 दिव्यांग व्यक्तींना लॉटरी पध्दतीने त्यांच्याच उपस्थितीत व त्यांच्या हस्ते  चिठ्ठी काढून सदनिकांची निश्चिती करण्यात आली. यामध्ये कोणतेही राजकारण नाही, विरोधकांना जर  विरोध करायचा असेल तर त्यामध्ये तथ्य असेल तर जरुर  विरोध करावा असे आव्हान महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी  दिले. मुख्यमंत्री उद्ध्वजी ठाकरे यांच्या हस्ते गेल्यावर्षी प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले होते.  परंतु कोविड प्रादुर्भावामुळे त्यांना ताबा देण्यास विलंब झाला. याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनासोबत केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रलंबित विषय मार्गी लागला व आज  दिव्यांगाना लॉटरी पध्दतीने सदनिका निश्चित करण्यात आल्या.  दिव्यांगाच्या  विकासासाठी शासनाच्या  नियमानुसार महापालिकेच्या माध्यमातून  विविध योजना राबविण्यात येत असून यामध्ये सायकल पुरविणे, प्रशिक्षण देणे आदी उपक्रम समाज विकास विभागाच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येते यामध्ये महत्वाकांक्षी असा  निर्णय महापालिकेने घेवून  दिव्यांगाना कायमस्वरुपी  दिलासा  दिला आहे. यापूर्वी महापालिकेने दिव्यांगाच्या  विकासासाठी स्टॉलचे वाटप, सायकल वाटप, स्वावलंबी बनविण्यासाठी  विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले आहेत. महापालिकेने राबविलेल्या उपक्रमाची माहिती इतर महापालिकांनी घेवून त्याचे अनुकरण केले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असून समाज विकास  व महिला बालकल्याण विभागातर्फे योजनांची नुसती घोषणा न करता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते असेही महापौरांनी यावेळी नमूद केले.

तसेच आज जी घरे  दिव्यांगाना लॉटरी पध्दतीने  मिळणार आहेत त्याचा स्विकार करावा,याची यादी देखील लगेच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल जेणेकरुन यामध्ये संशय  निर्माण होणार नाही असेही महापौरांनी नमूद करत समाज विकास व स्थावर मालमत्ता  विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी कमी कालावधीत काम केले त्याबद्दल त्यांचेही महापौरांनी अभिनंदन केले.    आज  एकूण 190 दिव्यांग व्यक्तींना घरे  मिळाली  असली तरी जसजशा घरे उपलब्ध होतील तसे इतर पात्र  दिव्यांगांना देखील टप्याटप्याने घरे  दिली जातील यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.  महापालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली, तुळशीधाम, पडले गाव, ब्रह्मांड कोलशेत, रिव्हरवूड सागली आदि विविध ठिकाणी  मालकी हक्काच्या सदनिका मिळाल्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या कुटूंबाना मोठा दिलासा व कायम स्वरुपी आधार  मिळाला असून याबाबत त्यांनी महापौरांचे व महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com