गावविकास आराखडा पुढच्या पिढीचा पाया – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते
जिल्हास्तरीय 'आमचा गाव आमचा विकास' कार्यशाळा संपन्न
ठाणे
एखाद्या गावाची समस्या किंवा गावाला आवश्यक असणाऱ्या गरजांची पूर्ण माहिती त्या गावातील गावकऱ्यांना व्यवस्थितपणे माहित असते. त्यामुळे गावाचा विकास आराखडा गावकऱ्यांनी तयार केल्यास हा आराखडा पुढच्या पिढीचा पाया ठरू शकतो असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी व्यक्त केला. सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात 'आमचा गाव आमचा विकास' या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करून ग्रामपंचायत विकास आराखडा कसा तयार करावा याचे प्रशिक्षण विविध आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. सातपुते पुढे म्हणाल्या की, प्रत्येक गावाच्या गावकऱ्यानी स्वत:च्या गावाचा वार्षिक आणि पंचवार्षिक विकास आराखडा तयार करणे महत्वाचे आहे. असे केल्याने गावाच्या विकासाला चालना मिळेल.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार यांनी करून उपक्रमाचे महत्व आणि रूपरेषा विशद केली. याप्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) अजिंक्य पवार, मुख्य लेखा व वित्तधिकारी सुभाष भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे, महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) शेषराव बडे, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) ललिता दहितुले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे, गट विकास अधिकारी शहापूर अशोक भवारी, गट विकास अधिकारी अंबरनाथ शीतल कदम, गट विकास अधिकारी कल्याण श्वेता पालवे, गट विकास अधिकारी भिवंडी डॉ.प्रदीप घोरपडे, गट विकास अधिकारी मुरबाड संघरत्ना खिलारे , सहायक गट विकास अधिकारी हणमंतराव दोडके, प्रशिक्षक मीनल बाणे , एन. देसले, पी.हरड, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
१५ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार आमचा गाव, आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी विविध स्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. आजची कार्यशाळा ही जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख, राज्य शासनाच्या विभागांचे जिल्हास्तरीय विभागप्रमुख, जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेत यशदा येथे प्रशिक्षण घेतलेले तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी आमचा गाव आमचा विकास उपक्रमाची ओळख व उद्देश याची माहिती सांगितली. गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत अधिकऱ्यांची भूमिका व जबाबदाऱ्या काय आहेत याची माहिती सांगितली. त्याचबरोबर योजनांचे अभिसरण, मूल्यमापन व ध्ययेनिश्चिती कशी असावी याबाबत सखोल मार्गदर्शन कार्यशाळेत करण्यात आले. आगामी काळात या उपक्रमाच्या कार्यशाळा गावपातळीवर, विभाग, तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक आदी समाजातील विविध घटकांना एकत्र करून ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.असे उप मुख्य कार्यकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
0 टिप्पण्या