भिवंडी:
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा चार मजली इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी जमीन मालकासह कुटुंबावर शांतीनगर पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुर्तुजा गुलाम मो.मोमीन (जमीन मालक) श्रीमती रेहाना गुलाम मोमीन, जैद इकबाल मोमीन आणि इकबाल गुलाम मुस्तफा मोमीन (सर्व रा.नवीन कणेरी ,भिवंडी )असे फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या अवैध बांधकाम धारकांची नांवे आहेत.
जमीन मालक मुर्तुजा मोमीन यांनी शहरातील नवीन कणेरी, साई नगर, गैबीनगर परिसरातील त्यांच्या जागेत स.नं.१८/१(अ ) या जमिनीवरील जुने घर नं.९८१ या घरावर ३८ x ४० चौरस फुटाचे तळ मजला अधिक चार मजल्याचे नवीन बांधकाम केले आहे. हे बांधकाम करताना त्याने पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे प्रभाग कार्यालयीन अधिक्षक सोमनाथ सोष्टे यांनी जमीन मालक मुर्तुजा मोमीनसह त्याच्या कुटुंबातील तीन जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९५२ चे कलम ५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल तुषार बोरसे करीत आहेत. भिवंडी-निजामपुर महानगर पालिका क्षेत्रात अनेक अनधिकृत बांधकाम सुरु असून याबाबत लवकरच तपास करून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या