Top Post Ad

चैत्यभूमीवर गर्दी नको- मुख्यमंत्र्यांनी घेतला विविध यंत्रणाकडून आढावा

 महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  घरातूनच अभिवादन करा, 
चैत्यभूमीवर गर्दी नको, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण, ऑन-लाईन माध्यमातून दर्शन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला समन्वय समिती, विविध यंत्रणाकडून आढावा


मुंबई  महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून  विचारांची प्रगल्भता दाखवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( दि. २३) केले. 

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली.  या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख,  खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकूमार जायस्वाल,आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह,  मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ज्येष्ठ विचारवंत डा. भालचंद्र मुणगेकर, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सचिव नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सी. एल. थूल उपस्थित होते.

 महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वागत केले. तसेच समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्याय्याविरोधात संघर्ष करत राहीले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट जाता जात नाही. ते संपले असे मानू नये. चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब याना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापुर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहे. डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले.  महापरिनिर्वाण दिनी गर्दी न करता, मोजक्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्याचा महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा निर्णय स्वागतार्हच असाच आहे. सरकार म्हणून आम्ही जबाबदारी घेतली आहे. पण आता अनुयायी म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल. आपण बाबासाहेबांकडून प्रेरीत आणि भारीत होऊन समाजाला पुढे नेऊ या. माझ्या आजोबांचे आणि डॉ. बाबासाहेब यांचे ऋणानुबंध होते. त्यांच्यामध्ये स्नेह होता. हे ऋणानुंबध आपण समाजापर्यंत नेऊ या, असेही त्यांनी सांगितले.

गृह मंत्री देशमुख म्हणाले की, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने चागंली भूमिका घेतली आहे. आतापर्यंत सर्वधर्मीयांनी सणवार अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकट काळात तो साधेपणाने व्हावा. नियमांचे पालन केल्यास या संकटाला रोखता येणार आहे. अभिवादन आणि दर्शनासाठी गृह विभागांसह सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्य सचिव  संजय कुमार यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने शासन-प्रशासन परिपूर्ण तयारी करेल, असे सांगून आभार मानले.

--------------------------

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचा विरोध

चैत्यभूमिला अभिवादन करण्यास आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने शेकडो भिमानुयायी जाणारच असा इशारा राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही घटक पक्षाला विश्वासात न घेता स्वतःची मते लादत आहेत. जे पक्ष या निर्णयाचे समर्थन करत आहेत त्या पक्षाचा सुद्धा  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने युवाध्यक्ष कनिष्क कांबळे व केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी  तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. सर्व प्रार्थनास्थळे उघडली असून सर्वधर्मीयांना दर्शनास परवानगी दिली असताना केवळ आंबेडकरी जनतेच्या अस्मितेशी खेळून त्यांच्या भावना दुखावणार्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे डॉ. माकणीकर यांनी म्हटले आहे.

 आंबेडकरी जनतेच्या भावनेचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन करण्यासंबंधीचे निर्देश मागे घ्यावेत व कोरोनावर उपाययोजना करून अभिवादन करण्यास सहकार्य करावे अन्यथा आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानासमोर काळे झंडे दाखवून तिव्र निदर्शने करण्यात येतील.  डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन निवडुन आलेल्या सरकारणे आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटना व धर्मगुरूंना या बाबत विश्वासात घ्यायला पाहिजे असल्याचे मतही पक्षाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी व्यक्त केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com