चुकीच्या कामाची चौकशी होणारच - पाटील

मुंबई 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या कथीत घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे आदेश सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी जारी केले आहेत. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत माहिती दिली. 'अध्यक्ष कोणीही असले तरी, चुकीच्या कामाची चौकशी होणारच,' असे वक्तव्य  पाटील यांनी केले.

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत. दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना मुंबै बँकेबद्दल अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. नंतर दरेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 5 वर्षात या प्रकरणी कुठलीही चौकशी झाली नाही. आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुंबै बँकेच्या कथीत घोटाळ्याबाबत चौकशी करण्याचे आदेश सहकार खात्याकडून देण्यात आले आहेत. आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. 'मुंबै बँक नफ्यात आहे. बँकेला अ वर्ग दर्जा मिळाला आहे. या बँकेवर माझ्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही प्रतिनिधी आहेत. पण, मागील काही दिवसांपासून आम्ही सरकारच्या अनेक घोटाळ्यांबाबत बोललो. त्यामुळे सूडाचे राजकारण करत ही चौकशी करण्यात येत आहे,'अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


 मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (मुंबै बँक) राज्यकर्त्यांनी आपल्या मनमानीचा कहर करीत आणखी आर्थिक घोटाळा केल्याचे बँकेच्या दक्षता पथकाने केलेल्या चौकशीतून २०१७ साली उघडकीस आले होते. यातील पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या कर्ज योजनेतून अनेक सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज प्रकरणे केली.  यासोबत पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना बेकायदा कर्ज मंजूरी दिली. अन् त्याही पुढे जाऊन अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना कर्ज मंजूर करून कोटय़वधी रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले . मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये यासाठी बँकेचे पदाधिकारीच हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काही संचालकांनी केला.  महत्त्वाचे म्हणजे, कर्ज खातेदारांच्या खात्यावरून पैसे काढून घेणाऱ्यांमध्ये बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या मेहुण्यासह शाखाधिकाऱ्याचाही समावेश आहे. महेश पालांडे हे बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे नातेवाईक असून १२ कर्ज प्रकरणात कर्ज खातेदारांच्या खात्यातून पालांडे यांच्या अशोकवन शाखेतील खात्यावर (क्र.५१/१०/०१/४९२) तब्बल १२ लाख २० हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र पालांडे यांच्या खात्यातून कर्जदारांच्या खात्यावर केवळ एक लाख १२ हजार ४०० रुपये वळविण्यात आले. अन्य एका प्रकरणात कर्जदाराच्या खात्यावरून अमोल खरात यांच्या अशोकवन शाखेतील खात्यात (खाते क्र. ५१/१०/०१/१०)  २.४० लाख रुपये जमा करण्यात आले तर खरात यांच्या खात्यातून केवळ अनिरुद्ध रईजादे या कर्जधारकाच्या खात्यावर केवळ १० हजार रुपये जमा करण्यात आले. याचप्रकारे राजेंद्र घोसाळे यांच्या ठाकूर व्हिलेज कांदिवली येथील खात्यावर (खाते क्र. ४९/१०/०१/१७९५) कर्ज खातेदारांच्या खात्यातून दोन लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बँकेच्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले ठाकूर व्हिलेज कांदिवली शाखेचे व्यवस्थापक सी. ए. खानविलकर यांच्या खात्यावर (खाते क्र. १६/१३/१०/१५३) अमोल खरात यांच्या अशोकवन शाखेतील खात्यातून (खाते क्र. ५१/१०/१/१०) सव्वा लाख रुपये जमा झाले असून ही रक्कम नेमकी कोठून आली याचा खुलासा व्यवस्थापकांनी केलेला नसल्याचे अहवालात म्हटले आहे. या घोटाळ्याबाबतचा चौकशी अहवाल संचालक बैठकीत मांडावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,  अशी मागणी बँकेचे संचालक नंदकुमार काटकर व अभिजित अडसूळ यांनी केली  ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर, अंधेरी पूर्व आदी शाखांमध्ये बनावट कर्ज प्रकरणांच्या माध्यमातून कोटय़वधींचा अपहार होत असल्याची तक्रार एका सभासदाने थेट नाबार्डकडे केल्यानंतर या घोटाळ्यास वाचा फुटली. नाबार्डच्या आदेशानुसार बँकेच्या दक्षता पथकाने गेले दोन महिने विविध शाखांमध्ये केलेल्या तपासणीतून या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे उघड झाले. कांदिवली पूर्व आणि अशोकवन या दोन शाखांमधील ५५ कर्जप्रकरणे बोगस आढळून आली आहेत. बँकेशी संबंधित काही मंडळींनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणत्याही प्रकरणात कर्जव्यवहाराचे करारपत्र न करताच, पात्रतेपेक्षा अधिक कर्ज मंजूर करणे, नोकरीत कायम न झालेल्या कर्मचाऱ्यांना कर्ज देणे, बनावट दस्तावेजांच्या आधारे कर्ज देणे, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज प्रकरणे केली व त्यांच्या खात्यावर जमा झालेले पैसे नंतर आपल्या खात्यावर वळते करून घेत हा घोटाळा केला. अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी मागील पाच वर्षापासून रखडलेली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad