पुछता है भारत २० लाखाचा दंड

 

लंडन:  संपादक अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीवर आता आणखी एका अडचण आली आहे.   ब्रिटीश ब्रॉडकास्टींग रेग्युलेटर (ब्रिटनमध्ये माध्यमांवर देखरेख ठेवणारे प्राधिकरण ऑफकॉम) यांनी रिपब्लिक भारत या हिंदी वृत्तवाहिनीला २० हजार पौंडचा (जवळपास २० लाख रुपये) दंड ठोठावला आहे. एका चर्चेच्या कार्यक्रमात द्वेष पसरवणारे वक्तव्य केले असून नियमांचे उल्लंघन केले असल्याचा ठपका या वृत्तवाहिनीवर ठेवण्यात आला आहे. 'पुछता है भारत' या कार्यक्रमात द्वेष पसरवणारी भाषा वापरण्यात आली असल्याचे ऑफकॉमने म्हटले. 

कार्यक्रमात वापरण्यात आलेली भाषा अतिशय अपमानजनक असून नियम २.३, ३.२, आणि ३.३ चे उल्लंघन केले आहे. ऑफकॉमने 'वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेड'च्या विरोधात मंगळवारी आदेश जारी केला आहे. कोणत्याही वक्तव्यामुळे एखाद्याच्या भावना दुखावत असतील तर ऑफकॉमच्या दृष्टीने हा मोठा गुन्हा आहे. प्राधिकरणाने वाहिन्यांसाठी मार्गदर्शक तत्वेही जाहीर केली आहेत. त्यानुसार, वाहिनीवर कोणत्याही कार्यक्रमाचे पुन्हा प्रसारण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

ऑफकॉमने दिलेल्या आदेशानुसार 'पुछता है भारत' या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर द्वेषपूर्ण भाषेचा वापर करण्यात आला आहे. या कार्यक्रमातील भाषेमुळे पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांविरोधात घृणा निर्माण होईल असे वक्तव्य करण्यात आले होते. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांविरोधात अपमानजनक टिप्पणी, भाषेचा वापर करण्यात आला होता. या कार्यक्रमात सामान्य पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी, माकडे, भिकारी, चोर असे संबोधण्यात आले होते. पाकिस्तानचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, नेते, खेळाडू सर्वजण दहशतवादी आहेत. तेथील प्रत्येक लहान मूल दहशतवादी असल्याचे वक्तव्य अर्णब गोस्वामीने कार्यक्रमात केले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या