Top Post Ad

बाबासाहेब माहीत करून देणारा माणूस - चांगदेव भ. खैरमोडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं काम जगाला माहित करून देणारा माणूस, चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांचं १८ नोव्हेंबर, १९७१ रोजी निधन झालं. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणारं बहुखंडात्मक चरित्र हे त्यांचं मराठी साहित्यविश्वातलं महत्त्वाचं योगदान. त्याचबरोबर खैरमोडे यांनी काही महत्त्वाचं वैचारिक लेखनही केलंय. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी ही नोंद.

चांगदेव भवानराव तथा आबासाहेब खैरमोडे यांचा जन्म १५ जुलै, १९०४ रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातल्या पाचवड या छोट्याश्या गावी झाला. साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण झालं. शाळेत त्यांची हुशार विद्यार्थी म्हणून गणना व्हायची. मराठी, इंग्रजीबरोबरच इतिहासातही त्यांना विशेष रस होता. शाळेत असतानाच त्यांनी एका स्पर्धेसाठी खादीची महती सांगणारी कविता शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये १२ कडव्यांत केली होती. त्यांना या कवितेसाठी पहिलं बक्षीस 'केरळ कोकिळा'चे त्या वेळचे संपादक नारायण कृष्णाजी आठल्ये यांच्या हस्ते मिळालं होतं. पुढे ते बाबासाहेब आंबेडकर यांचे थोरले बंधू बाळाराम यांच्या प्रोत्साहनातून शिक्षणासाठी मुंबईला आले. इथल्या नामांकित एलफिस्टन हायस्कूलमध्ये इंग्लिश मीडियमधून इयत्ता सहावीला ॲडमिशन घेतलं. त्यावेळी बाबासाहेब नुकतेच इंग्लंडमधून आपलं उच्च शिक्षण पूर्ण करून मुंबईला आले होते आणि 'बहिष्कृत भारत' साप्ताहिक सुरू करून त्याचं कार्यालय मुंबईतच थाटलं होतं. त्या वेळी मुंबईत शिकायला आलेले, पण इथं राहायची सोय नसलेले काही पूर्वास्पृश्य वर्गातील विद्यार्थी बाबासाहेबांच्या या कार्यालयातच रात्री अभ्यासासाठी आणि झोपण्यासाठी यायचे. त्यात खैरमोडेही होते.

या वेळी खैरमोडे बाबासाहेबांना त्यांच्या विविध कामांत, विशेषत: लेखनात साहाय्य करत. बाबासाहेब अस्पृश्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श होते. कारण त्या काळी अस्पृश्य समाजातील उच्चविद्याविभूषित असलेले अख्ख्या भारतात ते एकमेव होते. त्यांच्या विद्वत्तेबद्दल सर्वांनाच प्रचंड आदर होता. अशा काळात खैरमोडे यांना बाबासाहेबांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा, विचारसरणीचा आणि कष्ट करण्याच्या तळमळीचा खैरमोडे यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. तो त्यांच्या वैचारिक जडणघडणीस आणि वैयक्तिक विकासास पोषक ठरला. त्याच काळात त्यांनी बाबासाहेबांचं चरित्र लिहिण्याचा मनाशी निश्चय केला. बाबासाहेबांच्या प्रेरणेनेच त्यांनी काही लेखन करण्यास सुरवात केली.

इंग्रजी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या डॉ. सॅम्युअल जॉन्सन यांच्या जेम्स बॉस्वेलने लिहिलेल्या प्रसिद्ध चरित्राच्या धर्तीवर डॉ. आंबेडकरांचं चरित्र लिहिण्याचं खैरमोडे यांनी ठरवलं. बॉस्वेलने २० वर्षांहून अधिक काळ अफाट काम करून आपल्या विलक्षण स्मरणशक्तीच्या जोरावर डॉ. जॉन्सन यांची भाषणं रोजच्या रोज क्रमवार लिहून ठेवली. याच धर्तीवर खैरमोडे यांनीही बाबासाहेबांची वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली भाषणं, बाबासाहेबांची पत्रं, बाबासाहेबांच्या ग्रंथांतून निवडलेले उतारे, त्यांच्या सहका-यांनी तसेच अनुयायांनी लिहिलेली पत्रं, संस्थांचे अहवाल इत्यादी गोष्टींचं परिश्रमपूर्वक संकलन केलं.

‘तूच माझं चरित्र नीट लिहू शकतोस’
बाबासाहेब स्वत:ही त्यांना गप्पांच्या ओघात स्वत:बद्दल माहिती सांगत आणि त्यांच्या चरित्रलेखनाच्या संकल्पाला 'तूच माझं चरित्र नीट लिहू शकतोस' असं म्हणून प्रोत्साहनही देत असत. दरम्यानच्या काळातच खैरमोडे यांनी आपलं बी. ए. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि मुंबईत ब्रिटिश सचिवालयात ते नोकरी करू लागले.   तिथे वरच्या ग्रेडमध्ये नोकरी मिळवणारे ते पहिले अस्पृश्य व्यक्ती ठरले. तिथे त्यांना जातिव्यवस्थेचा खूप अन्याय सहन करावा लागला. त्या वेळी बाबासाहेबांच्या कामाची निकड व त्यासाठीचा त्यांचा संघर्ष त्यांना अधिक पटला.  बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचं काम समाजासमोर आलं पाहिजे, या एकाच ध्येयाने त्यांनी अपार मेहनत घेत आपलं अवघं आयुष्य या चरित्रलेखनाच्या कामी समर्पित केलं.

