पालकमंत्र्यांच्या आदेशाकडेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

महामार्गावरील अंडरपास व उड्डाणपुलाचे कामांना मुहूर्त कधी मिळणार ?   
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुसली पालकमंत्र्यांच्या तोंडाला पाने
वर्षभरात झाले १०३ अपघात , ६० गतप्राण तर ७० जखमी
महामार्गावरील क्रॉसिंग अजून किती जीव घेणार ?


शहापूर
 मुंबई- नाशिक महामार्गावरील अंडरपास, सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलांची कामे मागील अनेक वर्षांपासून सुरू न झाल्याने मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाट ते येवई फाटा असे ७१ किलोमीटरच्या अंतरामध्ये सन २०२० या वर्षभरात १०३ लहान-मोठे अपघात होऊन ६० जणांचा मृत्यू झाला असून ७० जण गंभीर झाले आहेत. परंतु प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने प्रशासन अजून किती जणांचे जीव घेणार ? असा सवाल संतप्त जनतेकडून विचारला जात आहे.

आसनगाव औद्योगिक वसाहत ही शहापूर तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असून येथील कारखान्यांमध्ये हजारो कामगार काम करत आहेत. या औद्योगिक वसाहतीत कामाला जाण्यासाठी परिवार हॉटेल समोरील क्रॉसिंगचा वापर केला जात आहे. ही जीवघेणी क्रॉसिंग ओलांडून हजारो कामगार रोज येथून  आपला जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडून कामावर ये जा करत असतात, वाढती लोकसंख्या व मोठं मोठी गृह संकुले होत असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते आणि आसनगाव मुख्य बाजरपेठ तसेच आसनगाव रेल्वे स्थानकात जाण्यासाठी हा  प्रमुख मार्ग असल्याने परिवार हॉटेल समोरील क्रॉसिंग महत्वाची आहे. 

सप्टेंबर २०१८ मध्ये शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा ते शहापूरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी महिनाभरात अंडरपासचे काम सुरू करण्याचे, तसेच मंजुरी मिळालेल्या सहा उड्डाणपुलांबरोबर उरलेल्या अन्य उड्डाणपुलांची मंजुरी मिळवून त्यांची कामे तीन महिन्यांत सुरू करण्याचे मान्य केले होते. परंतु आजतागायत रस्ते महामार्ग दुरुस्ती व्यतिरिक्त कोणत्याही कामाची सुरुवात झाली नाही. आता तर महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचे सरकार असल्याने व एकनाथ शिंदे पुनःश्च ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने हा प्रश्न तत्काळ तडीस जाईल अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्ती व्यतिरिक्त कोणतीही कामे न करता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडाला पानेच पुसली असल्याचे दिसून येत आहे. 

या रस्त्यावर पडघा टोलनाका येथे गेल्या नऊ वर्षांपासून टोलवसुली सुरू आहे. परंतु, कंपनीने त्यावेळी ठरलेल्या करारनाम्यानुसार वेळच्या वेळी खड्डे भरणे, अंडरपास, सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलांची कामे पूर्ण केली नसल्याने आतापर्यंत महामार्गावर शेकडो अपघात होऊन सातशेच्यावर नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत शिवसेनेने वारंवार आंदोलने करूनही कंपनीने अपूर्ण कामे पूर्ण केली नाहीत. रक्षाबंधनच्या दिवशी आवरे येथील दोन बालकांचा खड्ड्यांमुळे अपघातात बळी गेल्यानंतर २१ सप्टेंबर २०१८ रोजी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने पडघा टोलनाक्यावर टोलबंद आंदोलन देखील करण्यात आले होते. परंतु आज देखील परिस्थिती जैसी थी आहे.

जव्हार फाटा सर्व्हिस रोड, वाशाला उड्डाणपूल, खर्डी गोलभन ते रेल्वे पुलापर्यंत सर्व्हिस रोड, भातसा उड्डाणपूल, कांबारे अंडरपास व सर्व्हिस रोड, शहापूर चेरपोली ते परिवार गार्डन हॉटेल दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड, आसनगाव परिवार हॉटेल उड्डाणपूल, खातिवली-वासिंद एण्ट्री उड्डाणपूल, वासिंद जिंदाल कंपनीसमोर उड्डाणपूल व खातिवली ते जिंदाल कंपनी सर्व्हिस रोड, कांदली डोहोळे कोशिंबी अंडरपास, खडवली फाटा उड्डाणपूल, पडघा एण्ट्री अंडरपास व पडघा बायपास टोलनाक्यापर्यंत दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड, तळवली फाटा उड्डाणपूल, भोईरपाडा अंडर पास करण्याच्या मागण्यांची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली होती.  कामे न झाल्याने संतप्त जनतेचा रोष एकनाथ शिंदे यांच्या विरोधात व्यक्त केला जात आहे.

मंत्री महोदयांनी आदेश देऊनही संबंधित महामार्गाच्या अखत्यारीत  अधिकाऱ्यांनी तातडीने महामार्ग अंडरपासचे काम सुरू केलेले नाही. ही बाब खेदजनक असून आसनगाव परिवार हॉटेल उड्डाणपूलाचे काम तत्काळ सुरू करावे एवढीच अपेक्षा  -  सुरेश जाधव, ग्रामस्थ आसनगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या