Top Post Ad

शीळ फाटा येथील वाहतूक कोंडी टळणार, ऐरोली ते डोंबिवली अंतर अवघ्या १५ मिनिटांत

 ऐरोली-काटई एलिव्हेटेड प्रकल्पातील दुसऱ्या टनेलच्या कामाला शुभारंभ
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लास्टिंग

ठाणे 
ठाणे-बेलापूर एलिव्हेटेड मार्गाचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या ऐरोली-काटई मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ब्लास्टिंग करून सुरुवात करण्यात आली.  याप्रसंगी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते. ऐरोली-काटई बोगद्याची लांबी १.६८ किलोमीटर इतकी असून बोगद्याच्या दोन्ही मार्गिका प्रत्येकी तीन-तीन अशा सहापदरी असणार आहेत. बोगद्यात दोन्ही बाजूला डागडुजीच्या कामासाठी एक रेफ्युज लेनदेखील असणार आहे. याशिवाय या बोगद्यातील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी एग्झॉस्ट फॅन, सीसीटिव्ही यंत्रणा आणि उच्च प्रतीची अग्निशमन यंत्रणादेखील असणार आहे. कल्याण ग्रोथ सेंटर आणि विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे भविष्यात हा मार्ग या परिसराच्या कायापालट करण्यास कारणीभूत ठरू शकेल,.


या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मु्ंबई आणि कल्याण-डोंबिवली ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. तर या नवीन मार्गामुळे शीळ फाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असल्यामुळे ऐरोली ते डोंबिवली हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. सध्या ऐरोली आणि मुंब्रा या दोन्ही बाजूंकडून या मार्गावरील टनेलचे काम वेगात सुरू आहे. त्याशिवाय ऐरोली-काटई मार्गाच्या पुढे वाय जंक्शन ब्रिजचे कामही सुरू आहे. शीळफाटा उड्डाणपुलाची निविदा प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असून लवकरच या उड्डाणपुलाच्या कामाला देखील सुरुवात होईल. “पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे) ज्या पद्धतीने मुंबई ते ठाणे शहरांना जोडतो, तसाच हा ठाणे बेलापूर एलिव्हेटेड फ्री वे असेल. त्यामुळे भविष्यात या भागात वाढणारी लोकसंख्या आणि त्यांची रस्त्यांची गरज लक्षात घेता हा मार्ग वाहतूककोंडीची समस्या दूर करण्याचा दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे,” असे  शिंदे यांनी यावेळी सांगितले.

“या मार्गाचे काम येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर ऐरोली आणि काटई यातील अंतर कमी झाल्याने या भागातील वाहतूक अधिक गतिमान होईल. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात डोंबिवली नजीक फ्लायओव्हर येणार असल्याने, तसेच शीळफाटा येथे ओव्हरब्रिज आणि अंडरपास येणार असल्याने भविष्यात या भागात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी बऱ्याच अंशी कमी होईल. तसेच, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरपर्यंतच्या रहिवाशांना त्याचा लाभ मिळेल,” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com