याचा अर्थ महाराष्ट्राचं चित्र बदलतंय- शरद पवार

पुणे व नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीची प्रथमच मुसंडी  

 मुंबई:
विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीनं निर्विवाद बाजी मारत भाजपला धोबीपछाड दिली आहे. विशेषत: पुणे व नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या रूपानं महाविकास आघाडीनं प्रथमच मुसंडी मारली आहे. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 1 डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ वगळता जवळपास सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निकालानंतर शरद पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.  

'धुळे-नंदुरबारमधील निकाल आमच्यासाठी अजिबात आश्चर्यकारक नव्हता. कारण, तिथे निवडून आलेले विद्यमान आमदार होते. राजीनामा देऊन ते पुन्हा उभे राहिले होते. त्यांच्या पाठीशी एक मोठा वर्ग होता, तो कायम राहिला. त्यामुळं तो विजय भाजपचा खरा विजय नाही,' असं पवार म्हणाले.  

'नागपूर पदवीधरच्या जागेवर गेली अनेक वर्षे आम्हाला कधी यश मिळालं नव्हतं. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडं अनेक वर्षे त्या जागा होत्या. तिथंही काँग्रेसच्या उमेदवाराच्या रूपानं महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. पुणे विभागाचा निकाल यापूर्वी आम्हाला अनुकूल नव्हता. मात्र यावेळी तो मोठ्या फरकानं आम्हाला अनुकूल आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचं चित्र बदलतंय. त्या बदलाला सर्वसामान्य लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे. महाविकास आघाडीनं एकत्रित काम करताना जी कामगिरी केली आहे, त्यावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे हेच यातून दिसतं,' असं शरद पवार म्हणाले. सर्व विजयी उमेदवारांचं त्यांनी अभिनंदनही केलं.  


विदर्भातील आपला गड सांभाळता आला नाही आणि महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने  पडत आहेत - सचिन सावंत 

मुंबई: 'महाविकास आघाडी सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे कॉम्बिनेशन हिट झाले आहे,' असा सणसणीत टोला काँग्रेसचे प्रवत्ते सचिन सावंत यांनी भाजपला हाणला आहे. भाजपवर नामुष्की ओढवलेली असल्यानं ऑपरेशन कमळला आता वेग येईल व ईडी, इन्कमटॅक्ससारख्या यंत्रणांना महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लावले जाईल, अशी शक्यताही सावंत यांनी बोलून दाखवली. वर्षानुवर्षे भाजपच्या ताब्यात असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघही त्यांच्या हातून निसटला आहे. फडणवीसांकरिता वारसा हक्काच्या या मतदार संघातून त्यांचे वडील लढले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 25 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते, तो गड त्यांना राखता आलेला नाही. 55 वर्षांपासूनचा भाजपाचा हा बालेकिल्ला आता ढासळला आहे. विदर्भातील आपला गड फडणवीसांना सांभाळता आला नाही आणि महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने त्यांना पडत आहेत. मतदारांनी भाजपाला नाकारले आहे, असं ते म्हणाले.  

विधान परिषदेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. 'चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सुशिक्षित मतदार बेरोजगारी, आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. केंद्रातीलम मोदी सरकारमुळेच हे झाल्याची लोकांची खात्री झाली आहे. सुशिक्षित मतदारांनी हा राग मतदानातून व्यक्त केला. याशिवाय, मागील वर्षभरापासून भाजप महाराष्ट्र द्रोही भूमिका घेत होता. पत्रकार अर्णव गोस्वामी, अभिनेत्री कंगणा राणावत यांच्याबरोबर हा पक्ष वाहवत जात होता. मुंबईचा अपमान करण्राया कंगनाला भाजपचे नेते झाशीची राणी म्हणत होते. महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा सातत्यानं अवमान केला जात होता, तो संतापही निवडणुकीतून व्यक्त झाला,' असा दावाही सावंत यांनी केला.  

'भाजपच्या रूपाने लोकशाही समोर मोठे संकट उभे आहे. यातून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. देशहितासाठी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. या गरजेतूनच महाराष्ट्राला एक स्थिर सरकार दिले गेले असून आजचा निकाल हा या तीन पक्षाच्या एकोप्याचे फळ आहे. भाजपाचे 105 आमदार कामी आले नाहीत. एक जागा मिळाली तीही पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्यामुळे. मस्तवालपणात वागण्राया भाजपासाठी ही मोठी चपराक असून दोन दिवसांपूर्वीच 105 चे 150 होतील अशा वल्गना करण्राया देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे, असा सावंत म्हणाले.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA