Top Post Ad

तुम्ही फक्त पोटाचे पाईक बनु नका

 बौद्धधम्माच्या अनुयायांनो, 

आज मी माझ्या भाषणात या महत्वपूर्ण विषयावर विचार प्रकट करणार आहे. की भगवान बुद्धानी सांगितलेल्या धम्माच्या प्रचाराची व पुनरुज्जीवनाची धुरा मी माझ्या खांद्यावर का घेतली आहे? माझ्याबरोबरच अनेक विचारवतांचे असे मत होते की, काल झालेला धर्मांतर सोहळा आज व्हायला हवा होता. व आज जे धर्म परिवर्तनाबाबत अभिभाषण होत आहे ते धर्मांतरापूर्वी व्हायचे होते. परंतु जे व्हायचे ते झाले आता या प्रश्नावर विचार करणे महत्वाचे नाही. 

बऱयाच लोकांनी मला असा प्रश्न केला की धर्मांतर सोहळ्यासाठी नागपूर शहराला निवडण्याचे कारण काय? दुसरे महत्वाचे स्थान का निवडले नाही? काहीजणांचे असे मत होते की या शहरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्य केंद्र आहे या हिंदुत्ववाद्यांपुढे काहीतरी करुन दाखविण्याच्या हेतूने मी हे स्थान निवडले. परंतु हे साफ खोटे आहे माझा असा कुठलाही उद्देश नाही. अशा निरर्थक गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही. ज्या महान कार्याचा भार मी माझ्या खांद्यावर घेतला आहे ते इतकं महत्वपूर्ण आहे की एक मिनीटही माझ्यासाठी महत्वाचा आहे. या स्थानाला निवडते वेळी एका क्षणासाठीही माझ्या मनात आर.एस.एस.चा विचार आला नाही. 

ज्या अभ्यासकांनी बौद्ध धम्मासंबंधी या देशाच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास केला आहे. त्यांना हे माहित असेल की भगवान बुद्धाच्या धम्माच्या प्रसाराचे अधिक श्रेय  “नाग’ लोकांकडे जाते. नागलोक हे आर्यांचे कट्टर शत्रू होते. आर्य व अनार्य (नाग लोक) यांच्यात आपापसात नेहमीच छोटी मोठी युद्धे होत असत. आर्यलोक नागलोकांचा समुळ नाश करण्याची इच्छा बाळगून होते. या संदर्भात बऱयाच पुराणकथा आहेत जसे अर्जुनाने नागांना जिवंत जाळले होते. अगस्त ऋषीने सर्प या नागाची रक्षा केली होती त्याच वंशाचे आपण सर्वजण आहोत. या नागांना कपटाने अस्पृश्य बनविले गेले. या अवस्थेतून उठण्यासाठी त्यांना एका महापुरुषाची आवश्यकता होती. त्यांना तो महापुरुष भगवान बुद्धांच्या रुपात मिळाला. नाग लोकांनीच संपूर्ण भारतात बौद्धधम्माचा प्रचार व प्रसार केला. आपण  सर्वजण नागांची मुले म्हणजेच  नागवंशीय आहोत. वीर नागांची प्रमुख जनसंख्या नागपुरात होती, यामुळेच या स्थळाला नागपूर असे नाव पडले. नागपुर पासून 27 मैल अंतरावर नागनदी आहे. या सर्व गोष्टींवरुन हे सिद्ध होते की या नदीच्या आसपास नागांची जनसंख्या जास्त आहे. नागपुर या शहराला निवडण्यामागचे हेच एकमेव कारण आहे.  यामागे दुसरे कुठलेही कारण नाही, तरी या संदर्भात कोणाचीही कुठलीही गैरसमजूत होऊ नये. दुसऱया कारणासाठी स्वंयसेवक संघाचा विरोध संभव आहे. परंतु या स्थानाला निवडण्यामागे दुसऱयाला चिडवण्याचा कुठलाही उद्देश नाही. 

ज्या महान कार्याला मी सुरुवात केली आहे व आपण स्विकारले आहे याची वर्तमानपत्रांनी कडवट टीका केली. त्याच्या मतानुसार मी माझ्या अस्पृश्य बांधवांना चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे. हे अस्पृश्य लोक कायम अस्पृश्यच राहतील. या धर्मांतराने आमचे काहीही भले होणार नाही. काही वर्तमानपत्रांच्या मतानुसार आज अस्पृश्यांना जे राजनैतिक अधिकार आहेत ते धर्मांतराने समाप्त होतील. हा सर्व वेडगळपणाचा प्रचार आहे. या लोकांचे असे म्हणणे आहे की आम्ही नवीन मार्गावरुन न जाता जो जुना परंपरागत मार्ग आहे त्यानेच जावे. सम्भवत आमच्या तरुणांवर व वृद्धांवर याचा थोडासा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देणे मी माझी जबाबदारी समजतो. आणि हा संशय दुर करण्याने आमच्या आंदोलनाला गती मिळेल. आणि म्हणूनच या प्रश्नावर मी बरच काही बोलू इच्छितो. 

महार-चांभारांनी मेलेल्या गाय-म्हशींना उचलू नये आणि त्यांचे मांसही खाऊ नये. याचा प्रचार मी 30 वर्षापूर्वीच सुरु केला होता. या प्रचारामुळे सवर्ण हिंदुना फार मोठा धक्का बसला मी त्यांना विचारले, गाय-म्हशीचे दुध तुम्ही पिणार व त्या मेल्यावर आम्ही  त्यांना उचलून बाहेर फेकायचे असं का? जर ते स्वतची म्हातारी आई मेल्यावर स्वतच स्मशानात घेऊन जातात तर मग मेलेल्dया गायी व म्हशी का उचलून घेऊन जात नाहीत. जेव्हा मी असे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले तेव्हा ते खुप चिडायचे. मी त्याना म्हणायचो, जर तुम्ही तुमची मेलेली आई आम्हाला बाहेर फेकण्यासाठी दिली तर आम्ही तुमच्या मेलेल्dया गाई ही उचलून घेऊन जाऊ. यावर केसरी (ब्राम्हणांचे वर्तमानपत्र) या दैनिकात एका चित्तपावन गृहस्थाने बरीच पत्रे प्रकाशित करुन हे दाखविण्याचा प्रयास केला की मेलेल्dया जनावरांना न उचलल्याने महार व चांभारांचे किती नुकसान होते. यासाठी त्यांनी बरीच आकडेवारी दिली व आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे असे म्हणणे होते की मेलेल्या जनावरांचे शिंगं, दात, हाडे इत्यादी विकुन महार-चांभारांना वार्षिक 500 ते 600 रु मिळतात व मी हे करु नका असे सांगून त्यांचे नुकसान करित आहे. 

माझ्या अस्पृश्य बांधवांना असे वाटले की मी नक्की त्यांच्यासाठी काय करित आहे. एकदा मी संगमनेर (सध्या म्हैसूरमधे बेळगावचा एक तालुका) येथे गेलो होतो. तिथे मला ती व्यक्ती भेटली ज्याने केसरीमध्ये ही पत्रे प्रकाशित केली होती. त्या व्यक्तीने मला पुन्हा तेच प्रश्न विचारले तेव्हा मी त्याला योग्य वेळी प्रश्नांची उत्तरे देईन असे सांगितले. मी केसरीत प्रकाशित झालेल्dया सर्व प्रश्नांची उत्तरे जाहिर सभेमध्ये दिली. मी असे उत्तर दिले की माझ्या बांधवांकडे खाण्यासाठी भाकरी नाही. शरीर झाकण्यापुरतेही कपडे नाही, राहण्यासाठी घर नाही, कसण्यासाठी जमिन नाही. म्हणून ते दलित आहेत, दुःखी आहेत. मी यामागची कारणे काय हा प्रश्न सर्वांपुढे उपस्थित केला. पण कोणीही याचे उत्तर देऊ शकले नाही. ज्यांनी केसरी वर्तमानपत्रात लेख लिहून प्रश्न उपस्थित केले होते त्यांनीही माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाही. तेव्हा मी म्हणालो, सद्गृहस्थांनो आम्हीच आमचा स्वतचा विचार करु जर तुम्हाला आमच्या फायद्याची चिंता असेल, तुम्ही तुमच्यापैकी एकाला गावी पाठवून मेलेल्या जनावरांना उचलायला सांगा, तुम्हाला त्यापासून 500रु.लाभ घ्या व याशिवाय मी स्वत त्या व्यक्तीला 500रु.बक्षिस देईन. म्हणजे हे काम करले त्याला दुहेरी फायदा होईल. आमचं नुकसान होईल पण तुमचा फायदा होईल. परंतु आजपर्यंत कोणीही हे काम करण्यास पुढे आला नाही. आमची प्रगती पाहून यांच्या पोटात का दुखते हेच मला कळत नाही. माझ्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा संबंधी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. याविषयी तुम्ही चिंता करु नये. 

या कामाला आम्ही जर केले तर फायदा व तेच काम जर तुम्ही केले तर नुकसान हे कसे काय? उचला मेलेल्dया जनावराला व फायदा घ्या. याचप्रकारे काही लोकांचे असे म्हणणे आहे की आम्हाला विधानसभेत काही जागा मिळाल्या तर त्या आम्ही का सोडायच्या ? मी यावर म्हणतो ब्राह्मण व राजपुतांनी महार, भंगी, चांभार बनावे व त्या जागा भराव्यात. आमच्या जागा रिकाम्या झाल्या म्हणून तुम्हाला रडण्याचे कारण नाही. मनुष्याला फायद्यापेक्षा स्वतची इज्जत जास्त महत्वाची वाटते. आणि आम्ही सन्मानासाठीच संघर्ष करत आहोत 

मुंबईत वेश्याव्यवसाय करणाऱया स्त्रियांची एक वसाहत आहे. या स्त्रिया सकाळी 8 वाजता उठतात. उठल्dयावर लगेच शेजारच्या ईराणी हॉटेलातील मुस्लिम मुलांना बोलवितात व म्हणतात, ए सुलेमान एक प्लेट खीमा आणि रोटी घेऊन ये. त्या खीमा रोटी खातात, चहा पितात, परंतु आमच्या स्त्रियांना खीमा रोटी मिळत नाही, फक्त सुकी भाकर व चटणीच मिळते परंतु त्या संतुष्ट आहेत. जर त्यांना वाटत असेल तर त्या असं बेअब्रुचं जीणं जगु शकतात. परंतु त्यांना स्वतचा सन्मान जास्त महत्वाचा वाटतो. आम्ही या सन्मानासाठीच लढतो. सन्मानाने राहणे हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. या सन्मानापर्यंत जात असतांना जेवढी जास्त आम्ही प्रगती करु तितकं ते चांगलं आहे. व यासाठी आम्ही जो त्याग  करु तो थोडाच आहे. वर्तमानपत्रवाले गेल्dया चाळीस वर्षापासून माझ्या मागे लागले आहेत. आता मला त्यांना हे सांगावसं वाटतं की आतातरी तुम्ही शहाणपणाची व गांभीर्याची भाषा बोला. आज आम्हाला अजून काही गोष्टींची आवश्यकता आहे जी आम्ही बौद्ध झाल्यावर पूर्ण होऊ शकते. असा माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या मृत्यूनंतर काय होईल याबाबत मी काहीही सांगू शकत नाही. या आंदोलनासाठी अजून बरच काही करायचं आहे. आम्ही ब्द्धौधम्म स्विकारल्dयावर खूप काही होऊ शकतें. बऱयाच कठीण प्रसंगाचा सामना करावा लागणार आहे. अशा येणाऱया संकटांचा सामना करण्यासाठी बऱयाच युक्त्या योजाव्या लागतील. या सर्व गोष्टींचा विचार मी केला आहे. मीच हा सर्व गोष्टींचा अधिकार लोकांना मिळवून दिला आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. व जे मी सांगत आहे. त्यावरही पूर्ण विश्वास ठेवावा. विरोधक जी टिका करीत आहेत त्यात काहीही तथ्य नाही. म्हणूनच त्यांच्या भ्रामक गोष्टींवर विचारही करु नका. 

मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की आमच्या या धर्मपरिवर्तनासंबंधी सगळीकडे चर्चा चालु आहेत. परंतु कोणीही मला असे विचारले नाही की तुम्ही बौद्धधम्माचा स्विकार का केला? सर्व धर्म सोडून शेवटी बौद्धधम्माचाच स्विकार का केला? धर्मांतराच्या कोणत्याही आंदोलनात हा प्रश्न महत्वाचा  ठरतो? धर्मांतर करतेवेळी हा विचार केला पाहिजे की कोणत्या धर्माला व का स्विकारायचे. मी हिंदू धर्माचा त्याग करण्याचे आंदोलन 1935 सालीच सुरु केले होते. व ते आंदोलन आजपर्यंत सुरु होते. येवल्dयाला (नाशिक जिल्हा) एप्रिल 1935 मध्ये या आंदोलनाअंतर्गत मोठ्या सभेचे (परिषदेचे) आयोजन  केले होते. त्या सभेतच एका प्रस्तावाद्वारे आम्ही हा निर्णय घेतला होता, की आम्ही हिंदु धर्माचा त्याग करु. त्याच सभेत 21वर्षापूर्वी मी हिंदु धर्माच्या त्यागाची प्रतिज्ञा केली होती व ती प्रतिज्ञा आज मी पूर्ण करुन दाखविली. धर्मांतरामुळे मी खूप आनंदी व प्रफुल्लीत आहे. मला असं वाटतं आहे की नरकातून मुक्त झालो आहे.  

मला कोणीही अन्धभक्त नको आहे. ज्या लोकांना बौद्धधम्मात यायचं आहे त्यांनी संपूर्ण विचार करुन बौद्धधम्माचा स्विकार करावा. ज्यायोगे ते या धम्माचे कट्टर अनुयायी होतील. मनुष्यमात्राच्या प्रगतीसाठी धर्माची आवश्यकता असते. मला हे चांगल्याप्रकारे माहित आहे की कार्लमार्क्सच्या सिद्धांतानुसार एक नवे मत झाले आहे. त्याच्या कथनानुसार धर्मामध्ये काहीही नाही. त्यांच्यासाठी धर्माचे काहीही महत्व नाही. त्यांचा धर्म केवळ असा आहे की सकाळी नाष्ट्यासाठी लोणी लावलेला टोस्ट खाणे, दुपारी स्वादिष्ट भोजन खाणे, झोपण्यासाठी मखमली बिछाना व पाहण्यासाठी सिनेमा असं त्याचं तत्वज्ञान आहे. मला अस तत्वज्ञान पटत नाही. माझ्या वडिलांच्या दारिद्री अवस्थेमुळे मला असलं कुठलही सुख प्राप्त झाले नाही. माझ्या आयुष्यात जितके कष्ट यातना मी सोसल्या आहेत. तेवढं कुणीही सोसलं नसेल. म्हणूनच गरीबांचे जीवन किती कष्टप्रद असते याचा मला अनुभव आहे. आर्थिक बाजू समोर ठेवूनच आमचे आंदोलन सुरु आहे. आणि म्हणूनच मी आजपर्यंत आपल्या लोकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी संघर्ष करीत आहे. फक्त एवढंच नव्हे तर संपूर्ण मानवजातीची आर्थिक प्रगती झाली पाहीजे.  

या संदर्भात माझे स्वतचे विचार आहेत. मनुष्यात व प्राण्यात खूप अंतर आहे. प्राण्यांना रोज खाण्यासाठी चाऱयाची आवश्यकता आहे. पंरतु मनुष्याला अन्न पाहिजे. प्राण्यांना चाऱयाशिवाय दुसऱया कुठल्dयाही गोष्टींची आवश्यकता नाही. परंतु मनुष्याला शरीराबरोबरच मन ही असते या दोन्ही गोष्टींवर विचार करण्याची जरुरी आहे. मन पवित्र व सुसंस्कृत बनविणे जरुरीचे आहे. अशा प्रकारेच शरीराला सुदृढ बनविण्यासाठी मन सुसंस्कृत असणे जरुरीचे आहे. अन्यथा असं म्हणणे निरर्थक होईल की मनुष्य प्रगती करतो आहे. 

मनुष्याचे शरीर अथवा मन रोगी का बनते? त्याचे कारण आहे की, मनुष्याला जोपर्यंत शारिरीक कष्ट असते तोपर्यंत त्याचे मन प्रसन्न राहत नाही. मनात उत्साह नसेल तर अभ्यूदय होऊ शकत नाही. मग उत्साह न राहण्याचे कारण काय? याचे कारण हे आहे मनुष्याला असा विश्वास आला आहे की त्याला पुढे जाण्यासाठी अवसरच दिला जात नाही. म्हणजेच त्याच्या मनात आशाच नाही, तर उत्साह कोठून येणार? तो मानसिक रोगी आहे ज्या व्यक्तीला आपल्या कर्माचे फळ मिळते त्यालाच आनंद मिळतो. जर शाळेमध्ये शिक्षक असे म्हणू लागले की हा कोण तर चांभार हा कसा पहिल्dया वर्गात पास झाला. याला पहिला वर्ग कशासाठी पाहिजे? कारण फक्त ब्राह्मणच पहिल्dयावर्गात पास होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्या चांभार विद्यार्थ्याला उत्साह कसा मिळेल? त्याची प्रगती कशी होईल. उत्साह निर्माणाचे मुळ कारण मन आहे, ज्याचे शरीर व मन मजबूत असतं ती व्यक्ती धैर्यवान असते. अशा व्यक्तीसमोर कुठलीच अडचण राहत नाही. प्रत्येक संकटाचा सामना करण्याचा त्याच्यात आत्मविश्वास असतो. याच्यामुळेच त्याच्यात उत्साह निर्माण होतो. हिंदुधर्माचे तत्वज्ञान अशा असमानता व अन्यायपूर्ण सिद्धांतावर अवलंबून आहे की ज्याच्या मुळे आजपर्यंत कोणलाही उत्साह मिळाला नाही. जर हा धर्म हजार वर्ष जरी जिवित राहिला तर फक्त एवढच होईल की, अशी माणसं तयार होतील जी फक्त स्वतचं पोट भरण्याइतपत पैसे कमावतील. पोट भरण्याशिवाय दुसरं काहीही करु शकणार नाहीत. मग अशा कारकुनांची रक्षा करण्यासाठी मोठ्या कारकुनाची आवश्यकता भासेल. पण यामुळे अस्पृश्यांचा काहीही फायदा होणार नाही.  

मनुष्याचे उत्साहाचे जर कुठलेही कारण असेल तर ते आहे मन. तुम्ही गिरणीमालकांना ओळखत असाल ते गिरणीमध्ये मॅनेजर नियुक्त करतात. त्यांचे काम गिरणीकामगारांकडून काम करवून  घेण्याचे असे. ते गिरणीमालक कुठल्dयांना कुठल्या व्यसनात गुरफटलेले असतात. कारण त्यांचे मन हे सुसंस्कृत व स्वच्छ नसते. आमच्या मनाचा विकास करण्यासाठीच आम्ही आंदोलन केले. मी शिक्षण कसे पूर्ण केले. गरीबीमुळे मी लंगोटी घालून शाळेला जायचो. शाळेत मला पिण्यासाठी पाणीही मिळत नसे. पाण्याशिवाय मी कित्येक दिवस राहिलो. मुंबईच्या एल्फीस्टन कॉलेजमध्येही माझी हीच अवस्था होती. जर अशी परिस्थिती राहिली तर गुलाम कारकुनच तयार होतील. मग अस्पृश्यांची प्रगती कशी होणार? 

ब्रिटीश शासन असतांना मी दिललमध्ये एक्जीक्युटीव कौन्सीलर होतो. त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय लॉट लिनलिधगो होते. एके दिवशी मी त्यांना म्हणालो, आपण मुसलमानांच्या नावावर अलिगढ विश्वविद्यालयाला तीन लाख रुपये दिले. हिंदुच्या नावावर बनारस विश्वविद्यालयाला तीन लाख रुपये दिले. परंतु आम्ही ना हिंदु आहोत ना मुसलमान जर आमच्यासाठी काही करायचे असेल तर याच्याहून कितीतरी पट अधिक खर्च करावे लागतील. जर एवढही आपण करु शकला नाही तर कमीतकमी मुसलमानांसाठी तुम्ही जेवढे करता तेवढेच आमच्यासाठीही करा. याबाबत लिनलिथगो मला म्हणाले, तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते मला लिहून द्या, त्यांच्या म्हणण्यानुसार मी एक दस्तऐवज लिहून त्यांना दिला. युरोपियन लोक फार सहानुभूती असतात. त्यांनी माझे म्हणणे मान्य  केले. परंतु या पैशाला कुठल्dयाप्रकारे खर्च करायचे याचा निर्णय होऊ शकला नाही. त्यांचा असा विचार होता की पैसे आमच्या समाजातील अशिक्षित मुलांवर खर्च केला जावा. जर त्यांना चांगले जेवण बनविण्यासाठी चांगले साहित्य पाहिजे हे साहित्य कुठुन देणार? कारण माझी जनता गरीब आहे. मग ही जनता आपल्dया शिक्षित मुलांच्या गरजा भागविण्यासाठी पैसा कुठून आणणार? तेव्हा या शिक्षणाचा काय उपयोग? बाकी सर्व गोष्टींवर सरकारने पैसा खर्च केला, परंतु शिक्षणावर होणारा खर्च बंद केला.  

एके दिवशी मी लॉर्ड लिनलिधगो यांच्याकडे गेलो असता मी शिक्षणविषयक खर्चासंबंधी त्यांच्याकडे खुल्dया मनाने बोललो मी त्यांना म्हणालो, जर तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक प्रश्न विचारु का? ते म्हणाले, हो विचारा ना! मी विचारले, काय हे खरं नाही की मी एकटा 500 ग्रॅज्यूएट यांच्या बरोबरीचा आहे. ते म्हणाले, हो मला मान्य आहे. मग मी त्यांना विचारले याचं कारण काय? यावर ते म्हणाले, मला माहित नाही, तेव्हा मी त्यांना सांगितले की स्वतच्या मेहनतीने, मी प्राप्त केलेल्dया ज्ञानामुळे, मी आज सरकारच्या कोणत्याही पदावर बसु शकतो. मला अशीच माणसे हवी आहेत जी किल्ल्dयावर मोक्याच्या जागी बसून शत्रूला व्यवस्थित टिपतील. याचप्रकारे शासकीय उच्चपदावर बसुन माझ्या गरीब लोकांवर देखरेख ठेवतील. त्यांची काळजी घेतील. जर आमच्या लोकांची प्रगती कायमची करायची असेल तर अशा लोकांना तयार केले पाहिजे तेव्हाच अस्पृश्यांची प्रगती होईल. केवळ क्लार्कांची पैदास करुन काय फायदा? माझ्या या म्हणण्याला लॉर्ड लिनलिथगोनी दुजोरा दिला व त्याच वर्षी 16 विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी परदेशी पाठविले. 

या देशामध्ये आम्ही हजारो वर्षापासून खुपच निराशेच्या अवस्थेत जगत आलो आहोत. जोपर्यंत ही अवस्था राहील तोपर्यंत आमची प्रगती होणे अशक्य आहे. अन्याय आणि असमानतेवर आधारीत असलेल्या हिंदु (ब्राम्हण) धर्मात राहून आम्ही काहीही करु शकत नाही. मनुस्मृती या ग्रंथात चातुर्वण्याचे समर्थन केले आहे. ही चातुर्वण्य व्यवस्था मनुष्यमात्राच्या उन्नतीकरिता घातक आहे. शुद्रांचे काम फक्त सेवा करणे त्यांनी शिक्षण कशाला घ्यावयाचे? या समस्याच निराकारण कसे होणार? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना शुद्रांच्या गुलामीपासून खुप फायदा आहे. परंतु शुद्रांकडे गुलामीशिवाय काहीच नाही. चातुर्वण्य व्यवस्था फुंकर मारुन उडवावी एवढी सोपी निश्चित नाही. ही केवळ रुढी न राहता हा एक धर्म बनला आहे. 

 हिंदु धर्मात कुठलीही समानता नाही. मी एकदा गांधीजींना भेटण्यास गेलो होतो. तेव्हा गांधीजी मला म्हणाले, ते चातुर्वण्य व्यवस्था मानतात. पण हा चातुर्वण्य कोणता व कसा? ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी मी बोटे एकावर एक करुन दाखविली व म्हणालो हा चातुर्वण्य असा आहे, का यांच्या उलट? याचा प्रारंभ आणि शेवट कुठे आहे? गांधीजीं माझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. ज्या लोकांनी आमचा नाश केला त्यांचा हा अन्यायपूर्ण धर्म त्यांच्यासमोरच नष्ट होईल. मी हिंदुधर्मावर उगीच आरोप करीत नाही. हा धर्म नष्ट झालेला आहे. या धर्मात काहीही शिलल्क राहिले नाही. हा धर्म मृत्यूपंथाला लागला आहे. 

आमचा देश विदेशी लोकांचा गुलाम का झाला? युरोपमध्ये 1939 पासून 1945 पर्यंत दुसरे महायुद्ध चालू होते. जेवढी फौज लढाईत मरत असे तेवढीच फौज रोज भर्ती होत असे. त्यावेळी असे कुणी म्हटले नाही की युद्ध जिंकण्याचे श्रेय कुणाला एकालाच प्राप्त झाले. हे सर्व देशवासीयांचे महान श्रेय होते. आमच्या देशाची गोष्टच वेगळी आहे. क्षत्रिय मेले की सर्व देश मरत असे हेच कायम होत राहिले. तात्पर्य क्षत्रियांच्या शत्रुने जिंकले की याचा अर्थ सर्व देशाला जिंकले असा होत असे आणि म्हणूनच देश कित्येक वेळा गुलाम बनला. जर आमच्या लोकांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा महान देश कधीही गुलाम बनला नसता. व ना कधी कुठल्या शत्रुने आक्रमण करुन या देशाला जिकंले असते. हिंदुधर्मात राहून कोणाचाही उद्धार होणार नाही. हिंदुधर्माच्या रचनेनुसार संख्येने कमी असलेल्dया परंतु तथाकथीत सवर्णांनाच पहिल्dयापासून फायदा होत आला आहे. ह्या कथनात तिळमात्र खोट नाही. शुद्र आणि अस्पृश्यांचा काय फायदा झाला? ब्राम्हणाची स्त्राr जर गर्भवती असेल तर तिचं लक्ष याकडे असते की उच्चन्यायालयात कुठले  न्यायाधिशाचे पद रिकामे आहे का? याउलट जर आमची स्त्राr गर्भवती असेल तर तिचे लक्ष इकडे असते की कुठे झाडू मारणाऱयाची जागा रिकामी आहे का? ही दुरावस्था हिंदुधर्माच्या व्यवस्थेमुळे आहे. या धर्मात राहून आमचे काहीही भले होणार नाही. जर आमची प्रगती व्हायची असेल तर केवळ बौद्धधम्मातच होईल.  

भगवान बुद्धाच्या धम्माला ब्राम्हणांनीही स्विकारले. शुद्रांनीही स्विकारले, त्या सर्व भिक्षूंना आदेश देतांना भगवान बुद्ध म्हणाले होते की, हे भिक्षूंनो तुम्ही वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या जातीतुन आला आहात. तुमच्या देशात अनेक नद्या वाहत असतात आणि त्यांचे वेगवेगळे अस्तित्व दिसत असते. पंरतु जेव्हा त्या सर्व नद्या सागराला येऊन मिळतात तेव्हा त्यांचे स्वतचे अस्तित्व नष्ट होते. बौद्धसंघ हा सागरासारखाच आहे. या संघामध्ये सर्वजण बरोबरीचे आहात. समुद्रात गंगा व यमुनेचे पाणी मिसळल्यानंतर तेव्हा गंगेचे कुठले व यमुनेचे पाणी कुठले हे सांगणे अशक्य असते तसेच तुम्ही सर्वजण या संघात आल्dयावर समान आहात. एकच आहात. असे सांगणारा एकच महापुरुष झाला आहे. आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय. 

जेव्हा लोक मला हा प्रश्न विचारतात की धर्मांतर करण्यासाठी इतका वेळ का घेतला? एवढे दिवस मी काय करित होतो? हा प्रश्न महत्वाचा आहे. धर्माची तत्वे दुसऱयाला समजावून सांगणे सोपे नाही. एका मनुष्याचे हे काम नाही. धर्मासंबधी आपण जर विचार केला तर तुम्हाला माझे सांगणे पटेल. आज माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे, तेवढी कोणावरही नाही. जर मी जास्त वर्षे जगलो तर हे सर्व कार्य मी पूर्ण करुन दाखविन.   

काही लोक म्हणतील, अस्पृश्यानी बौद्ध बनुन काय होणार आहे? या संदर्भात माझे एवढेच म्हणणे आहे की याप्रकारचे प्रश्न आपण विचारु नये. कारण अशा प्रश्नात धुर्तपणा लपलेला आहे. श्रीमंत लोकांना धर्माची आवश्यकता नसते. ज्या व्यक्ती उच्चपदावर आहेत त्यांच्याजवळ राहण्यासाठी बंगला आहे, त्यांच्याजवळ विपुल धन आहे. सेवा करण्यासाठी नोकर आहेत. त्यांच्याजवळ सर्वकाही आहे. अशा लोकांना धर्म स्विकारणेबाबत वा यावर विचार करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. 

धर्माची आवश्यकता केवळ गरीब लोकांसाठी आहे. दुःखी आणि पिडीत लोकांसाठीच धर्माची जरुरी असते. गरीब मनुष्य आशेवर जगत असतो. जीवनाचे मूळच आशेत असते. जर ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे काय चालेल. धर्म प्रत्येकाला आशावादी बनवतो. गरीब व पिडीतांना योग्य संदेश देतो की, घाबरण्याची काही आवश्यकता नाही. जीवन हे आशादायक आहे आणि नेहमीच आशादायक राहिल. म्हणूनच व्यक्ती धर्माला चिकटून ठेवतो. 

जेव्हा युरोपमध्ये इसाई धर्माचा प्रचार झाला त्यावेळी रोमच्या आसपासच्या देशाची अवस्था खूप वाईट होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी लोकांसाठी खिचडी वाटली जात असे. त्यावेळी त्यांच्यामध्ये इसाई मताचा प्रचार झाला. दुःखी आणि  पिडीत लोक या धर्माचे अनुयायी बनले. गिबन त्यावेळी म्हणाले होते की इसाई धर्म भिखारी लोकांचा धर्म आहे, आज इसाई धर्म संपूर्ण युरोपचा धर्म बनला आहे. व याचे उत्तर देण्यासाठी आज गिबन जिवित नाहीत. जर जिवित असते तर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना आपोआपच मिळाले असते. 

काही लोक असे म्हणतील की, हा बौद्धधर्म भंगी व चांभारांचा धर्म आहे. ब्राम्हण भगवान बुद्धांना  भौ गौतम म्हणूनच बोलवत असत. ब्राम्हण भगवान बुद्धांना याप्रकारे अपशब्द बोलून चिडवत असत. परंतु तुम्हाला माहिती असेल की परदेशात राम, कृष्ण, किंवा शंकर यांची मुर्ती विकण्यास ठेवली तर कोणीही घेणार नाही. परंतु भगवान बुद्धांची मुर्ती ठेवली तर एकही शिलल्क राहणार नाही. भारतात जे झाले, जे होत आहे. हे न पाहता भारताबाहेर पहा. जिकडे तिकडे भगवान बुद्धांचे नाव प्रसिद्ध आहे. मग हा धर्म पूर्ण जगात वाढणार यात शंकाच नाही. 

आम्ही आमच्या मार्गाने जाऊ, ते त्यांच्या मार्गाने जातील. आम्हाला नविन मार्ग मिळाला आहे. हा मार्ग आशेचे प्रतिक आहे. हा मार्ग उत्कर्षाचा महान मार्ग आहे. हा मार्ग नवीन नाही, हा आम्ही दुसरीकडून आणला नाही. हा श्रेष्ठ मार्ग इथलाच आहे. हा मार्ग भारतीय आहे. या देशात 2500 वर्षापूर्वी बौद्धधम्म होता. आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतं की आम्ही हा धम्म अगोदर का स्विकारला नाही. भगवान बुद्धांचा धम्म (तत्व) सार अजरामर आहे. तरीही बुद्धाने असा दावा केला नाही की माझा धम्म अपरिवर्तनीय आहे. या धम्मात वेळेनुसार बदलण्याची शक्ती आहे. एवढी उदारता इतर कोणत्याही धर्मात नाही. 

या देशात बौद्धधम्माचा नाश होण्यामागे मुख्य कारण या देशातील मुसलमानांचे अमानवीय आक्रमण होते. या आक्रमणात हजारो मुर्त्या तोडल्या गेल्या. भिक्षूंच्या कत्तली झाल्या या आक्रमणांना घाबरुन बौद्ध भिक्खू दुसऱ्या देशात निघून गेले. कोणी कुठे कोणी कुठे याचा प्रभाव असा झाला की येथे भिक्खूंची संख्या खूप कमी झाली. 

उत्तरपश्चिम प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलींद (मिनांडर) त्याला धर्मचर्चेची फार आवड होती. हिंदुधर्माच्या शास्त्रपंडितांना कित्येकवेळा वादविवादात त्याने पराभूत केले होते. आणि कित्य्sाकांना निरुत्तर केले होते. एके दिवशी त्याने विचार केला की बौद्धधम्माच्या विद्वान लोकांशी वादविवाद करावा. त्यासाठी त्याने आपल्या सेवकांना आदेश देऊन ठेवला होता की त्याच्या राज्यात जर कोणी बौद्ध धम्माचा पंडित आला तर त्याला माझ्याकडे घेऊन या. तेव्हा स्थानिय बौद्धलोकांनी धम्मधुरंधर भिक्खू नागसेन यांच्याकडे विनंती करुन राजा मिलिंद बरोबर वादविवादास प्रवृत्त केले. भिक्खू नागसेनांचा राजा मिलींदबरोबरचा जो विवाद झाला तो वादविवाद मिलींदप्रश्न या पुस्तकात छापला आहे.  

मिलींद राजाने एक प्रश्न विचारला होता की धर्माचा ऱ्हास का होतो? नागसेन भिक्खूनी या प्रश्नाचे उत्तर देतांना तीन कारणे सांगितली होती,  

पहिले कारण हे सांगितले होते की जो धर्म खरा असतो तोच कायमस्वरुपी टिकून राहतो., ज्या धर्माच्या मूळ पायात गंभीरता नसते तो धर्म काळधर्म असतो काही ठराविक काळानंतर या धर्माचा ऱ्हास होतो.  

दुसरे कारण हे आहे की धर्मप्रचार करणारे विद्वानच शिलल्क राहत नाही त्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो. ज्ञानी लोकांनी धर्मज्ञानाची चर्चा केली पाहिजे. विरोधकांचा वादविवादात पराभव करणारे धर्मप्रसारक विद्वान नसतील तर धर्माचा ऱ्हास होतो.  

तीसरे कारण हे आहे की, धर्म आणि धर्माची तत्वे विद्वानांसाठी असतात, साधारण लोकांसाठी मंदिरे आणि विहारे असतात. जिथे जाऊन लोक आपल्dया श्रद्धास्थानी असलेल्या विभूतींची पुजा करतात. 

आपण बौद्धधम्माचा स्विकार करतेवेळी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. बौद्ध धम्माची तत्वे काही काळासाठी आहेत अशी समजूत करुन घेऊ नये. आज 2500वर्षानंतरही बुद्धांच्या तत्वांना सारे जग मानत आहे. अमेरिकेत बुद्धधम्माच्या अनुयायांच्या 2000च्या वर संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करुन बौद्धविहार बांधले आहे. जर्मनीमध्ये तीनचार  हजार बौद्धसंस्था आहेत. बुद्ध तत्व आजही अजरामर आहे. तरीही बुद्धाने असा दावा केला नाही की माझी तत्वे महान आहेत. आणि ते असेही कधी म्हणाले नाही त्यांचा धर्म इश्वरीय आहे. भगवान बुद्ध स्वत म्हणाले होते की माझे मातापिता दोघेही सामान्य मनुष्यासारखे आहेत, ज्यांना हा धर्म चांगला वाटेल त्यांनीच त्याचा स्विकार करावा. इतकी उदारता तुम्हाला अन्य कोणत्याही धर्मात मिळणार नाही. 

दुसरे धर्म आणि बौद्धधम्म यात मोठा फरक हा आहे की, बौद्धधम्मातील महान तत्वे आणि मुळ आधार दुसऱया कोणत्याही धर्मात मिळणार नाही. दुसरे धर्म मनुष्याचा व ईश्वराचा घनिष्ठ संबंध आहेत असे दर्शवितात. दुसरे धर्म असे सांगतात की ईश्वराने संस्राची रचना केली आहे. त्यानेच आकाश, वायु, चंद्र, सुर्य आणि सर्व काही निर्माण केले आहे. इश्वराने सर्वकाही आमच्यासाठी निर्माण केले आहे, काही शिल्लक ठेवले नाही. यासाठी आम्ही ईश्वराची पुजाअर्चा करतो. इसाई धर्माच्या मतानुसार मृत्यूनंतर एक दिवस निर्णयाचा असतो. त्या निर्णयानुसारच सर्व काही निर्धारीत होत असते. 

ईश्वर आणि आत्म्याला बौद्धधम्मात कोणतेही स्थान नाही. भगवान बुद्ध म्हणत असत की जगात दुःख आहे. नव्वद टक्के लोक दुःखी आहेत. पीडीत आहेत. दुःखाने पीडीत असलेल्dया लोकांचा उद्धार करणे हा बौद्धधम्माचा मुख्य उद्देश आहे. कार्लमार्क्सने भगवान बुद्धाच्या धम्मापेक्षा जास्त काही सांगितले नाही. भगवान बुद्धाने जे काही सांगितले तो एक साधा व सरळ मार्ग आहे.  

बंधुनो आणि भगिनींनो जे मला सांगायचे होते ते सर्व मी सांगितले आहे. हा धम्म सर्वात चांगला धम्म आहे. या धम्मात कोणताही दोष नाही. हिंदुधर्मात अशी काही तत्वे आहेत, ज्यामुळे कोणालाही उत्साह मिळत नाही. हजारो वर्षापासून आपल्dया समाजातील कोणालाही विद्वान बनु दिले नाही. आपणासमोर माझ्या बालपणीची हकीकत सांगतांना मला कसलाही संकोच वाटत नाही. माझ्या शाळेत एक अब्राम्हण (मराठा) स्त्री होती ती स्वत अशिक्षीत होती, पंरतु मला कधीही ती स्पर्श करीत नव्हती. पोस्टमनला मी मामा असे संबोधीत होतो. शाळेत असतांना एके दिवशी मला तहान लागली म्हणून मी शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी चपरासीला बोलवून सांगितले, याला नळावर पाणी पाजून ये. चपराशीने नळ खोलला व मी पाणी प्यायलो. जर चपरासी नसला तर कित्येक दिवस पाणी प्यायला मिळत नसे. तहानलेल्या अवस्थेतच घरी येत होतो. घरी आल्यावर पाणी प्यायला मिळत असे. जेव्हा मी शिक्षण पूर्ण करुन परत आलो तेव्हा मला जिल्हा न्यायाधिश बना असा प्रस्ताव आला. पण या सरकारी नोकरीचा फंदा मी गळ्यात बांधून घेतला नाही. कारण मी सरकारचा नोकर झालो तर माझ्या अस्पृश्य लोकांची सेवा कोण करणार? हा विचार मी केला आणि नोकरीच्या फंदात पडलो नाही.  

वैचारिक दृष्ट्या देशातील कोणत्याही वाईट रुढीला विरोध करणे मला कठीण नाही. तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय व ब्राम्हणांनी जो जातीसंस्थेचा पर्वत उभा केला आहे. तो जातीसंस्थेचा पर्वत कोणत्या प्रकारे उलटा करायचा किंवा तोडायचा हा एक वास्तविक प्रश्न आहे? आणि म्हणूनच मला असं वाटतं की या धम्माचे पूर्ण ज्ञान तुम्हाला सांगणे हे माझे कर्तव्य आहे आणि या कार्यासाठी मी पुस्तक लिहून तुमच्या सर्व शंका दुर करुन तुम्हाला बौद्धधम्माचे पुर्ण ज्ञान देणार आहे. आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करा. 

आता तुमच्यावर बरीच मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. ही बरीच मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला असे काम करावे लागेल ज्यायोगे सर्वजण तुमचा आदर करतील. तुम्ही या धम्माचा स्विकारुन असं समजू नये की आपण गळ्यात एक मातीचे मडके बांधून घेत आहोत. बौद्धधम्माच्या दृष्टीने भारताची भूमी ओसाड जंगलासारखी आहे आणि म्हणूनच तुम्ही या शुन्यवत पवित्र धम्माचे उत्तम रितीने पालन करण्याची प्रतिज्ञा घ्यायला हवी. नाहीतर या धर्म परिवर्तनाची निंदा होईल आज तुम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करा की बौद्ध धम्म स्विकारुन तुम्ही फक्त स्वतचे नव्हे तर स्वतबरोबर या देशाचे आणि याबरोबर साऱया जगाचा उद्धार करायचा आहे. जगाचा उद्धार बौद्धधम्मामुळेच होऊ शकतो. जगात जोपर्यंत न्यायाला योग्य स्थान मिळत नाही तोपर्यंत जगात शांतता नादु शकत नाही.  

हे नविन कार्य खुपच जबाबदारीचे आहे. हे कार्य पुर्ण करण्यासाठी आपण दृढ संकल्प केला पाहिजे. आमच्या तरुणांना बरच काही करायचं आहे. या गोष्टी तुम्ही पुर्णपणे लक्षात ठेवल्या पाहिजेत. तुम्ही फक्त पोटाचे पाईक बनु नका. तुम्ही कमीत कमी आपल्या कमाईचा 20वा हिस्सा या पवित्र धम्मकार्यासाठी देण्याचा निश्चय करा. मला तुम्हा सर्वांना माझ्याबरोबर घेऊन जायचे आहे. तथागतांनी पहिल्यांदा फक्त थोड्याच व्यक्तींना धम्माची दीक्षा दिली व त्यांना आदेश दिला की या पवित्र धम्माचा प्रचार  करा. त्यानंतर यश नावाचा एक विद्वान आणि त्याबरोबर 40 व्यक्तींनी धम्माची दीक्षा घेतली. यश्स सुद्धा एका श्रीमंत  घराण्यातील मुलगा   होता.  त्यांना भगवान बुद्ध म्हणाले की हा धर्म बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकम्पाय आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्यवसान कल्याणं अर्थात बहुजनांच्या हितासाठी आहे. बहुजनांच्या सुखासाठी आहे. आणि सर्व लोकांवर अनुकंपा करण्यासाठी आहे. हा आदि, मध्य आणि अन्ती कल्याणकारक आहे. भगवंतांनी परिस्थितीनुसार धम्मप्रचाराची वेगवेगळी पद्धत सांगितली आणि आम्हालाही वेळेनुसार ह्या धम्माची दीक्षा स्वत घ्यायला हवी. या गोष्टींची मी घोषणा करतो की बौद्धधम्माची अनुयायी असणारी प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला त्रिसरण पचंशील आणि 22 प्रतिज्ञा देऊन बौद्धधम्माची दीक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आहे. 

धम्मदीक्षेच्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com