हरियाणात आंदोलक शेतकऱ्यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या रॅलीला विरोध, पोलिसांनी केला लाठी चार्ज

हरियाणातील करनालमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या रॅलीचा विरोध केल्यामुळे मोठा गोंधळ झाला. यावेळी पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. हा गोंधळ इतका वाढला की, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुर आणि वॉटर कॅननचा मारा करावा लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्‌टर करनालच्या कॅमला गावात शेतकरी महापंचायत रॅली करणार होते. यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणच्या गडी सुल्तानजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी पुढे जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले आणि यामुळे गोंधळ झाला. पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. या गोंधळादरम्यान शेतकरी हेलीपॅड आणि रॅली ठिकाणापर्यंत पोहोचले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष ओम प्रकाश धनखड यांच्यासोबतच आंदोलकांची बाचाबाची झाली. यानंतर खराब वातावरणाचे कारण सांगून मुख्यमंत्र्यांनी रॅली रद्द केली.

 कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज (10 जानेवारी) 46वा दिवस आहे.  दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा संयुक्त मोर्चा एक महत्वाची बैठक घेणार आहे. बैठकीत पुढील रणनितीवर चर्चा होईल. तसेच, शेतकरी 26 जानेवारीलो होणाऱ्या कार्यक्रमाबाबत घोषणा करू शकतात. दरम्यान, उद्या म्हणजेच 11 जानेवारीला सुप्रीम कोर्टात कृषी कायद्याला रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी होईल. यापूर्वी बुधवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने म्हटले होते की, स्थितीत कोणताच सुधार नाही. आम्ही शेतकऱ्यांचा भावना समजतो.

दरम्यान केंद्र सरकारचे तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या अांदाेलनाच्या विराेधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते ऋषभ शर्मा यांनी याचिकेत दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांमुळे राेज ३,५०० काेटी रुपयांचे नुकसान हाेत असल्याचे माध्यमांच्या आधारे म्हटले आहे. शेतकऱ्यांना दिल्ली सीमेवरून हटवण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

मुख्य न्यायाधीश एस. ए. बाेबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठ ११ जानेवारीला शेतकरी आदाेलनाच्या विराेधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. दिल्लीच्या सिंघू, टिकरी, गाझीपूर बाॅर्डरवर शनिवारीही धरणे-आदाेलन सुरू राहिले. हरियाणातील अंबाला-हिसार महामार्गावर शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विराेधात ट्रॅक्टर रॅली काढली. ब्रिटनमधील कामगार पक्षाचे खासदार तनमनजितसिंह ढेसी यांनी पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांना पत्र लिहून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.

१५ जानेवारीला काँग्रेस साजरा करणार शेतकरी हक्क दिवस
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस १५ जानेवारीला शेतकरी हक्क दिन साजरा करेल आणि पक्षाचे नेते सर्व राजभवनांकडे कूच करतील. त्याच दिवशी शेतकरी व सरकार यांच्यात पुढच्या टप्प्यातील चर्चा होईल. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश सरचिटणीस व प्रभारी यांच्याबराेबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, १५ जानेवारी रोजी प्रादेशिक मुख्यालयात पक्षाचा मेळावा व धरणे झाल्यानंतर राजभवनामध्ये तिन्ही काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देण्याचा निर्णय साेनिया गांधी यांनी घेतला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA