पारंपरिक घराणे टिकवण्याकडे काँग्रेसचा कल

इतर पक्षातून आलेले काँग्रेसचे नेते मध्यंतरी भाजपच्या गळाला लागले. पण काँग्रेसची अनेक पारंपरिक घराणी अजूनही पक्षाची पाठीराखी आहेत. राजस्थानातील सचिन पायलट प्रकरणानंतर  आपली पारंपरिक घराणी टिकवण्याकडे पक्षश्रेष्ठींचा कल  बनला असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.  तसेच पटोले हे कुणबी असून ते विदर्भातील आहेत. त्यामुळे काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष मराठा आणि तो पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील हवा असल्याचे सांगण्यात येते.  त्यामुळेच  राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची खात्रीलायक माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी उरकल्यानंतर महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पवार-फडणवीस यांनी २४ तासांत अन् आवाजी मतदानाने सरकारचे बळ दाखवावे असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परिणामी, फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा दिला होता. न्यायालयातील लढाईचे नेतृत्व तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी केले हाेते. मात्र सरकारमध्ये चव्हाण यांनी मंत्रिपद नाकारले होते. त्यामुळे चव्हाण यांचे पुनर्वसन पक्षाला करायचे होते. प्रारंभी राष्ट्रवादीचा चव्हाण यांना विधानसभा अध्यक्ष करण्यास विरोध होता, पण आता राज्यातील स्थिती बदलली आहे.

 महाराष्ट्रात प्रभारी म्हणून बंगळुरूचे एच. के. पाटील यांची चार महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली. त्यांनी पक्षपातळीवर संघटनात्मक बदल हाती घेतले. त्याचा भाग म्हणून मुंबई अध्यक्ष बदलण्यात आले. महिला प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले. आता प्रदेशाध्यक्षपद बदलण्यात येत आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची वर्णी लागणार हे निश्चित झाले होते. त्यांच्या निवडीची घोषणा होणार, इतक्यात पटोले यांनी अध्यक्षपदासोबत कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली. परिणामी, नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा पक्षश्रेष्ठींनी थंड बस्त्यात टाकल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद अन् विधिमंडळ नेतेपद अशी तिहेरी जबाबदारी आहे. परिणामी राज्य प्रभारी यांना पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष पाहिजे आहे. त्यात पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद त्यागून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची स्वत:हून मागणी केली. कुणबी, विदर्भ नेता अन् धडाकेबाज स्वभाव म्हणून पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद निश्चित झाले. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यास मंजुरीसुद्धा दिली. आश्चर्य म्हणजे पटोले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापैकी एक मंत्रिपद मागितले आहे. पटोले यांच्या नव्या मागणीने पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA