Trending

6/recent/ticker-posts

दिव्यातील बीआर नगर येथील जमिनीवर भूमाफियांचे अतिक्रमण

ठाणे
 ठाणे महानगर पालिकेत बेकायदा अनधिकृत बांधकामांचा हैदोस सुरु आहे. कोणीही उठतो रिकामा भूखंड ताब्यात घेतो. अधिकाऱयांशी लागेबांधे करतो. आर्थिक व्यवहार करतो आणि बेधडकपणे इमारती उभ्या करत आहे. कळवा, दिवा, मुंब्रा हा परिसरात तर अनेक सरकारी भूखंड या भूमाफियांनी हडप केले आहेत. या उपर ज्या स्थानिक गावकऱयांच्या जमिनी होत्या त्याही लाटण्याचा प्रयत्न हे भूमाफिया करत आहेत.  असाच प्रकार दिव्यातील बीआर नगर येथे घडला आहे. 

मुळ मालकाला न विचारता परस्पर अधिकाऱयांशी संगनमत करून बीआर नगर येथील जमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. भारती बाळाराम म्हात्रे यांच्या नावे असलेली जमिन परस्पर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱयांशी आर्थिक संगनमत करून ताब्यात घेतली आणि या जमिनीवर एक ना दोन सुमारे 15 इमारतीचे  बांधकाम पूर्ण केले आहे. याबाबत म्हात्रे यांनी वारंवार तक्रार अर्ज करूनही त्यांच्या अर्जाला पालिकेच्या अधिकाऱयांनी केराची टोपली दाखवली. इतकेच नाही तर भूमाफियांनी या जमिनीवर आलास तर तुझे हातपाय तोडून ठेवू अशी धमकी भारती म्हात्रे यांच्या कुटुंबियांना दिली. यावर अखेर म्हात्रे यांनी 2017 साली न्यायालयात दाद मागितली. सुमारे वर्षभरानंतर न्यायालयाने 2018 साली या सर्व इमारती जमिनदोस्त करण्य्चे आदेश ठाणे महानगर पालिकेला दिले. यावेळी ठाणे महानगर पालिकेने या इमारतीवर लवकरच कारवाई केली जाईल असे न्यायालयाला सांगितले. मात्र दोन वर्षाचा कालावधी उलटूनही या 15 इमारतीमधील एकाही इमारतीवर कारवाई झालेली नाही.  

ठाण्यात अनधिकृत इमारती बांधण्याची भूमाफियांमध्ये चढाओढ लागली आहे. यामध्ये ठाणे महापालिकेचे अधिकारी आपले आर्थिक हित सांधून घेत आहेत. याबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यास त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात येते. मात्र ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत असल्याने आता सर्वसामान्य नागरिकांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.   

Post a Comment

0 Comments