चरित्र लेखनाला सुरुवात:-
बाबासाहेबांच्या चरित्रलेखनाला १९२३ मधे त्यांनी सुरवात केली आणि १९७१ मध्ये स्वत:चं निधन होण्यापूर्वी त्यांनी चरित्रलेखनाचं काम पूर्ण केलं. 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र' या नावाने हे १५ खंड प्रसिद्ध झालेत. यातील पहिला खंड १९५२ साली बाबासाहेब जिवंत असतानाच प्रसिद्ध झाला. संकल्पित १५ खंडांपैकी पहिले ५ खंड खैरमोडे यांच्या हयातीत प्रसिद्ध झाले.
या काळात त्यांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. सहाव्या खंडाचं काम सुरू असतानाच १८ नोव्हेंबर १९७१ला खैरमोडे यांचं हृदयविकाराने निधन झालं. खैरमोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या उच्चशिक्षित पत्नी द्वारकाबाई खैरमोडे यांनी पुढील खंडांच्या संपादनाचं जिकिरीचं काम स्वत:कडे घेतलं आणि अनेक अडचणींवर मात करत परिश्रमपूर्वक जिद्दीने ते पार पाडलं. पुढील खंड प्रकाशित करण्याची जबाबदारी आधी सुगावा प्रकाशन व नंतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने घेतली आणि हे काम पूर्णत्वास नेलं.

नऊ हजार पानांचा प्रकल्प
अस्पृश्यांना गुलामगिरीच्या जोखडातून वर काढून त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी राजकीय, सामाजिक लढा देत त्यासाठी व्यापक चळवळ उभी केलेली.  हे सगळं काम मुद्द्या-पुराव्यानिशी जगापुढे मांडण्यासाठी खैरमोडे यांनी सुमारे ९ हजार पानांचा चरित्रलेखनाचा हा प्रपंच प्रकल्प मोठ्या आत्मीयतेने हाती घेऊन व्यापक दस्तावेजीकरणाच्या रूपात सिद्ध केला.
या खंडांतून बाबासाहेबांच्या चरित्रातील कुलवृत्तान्त, जन्म, कुटुंब, शिक्षण, परदेशातील शिक्षण, भारतात पुनरागमन, जीवनकार्याचा आरंभकाळ, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, अस्पृश्यांची चळवळ, हिंदी गोलमेज परिषदेतील विचारमंथन, अस्पृश्यांच्या राजकीय-सामाजिक हक्कांचा जाहीरनामा, सामाजिक चळवळीच्या प्रगतीचा इतिहास, व्हाइसरॉय मंत्रिमंडळ, महात्मा गांधींशी मतभेद, जॉइंट पार्लमेंटरी समितीतील कार्य, धर्मांतराची घोषणा, भारताच्या राज्यघटनेची निर्मिती, बाबासाहेबांची घटनेवरील भाषणं, हिंदू कोड बिल, नेहरू मंत्रिमंडळातील राजीनामा, याचबरोबर बाबासाहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं प्रचंड कार्य यांचा सविस्तर परामर्ष खैरमोडे यांनी घेतलाय.

चरित्र म्हणजे निव्वळ नोंद नाही:
     हे चरित्रखंड केवळ बाबासाहेबांच्या कार्याची आणि चळवळीची नोंद किंवा वर्णन नाही तर खैरमोडे यांनी त्या अनुषंगाने विचारदर्शनही घडवलंय, भाष्यं केलीत आणि प्रसंगी चिकित्साही केलीय. या चरित्रखंडात थक्क करून सोडणारी माहिती खच्चून भरलेली असून जिज्ञासूंनी हे खंड ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत.

डॉ.आंबेडकरांच्या चरित्रखंडांबरोबरच इतरही थोडंफार लिखाण खैरमोडे यांच्या नावावर जमा आहे. 'पाटील प्रताप' (१९२८) आणि 'अमृतनाक' (१९२९) ही दोन सामाजिक खंडकाव्यं त्यांनी सुरवातीच्या काळात लिहिली. नंतरच्या काळात समाजप्रबोधन, अस्पृश्यतानिवारण, हिंदू धर्म, हिंदू समाज अशा विविध विषयांवरचे त्यांचे वैचारिक लेख महाराष्ट्रातल्या विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. 'शूद्र पूर्वी कोण होते?'(१९५१), 'हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती' (१९६१), 'घटनेवरील तीन भाषणे' अशा प्रकारचं भाषांतरित साहित्यही त्यांनी लिहिलं.
बाबासाहेबांचं चरित्र हे अनेक अर्थांनी मौलिक आहे. मराठी साहित्यविश्वातलं ते एक महत्त्वाचं संचित आहे. बाबासाहेब समजून घेऊ पाहणाऱ्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हे चरित्रखंड दिशादर्शक आहेत. त्यासाठी या सर्व पिढ्या खैरमोडे यांच्या सदैव ऋणात राहतील.


संदर्भ-
१) 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र' खंङ १-१५ लेखक - चांगदेव भवानराव खैरमोडे, सुगावा प्रकाशन
२) संक्षिप्त मराठी वाङमय़ कोश – खंङ २, पॉप्युलर प्रकाशन
३)महेंद्र मुंजाळ १८ नोव्हेंबर, २०१८ रोजीचा लेख.

- बुध्दभुषण भिमराव गवई-  ७३५०६९७४९५



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com