नवी मुंबईचे संदर्भ रुग्णालय कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांकरिता केव्हा खुले होणार

नवी मुंबईचे संदर्भ रुग्णालय कोरोना व्यतिरिक्त व्याधिंकरिता केव्हा खुले होणारनवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेचे ३०० खाटांचे वाशी येथील महापालिकेचे संदर्भ रुग्णालय मार्चमध्ये कोरोना रुग्णालय करण्यात आले. गेल्या आठ महिन्यांपासून हे रुग्णालय कोरोना बाधितांसाठी महत्त्वाचे रुग्णालय ठरले. मात्र सर्वसामान्यांचे सोईस्कर असे हे रुग्णालय याकाळात इतर व्याधींसाठी बंद ठेवण्यात आले. आता सर्वसामान्यांच्या कोरोना व्यतिरिक्त व्याधींसाठी खुले करणार असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सर्वत्र सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात या रुग्णालयातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन देखील हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागत असून इतर व्याधींसाठी खाजगी रुग्णालयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.


आयुक्त अभिजित बांगर यांनी लवकरच हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येईल अशी घोषणा सप्टेंबर महिन्याचा अखेरीस केली होती. मात्र अद्याप हे रुग्णालय घोषणेप्रमाणे इतर उपचारांसाठी खुले करण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात महिनाभरात नव्या करोना रुग्णांबरोबरच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. वाशी येथील या महापालिका रुग्णालयात सध्या ७० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. मात्र इतर उपचारांबाबत अद्याप रुग्णालय खाटांची व्यवस्था करत असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. तसेच अन्य आजारांसाठी अतिदक्षता सुविधाही करण्यात येत आहे असे सांगितले जात आहे. मात्र गेल्या २ महिन्यांपासून सुरू असलेली ही तारांबळ सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ ठरत आहे. कारण अपघात, महिला प्रसूती तसेच इतर उपचारांसाठी नागरिकांना खाजगी रुग्णालयात. गेल्या काही महिन्यांपासून जावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad