Top Post Ad

"भोपाळ-कांडा"ची ३८ वर्षे : सब भूमी `भोपाल' सी...

   "भोपाळ-कांडा"ची ३८ वर्षे : सब भूमी `भोपाल' सी...  

आचार्य विनोबा भावे यांनी `सब भूमी गोपाल की' म्हणजेच सगळ्या जमिनींचा मालकी हक्क श्रीकृष्णाचा म्हणत `भूदान'  चळवळ सुरू केली होती. कालौघात यातील अनेक जमिनींवर औद्योगिक वसाहती उभारल्या गेल्या. त्या वसाहतींमधील औद्योगिक सुरक्षा पाहिली की `भोपाळ वायूकांड' आठवते. त्यामुळेच सब भूमी `भोपाळ' सी असं खेदानं म्हणावं लागतंय.  

2 डिसेंबर 1984 ची मध्यरात्र ही भोपाळवासियांसाठी काळरात्र ठरली. `युनियन कार्बाईड'  या किटकनाशक बनवणाऱया कंपनीतून `मीक वायू' वातावरणात सुटला आणि त्यातून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 25 ते 30 हजार निष्पाप नागरिकांचा बळी गेला. मृतांचा खरा आकडा हा तीन दशकांनंतरही उघड झालेला नाही, ही खेदाची बाब आहे. ही दुर्घटना का घडली, कशामुळे घडली यावर बरंच शोधकार्य झालं. पण आज राजधानी दिल्ली, ठाणे जिह्यातील डोंबिवली-कल्याण पट्ट्यातील औद्योगिक प्रदूषणं पाहिली की, या `भोपाळ वायूकांडा'पासून आपण किती अन् काय धडे घेतले हेही शोधकार्य करावं लागेल.  
आपण भोपाळ वायूकांडाचा स्मृतीदिन पाळत आलोय. ही दुर्घटना जगभरातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना म्हणून गणली जाते. या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेबाबत आपण सजग झालेलो नाही, कारण अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. मागच्याच महिन्यात कल्याणमध्ये एका विहिरीत विषारी वायुमुळे पाच कामगारांचा बळी असो अथवा डोंबिवली शहर हे दुसरं भोपाळ होतंय की काय अशी दुर्घटना घडलेल्या `प्रोबेस' कंपनीतील बॉयलर स्फोट असो; यातून संबंधित यंत्रणा काहीच बोध घेताना दिसत नाहीत.  
आज देशाची राजधानी दिल्ली ही हवा प्रदूषणाचीही राजधानी ठरत असताना ठाणे जिह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, कल्याण, डोंबिवली ही देशात `प्रदूषित शहरं' म्हणून नावारूपाला आली आहेत. प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवलीचा संपूर्ण देशात 14 वा क्रमांक लागतो. काही वर्षांपूर्वी याच डोंबिवली शहरात `कलरफूल पाऊस' पडला होता. त्याचं आम्हा सामान्यजनांना कोण कौतुक. पण हा रसायनमिश्रीत पाऊस किती घातक ठरू शकतो, हे गेल्या काही महिन्यांमध्ये वारंवार घडत असलेल्या औद्योगिक अपघातांवरून दिसून येतंय.  
डोंबिवली हे देशातील एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र. अनेक रासायनिक कारखाने या वसाहतीमध्ये आहेत. परंतु इथल्या 90 टक्के कारखान्यांनी पर्यावरणाबाबतचे सगळेच नियम धाब्यावर बसवलेले दिसून येते. या कारखान्यांमधून नष्ट होणारी रसायनं कोणतीच प्रक्रिया न करता रात्रीच्या अंधारात इथल्या गटारं-नाल्यांमधून सोडून देतात. त्यातून उद्भवणाऱया वायू प्रदूषणामुळे सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आलं आहे.  
देशाबरोबर राज्यभरातील औद्योगिक वसाहतींमध्ये होणारे अपघात आणि त्यात बळी जाणाऱया नागरिकांची संख्या दिवसेन् दिवस वाढत आहे. यातील अनेक शहरं ही खरं तर नागरी वसाहतींची. पण संबंधित यंत्रणांच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे आणि नियोजनाअभावी या शहरांच्या मध्यभागीच औद्योगिक क्षेत्र निर्माण झाली आहेत. ही शहरं आज रासायनिक ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहेत. डोंबिवली हे त्यातलं प्रमुख प्रातिनिधिक उदाहरण म्हणावं लागेल.  
डोंबिवलीपाठोपाठ तळोजा औद्योगिक वसाहतही धोक्याच्या वळणावर आहे. या वसाहतीमधून वारंवार स्फोट, आगीच्या दुर्घटना घडताना दिसतात. आगीचे अक्षरश तांडव पाहणाऱया या वसाहतीत असलेल्या 970 कारखान्यांची `अग्नी सुरक्षा' केवळ 18 कर्मचाऱयांच्या हाती आहे. यातूनच संबंधित यंत्रणांचा ढिसाळ कारभार लक्षात येतो. राज्यातील सगळ्याच औद्योगिक वसाहतींचं आता पर्यावरणीय ऑडिट केलं पाहिजे. तरच काही प्रमाणात का होईना संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी थोड्याफार प्रमाणात हालचाली सुरू होतील. कारण बैल गेला नि झोपा केला ही वृत्ती आपण पूर्वापार जपत आलोय.  
पालघरची बोईसर औद्योगिक वसाहत ही देखील धोकादायक वसाहत म्हणून गणली जाऊ लागलीय. सुमारे दीड हजारांहून अधिक कारखान्यांच्या सुरक्षेबाबत व्यवस्थापनाबरोबरच कुठलीही यंत्रणा सजग नसल्याचे दिसून येते. एका अभ्यास पाहणीनुसार, या औद्योगिक क्षेत्रात वर्षभरात 25 कामगारांचा मृत्यू हा रासायनिक  दुर्घटनांमुळे होत असल्याचं उघड झालंय. अकुशल कामगार आणि सुरक्षा यंत्रणांचा हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत ठरत असतानाही कोणतीच कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही.  
कोकणातील लोटे-परशुराम असो की, रायगडमधील रोहे औद्योगिक वसाहत; येथील रासायनिक कारखान्यांमधून त्यांचा नष्ट करायचा वायू जमिनीखाली खोल विहीरी खणून त्यात सोडला जातोय. यामुळे जमिनीची वाताहत होत आहे. या वसाहतींमधूनही ज्वालामुखीचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही, अशी भिती स्थानिक व्यक्त करतात. पंजाबमधील बठिंडा हे शेतीप्रधान शहर. पण या शहरात तसेच आसपासच्या अनेक शहरांमधून उभ्या रहात असलेल्या औद्योगिक वसाहतींमधून निणघारा रासायनिक वायू येथील पाण्यात, हवेत मिसळला जात आहे. तसेच शेतीमध्ये फवारली जाणारी रासायनिक द्रव्येही हवेत मिसळून ही गावं आज कँसरग्रस्त गावं झाली आहेत. हे प्रमाण इतकं वाढलं आहे की, बिकानेर येथील कँसरवर उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या एका आरोग्यकेंद्रात पंजाबमधून झुंडीच्या झुंडी जात आहेत. त्यासाठी बठिंडा-बिकानेर ही रेल्वे सेवा उपलब्ध केली असून ही गाडी आज `कँसर ट्रेन' म्हणून ओळखली जाऊ लागलीय, यावरूनच हवेत-पाण्यात मिसळणाऱया रासानिक प्रदूषणाचं गांभीर्य लक्षात येतं.  
`समुद्रवसने देवि पर्वतस्तन मंडले। विष्णूपत्नी नमोस्तुभ्यं पादस्पर्शे क्षमस्वमे।।' या श्लोकातून मातृभूमी पृथ्वीची प्रार्थना आपण सकाळी उठताना जमिनीवर पाय ठेवताना करतो. पण या प्रार्थनेचा मतितार्थ आम्ही समुद्र-नद्या प्रदूषित करून विसरून जातो. मध्यंतरी उल्हासनगरच्या वालधुनी नदीत घातक रासायनिक वायूचा टँकर ओतल्याचं उघडकीस आलं. याचा परिणाम येथील 125 नागरिकांच्या आरोग्यावर झाला. अशाच प्रदूषित नद्या राज्यातील इतर भागांमधून दिसून येतात. चंद्रभागा, इंद्रायणी, गंगा या नद्या पुराणकाळापासूनच पवित्र मानल्या गेल्यात. पण आज या नद्या सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून ओळखल्या जातात. उल्हास नदीला तर `नदी' म्हटलेलं हे खेदाने हस्यास्पद ठरेल. आजूबाजूच्या औद्योगिकीकरणाचं रासायनिक पाणी या नदीत सोडून ही नदी आज ठाणे जिह्याचं मोठं गटार ठरलीय. या नदीत तर थेट गुजरातमधल्या कारखान्यांची रसायनं टँकरमधून सोडली जातात. हे जगजाहीर असलं तरी कुठलीच यंत्रणा यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.  
औद्योगिक सुरक्षेकडे कानाडोळा केल्याने येथील रासायनिक कारखाने हे `मृत्यूचा सापळा' बनले आहेत. संपूर्ण पर्यावरण सृष्टीच्या अस्तित्वावरच घाला घालणाऱया या कारखान्यांमधून बाहेर पडणारा रासायनिक वायू, त्यामुळे वारंवार घडणारे अपघात, दुर्घटना, त्यातून होणारी मनुष्य हानी यावरून `भोपाळ वायूकांडा'नंतरच्या तीन दशकांनंतरही औद्योगिक सुरक्षेबाबतची परिस्थिती `जैसे थे'च असल्याचं दिसून येतं. `युनियन कार्बाईड'चा तत्कालिन प्रमुख आणि भोपाळ वायूकांडाचा प्रमुख आरोपी वॉरन अँडरसन हा 25 हजार निरपराध नागरिकांचे बळी घेऊन 30 वर्षे मजेत जगू शकला, हे निष्पाप बळी पचवू शकला, हीच मानसिकता प्रत्येक औद्योगिक क्षेत्र हे `दुसरं भोपाळ' ठरू शकेल अशी भिती व्यक्त करण्यामागचं खेदजनक द्योतक आहे.  
2 डिसेंबर दरवर्षीच येत राहणार. `भोपाळ स्मृतीदिन'ही दरवर्षी `साजरा'  होणार आणि पुन्हापुन्हा दररोज रासायनिक दुर्घटना ऐकायला-वाचायला मिळणार. कारण प्रत्येक दुर्घटनेनंतर उचललं जाणारं कारवाईचं पाऊल हे पुढे येण्याऐवजी त्याच जागेवर खिळून आहे. कारण `बैल गेला अन् झोपा केला'  ही आमची मानसिकता जगजाहीर आहे...  

मनीष चंद्रशेखर वाघ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com