Top Post Ad

ज्या विद्यापीठात बाबासाहेबांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात आज त्यांच्या नावाने संशोधन केंद्र

मुंबई
 संविधान निर्मितीमधील बाबासाहेबांचे कार्य सर्वांना माहिती आहे. पण बाबासाहेबांनी याबरोबरच देशाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. धरणांची उभारणी, पाण्याचा योग्य पद्धतीने वापर, विद्युत निर्मिती, कामगारांचे अधिकार अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी फार महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांची वैज्ञानिकदृष्टी देशाला आणि समाजाला महत्त्वपूर्ण दिशा देणारी ठरली. ज्या विद्यापीठात बाबासाहेबांनी शिक्षण घेतले त्याच विद्यापीठात आज त्यांच्या नावाने संशोधन केंद्र उभे रहात आहे. त्यांचे कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील,” असे उद्गार राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी काढले.  मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे कोनशिला अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आज संपन्न झाले.  त्यावेळी ते बोलत होते.

 जगाला दिशा देणारा हा महामानव आपल्या देशात, आपल्या राज्यात झाला ही खरोखर अभिमानाची बाब आहे,  बाबासाहेबांचे विचार, त्यांचे कार्य याला चालना देणारे हे संशोधन केंद्र जागतिक पातळीवर अभिमान वाटेल अशा पद्धतीने उभे करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बाबासाहेबांनी एकीकडे परकीयांशीही लढा दिला आणि दुसरीकडे समतेसाठी त्यांचा स्वकियांशी लढा होता. पण यातही त्यांनी आपला ज्ञानप्राप्तीचा व्यासंग जतन केला. त्यांची ही ज्ञानलालसा अपूर्व अशीच होते. प्रसंगी बाबासाहेबांचे वडील रामजीबाबा मिळतील तिथून पैसे जमवून बाबासाहेबांना पुस्तके विकत आणून द्यायचे. बहिणींचे दागिनेही पुस्तकांसाठी विकले. पुस्तक वाचनाच्या व्यासंगापायी घर विकावे लागले होते. ज्या व्यक्तीला अभ्यास करण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागले. त्याच व्यक्तिविषयीचा अभ्यास करण्यासाठी आज संशोधन केंद्र सुरू करावे लागले आहे. तेही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, हा एक चमत्कारच आहे. या संशोधन केंद्राची कोनशिला अनावरण करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध होते, याचा दाखलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

या केंद्रातील संशोधन उपक्रमात आता लंडन स्कूल ऑफ ईकॉनॉमिक्सने सहकार्य दिले आहे. डॉ. बाबासाहेब जगभर जिथे जिथे अभ्यासासाठी गेले. त्या संस्था-विद्यापीठांना या आंतरराष्ट्रीय केंद्रांशी संलग्न व्हावे, असे वाटेल असे काम आता आपल्याला करावे लागेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यापुढे डॉ. बाबासाहेब यांच्यासारखे अभ्यासू, विद्वान होणे अशक्य आहे. पण त्यांच्याविषयीचा अभ्यास करून, पुढे जाणारे अभ्यासक, संशोधक येथे तयार व्हावेत,  बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी केला. त्यातून देशाला संविधान दिले. वेगवेगळ्या गोष्टीत विखुरलेल्या आपल्या देशाला संविधान देऊन एकसंघपणाची ताकद काय असते हे दाखवून दिले. जगाला दिशा देणारा महामानव आपल्या देशात, आपल्या राज्यात जन्मला ही खरोखर महानतेची बाब आहे. डॉ. बाबासाहेब यांच्या महानतेपुढे नतमस्तक होण्यासाठी आपण इंदू मिल स्मारक येथील त्यांच्या पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट करतो आहोत. त्यांच्या पुतळ्याची उंची वाढविता येईल. पण त्यांच्या व्यक्तित्त्वाची उंची आपल्याला गाठता येणार नाही. त्यांच्या योगदानामुळे आपण जगाकडे ताठ मानेने पाहू शकतो, हे विसरता कामा नये. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीत महाराष्ट्र शासन कुठेही कमी पडणार नाही. जागतिक पातळीवर अभिमान वाटेल, असे संशोधन केंद्र उभारण्यात येईल, अशी ग्वाही या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र-  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या संशोधन केंद्रात बाबासाहेबांची लोकशाही मूल्याधिष्ठित सामाजिक पुनर्रचनेची जीवनदृष्टी केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय आणि मानव्यविद्या या अभ्यास क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी ‘ध्येयधोरणे आणि विकासाची दिशा’ या संदर्भातील संशोधनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रांशी जोडून घेत विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे राबविले जाणार आहेत. ज्यामध्ये आंबेडकर स्टडीज, बुद्धिस्ट थॉट्स, डेव्हलपमेंट स्टडीज आणि सोशल पॉलिसी या विषयात पदव्यूत्तर पदवी करता येणार आहे. याचबरोबर आंबेडकरी विचार आणि तत्वज्ञान या विषयाचा देखील अभ्यास ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्कॉलर्सना संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची सोय आहे. तसेच ‘सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या’ आदी विषयांतही आंतरशाखीय संशोधनाची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून हे केंद्र उभे करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे.




रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या आंदोलनाला यश महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन ६/ १२/२०२० रोजी मुख्यमंत्री यांचे हस्ते कोणशीला अनावरण



मुंबई विद्यापीठ कलिना येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय  संशोधन केंद्र ची स्वतंत्र इमारत झाली पाहिजे म्हणून  गेले ८ वर्षपासून मुंबई विद्यपीठ मध्ये रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने मा आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष आशिष गाडे यांच्या नेतृत्वाखाली विविध पद्धतीने तीव्र  आंदोलन करत होते या सर्व आंदोलनाची महाराष्ट्र सरकारने नोंद घेऊन कलिना येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय  संशोधन केंद्र उभारणी साठी ६ एकर जागा मुंबई विद्यपीठणे दिली असून  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  व मा केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या ऑनलाइन उपस्थित तसेच शिक्षण मंत्री उदय सामंत आणी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते कोणशीला अनावरण कार्यक्रम पार पाडण्यात आला सदर ठिकाणी मा आनंदराज आंबेडकर, कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर, प्र कुलगुरू कुलकर्णी  कुलसचिव बळीराम गायकवाड तसेच मुंबई विद्यापीठाचे डीन राजेश खरात साहेब , मृदुल निळे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष आशिष गाडे तसेच रिपब्लिकन सेना उत्तर मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष शैलेश पवार उपस्थित  होते। तसेच सर्व   रिपब्लिकन विद्यार्थी सेनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com