शहापूर तालुक्यात ३३४ गावांना पाणी पुरवठा उपाययोजनेसाठी २२ कोटी ८४ लक्ष होणार खर्च

शहापूर तालुक्यात ३३४ गावे, ६५२ पाड्यांत संभाव्य पाणी टंचाई ;
७८ गावांसह २४२ पाड्यांना टँकर व बैलगाडीद्वारे केला जाणार पाणी पुरवठा ;
उपाययोजनेसाठी २२ कोटी ८४ लक्ष होणार खर्च

शहापूर
धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीला १०० टक्के साजेशी परिस्थिती शहापूर तालुक्याची आहे. मुंबईची तहान भागविणारा तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या तालुक्यातील शेकडो गावपाड्यांना आज देखील भिषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. चालू वर्षी देखील जिल्हा परिषद उपविभाग पाणी पुरवठा पंचायत समिती शहापूर यांनी ऑक्टोबर २०२० ते जून २०२१ या दरम्यान शहापूर तालुक्यातील ३३४ गावे तसेच ६५२ पाड्यांत संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनेसाठी एकूण २२ कोटी ८२ लक्ष ७० हजार अपेक्षित खर्च येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा उपअभियंता एम. जी. आव्हाड यांनी दिली.

शहापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या कालावधीत ८३ गावे तर ११४ पांडे पाणी टंचाईग्रस्त असून या गाव पाड्यांपैकी १७ गावांसह ७४ पाडयांना टँकर, बैलगाडी द्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी ४५ लक्ष खर्च येणार आहे. आणि ६१ गावे व ३४ पाडे येथील नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी १ कोटी ३० लक्ष २ हजार खर्च होणार आहे. तसेच ५ गावे व ६ पाड्यातील विधन विहिरींची दुरुस्ती केली जाणार आहे त्यासाठी २ लक्ष २० हजार खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यातील पाणी टंचाईग्रस्त ८३ गावे व ११४ पाडे यांची पाणी टंचाईच्या उपाययोजनेसाठी एकूण अंदाजित रक्कम रुपये १३ कोटी ४९ लक्ष २० हजार खर्च येणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यात एप्रिल २०२१ ते जून २०२१ या दरम्यान २५१ गावे व ५३८ पाडे पाणी टंचाईग्रस्त होणार आहेत. या टंचाईचा सामना करण्यासाठी  ३ गावे आणि १२ पाड्यांत बुडक्या घेणे यासाठी ७ लक्ष ५० हजार रुपये  खर्च होणार आहे. तर ६५ गावांतील व ११५ पाड्यांतील विहिरींचा गाळ काढणे व त्या खोल करण्यासाठी ३५ लक्ष ४० हजार रुपये  खर्च होणार आहे. तसेच ६१ गावे व १६८ पाडयांना टँकर, बैलगाडी द्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे त्यासाठी २ कोटी ५० लक्ष खर्च येणार आहे. तर ८ गावांत आणि ९ पाड्यांत पूरक नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार असून त्यासाठी ४ कोटी ३९ लक्ष खर्च येणार आहे. आणि ११४ गावांत व २३४ पाड्यांत विधन विहिरी घेतल्या जाणार आहेत. त्यावर २ कोटी १ लक्ष ६० हजार खर्च होणार आहेत. 

दुसऱ्या टप्प्यातील पाणी टंचाईग्रस्त २५१ गावे व ५३८ पाडे यांची पाणी टंचाईच्या उपाययोजनेसाठी एकूण अंदाजित रक्कम रुपये ९ कोटी ३३ लक्ष ५० हजार खर्च येणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA