Top Post Ad

डॉ. आंबेडकर व दिल्लीतील शेतकरी आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जवळपास सर्व समस्यांना स्पर्श करणारे लेखन केलेले आहे.तसेच आंदोलने केलेली आहेत.सध्या देशात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत.दिल्ली त्याचे केंद्र आहे.मागच्या दिड महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे.केंद्र सरकारने तीन कृषी कायदे आणलेले आहेत.ते तीनही कायदे रद्द करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.दिल्लीच्या भयंकर किंवा जीवघेण्या थंडीत अनेक शेतकरी मरण पावलेले आहेत.आंदोलन सुरूच आहे.हे शेतकऱ्यांचे ऐतिहासिक असे आंदोलन आहे.शेतकरी पिकवेल तरच जनता जेवण करू शकेल.उद्योगपती सुद्धा शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्न खाऊनच जिवंत राहतात.शेतीत न जाणारा मध्यमवर्गीय नोकरदार सुद्धा शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्न खाऊन जगतो. तसेच आमदार, खासदार आणि मंत्री सुद्धा शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्न खाऊनच जगत असतात.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली होती.त्यांनी ही आंदोलने विशेषतः महाराष्ट्र राज्यातील कोकणात केली.ते आंदोलन खोतीशाहीच्या विरूद्ध होते.हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे ज्यांना एवढेच ठाऊक आहे की डॉ. आंबेडकर फक्त दलितांचे नेते आहेत,त्यांना हे ठाऊक नाही की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलने केली.आपल्या भाषणातून,लेखनातून शेतकऱ्यांना चेतवणारा विचार दिला.

आज देशात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू असताना खासदार मौन बाळगून का आहेत ? त्यांना या प्रश्नाची झळ का पोहचत नाही ? त्याचे कारण म्हणजे आज संसदेत शेतकरी प्रतिनिधी नाहीत. जे आहेत ते करोडपती आहे.शेतीपती नाहीत.१५ मे 

१९३८ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कणकवली जवळील देवरूख येथे शेतकऱ्यांची सभा घेतली होती.त्या सभेला १० ते १५ हजारापर्यंत शेतकरी उपस्थित होते.प्रत्येक सभेत वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरून शेतकरी आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले होते,"बहुसंख्यांक असा शेतकरी व कामकरी वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे." आज आपल्याला अगदी त्याच्या विरूद्ध चित्र दिसून येते.ते म्हणतात,"गरीब शेतकरी वर्गातून आलेले नेते शेतकऱ्यांचे दुःख समजू शकतील.ज्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचे केवळ शोषण केलेले आहे ते शेतकऱ्यांचे प्रश्न समजू शकणार नाहीत. शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधीच शेतकऱ्यांनी निवडून दिले पाहिजेत.जे मारवाडी खोटेनाटे दस्तऐवज बनवून शेतकऱ्यांची लूट करतात ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होऊ शकणार नाहीत." या गोष्टींपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी १९३८ साली केले होते.आज संसदेसाठी खासदार हाच शेतकरी निवडून देतो.तरीही शेतकऱ्यांच्या समस्या तशाच राहतात.आज त्या आंदोलनाला ८२ वर्षे झालीत.तेव्हा भारतीय संविधान निर्माण झालेले नव्हते.

तेव्हाच्या डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात अस्पृश्य आणि मुस्लिम शेतकऱ्यांबरोबर स्पृश्य शेतकरीही सामील झाले होते.हा सर्व इतिहास आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे,खंड १८,भाग २ मध्ये वाचावयास मिळेल.तेव्हा बाबासाहेब शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले होते की मला तुमच्यापैकी पंतप्रधान झालेला पाहायचाय.आपल्या देशातील शेतकरी देशाचा पंतप्रधान व्हावा असे स्वप्न त्यांनी आंदोलनातील शेतकऱ्यांना दिले होते.स्वातंत्र्याच्या एवढ्या प्रदीर्घ काळात हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. देशात बहुसंख्य असलेल्या शेतकऱ्यांच्या हातात मतदानाचा अधिकार आहे.परंतु तो अजून शासक होऊ शकला नाही. त्याने तसे स्वप्नच पाहिलेच नाही.

तेव्हाच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले होते की शेतकऱ्यांनी सनदशीर मार्गाने लढा द्यावा. तो लढत असताना शेतकऱ्यांनी आपली संघटना करावी.सावकार,खोत व पांढरपेशे यांच्यामार्फत शेतकऱ्यांचे भले होईल अशी आशा त्यांनी बिलकूल बाळगू नये.सर्व शेतकऱ्यांनी सर्व जाती,पंथ भेद दूर ठेवून लढा जोराने व संघटितपणे लढावा.आपला लढा तत्वाचा आहे.आपली सत्ता शेटजी,भटजी,सावकार,जमीनदार व भांडवलदारांच्या हाती जाण्यापेक्षा ती श्रमजीवी लोकांच्या हातात द्यावी.ते केलेले आवाहन आजही कालसुसंगत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना १९३८ साली दिलेला सल्ला आजही तितकाच लागू पडतो.वर्तमान काळातही तो संदेश अतिशय महत्त्वाचा आहे.ते  आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना म्हणाले होते की शेतकऱ्यांनी आपल्या लढ्यासाठी आहूती देण्याची तयारी ठेवावी.आत्महत्या करण्याची नव्हे.शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी तुरूगवास भोगण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. आज दिल्लीच्या भयंकर थंडीत शेतकरी, केंद्र सरकारने केलेल्या तीन कायद्यांच्या विरूद्ध जीवाची बाजी लावत आहेत.प्राण पणाला लावून एकजूटीने लढत आहेत.आज जेव्हा देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे बघताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी आपण समजून घेतली पाहिजे. हरयाणा आणि पंजाबचा शेतकरी हा लढणारा शेतकरी आहे.आत्महत्या करणारा नाही.

खोती बिलाच्या विरूद्ध आंदोलन उभे करणारे डॉ. बाबासाहेब तुरूगवास भोगण्याची तयारी दर्शवितात तर मग आजचे नेते तशी तयारी का दर्शवत नाहीत ? याला काही सन्माननीय अपवाद आहेत.डॉ. बाबासाहेबांनी खोती बिलाच्या विरूद्ध लढताना कायदेशीर लढ्याचीही तयारी केली होती.त्या काळात डॉ. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांना घेऊन केलेले खोतीशाहीच्या विरूद्धचे आंदोलन यशस्वी राहिले.शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या भितीने काँग्रेसने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते.सरकारजवळ केवळ सत्ता, अनिर्बंध सत्ता,निरंकुश सत्ता  असून  चालत नाही तर जनमताचा आदरही करता आला पाहिजे. हा शेतकऱ्यांचा,शेतमजुरांचा देश आहे.त्यांचे हित हे कोणत्याही सरकारने प्राध्यान्याने जपले पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्यांचे डॉ. बाबासाहेबांनी अचूक निदान केले होते.तेव्हा ते म्हणाले होते की शेतकऱ्यांच्या जमिनीचे लहान लहान तुकडे शेतकऱ्यांच्या दारिद्य्राचे उघड कारण आहे.ते अगदी सत्य आहे. आज शेतकऱ्यांची जमीन फक्त शेतकरीच घेऊ शकेल.असा कायदा असायला पाहिजे. शेतकऱ्यांची शेती कोणत्याही परिस्थितीत व्यापारी,उद्योजक विकत घेऊ शकणार नाही अशी कायद्याने तरतूद होणे आजची नितांत गरज आहे.संविधान निर्मितीच्या काळात संविधानात आदिवासींच्या जमिनीच्या सुरक्षेचे जसे कायदे बनले तशा कायद्याची आज नितांत गरज आहे.अन्यथा पुढील दहा वर्षात शेतकऱ्यांची शेती व्यापारी वर्गाकडे जाईल व शेतकरी आपल्याच शेतीवर मजूर होईल.अशी मला साधार भिती वाटते.

शेतकऱ्यांसाठी लँड मार्गेज बँका,मार्केट सोसायट्यांची स्थापना,शेतकरी उत्पादक सहकारी संघ यांची निर्मिती करू असे त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने सांगितले होते.केवळ शेतीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे भागणार नाही म्हणून प्रत्येक प्रातांचे औद्योगिकीकरण झाले पाहिजे. गुणांवर आधारलेल्या ग्रामोद्योगाचे पुनरूज्जीवन झाले पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडला होता.एवढेच नव्हे तर १९४२ ते १९४६ या काळात व्हाईसरॉयच्या मंत्रीमंडळात श्रममंत्री असताना शेतसाठी धरणे,विद्यूत आणि दीर्घकाळ पुरेल अशा जल योजनेचे नियोजन त्यांनी केले होते.

आज देशात परदेशी सरकार नाही. भारतीय संविधानाची शपथ घेऊन आलेले,शेतकऱ्यांनीच निवडून दिलेले सरकार आहे.शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतकरी बापाच्या मागे,आपल्या अन्नदात्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.शेतकरी आणि शेती सुरक्षित राहिली तरच देश सुरक्षित राहील.आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते वाक्य शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी प्रेरणादायी ठरेल.

"बहुसंख्यांक असा शेतकरी व कामगार वर्ग या देशाचा खरा सत्ताधारी वर्ग बनला पाहिजे. आपला लढा असाच नेटाने,एकीने लढत ठेवावा व त्यासाठी वेळप्रसंगी प्राणाची आहूतीही देण्याचा प्रसंग आला तर मागे हटले न पाहिजे."

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांचे शेतकरी आंदोलनातील हे विचार आजही तितकेच प्रासंगिक व प्रेरणादायी आहेत.शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय होईल.

प्रा.डॉ. विद्याधर बन्सोड..... ९४२१७१७२९५
ठक्कर कॉलनी,नगीनाबाग,वार्ड नं १,चंद्रपूर. ४४२४०१


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com