Top Post Ad

मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा सरकारचा निर्णय

पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा सरकारचा निर्णय



मुंबई
गेल्या काही दिवसांपासून प्रार्थनास्थळे बंद असली तरीही डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, सर्वांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळावे लागतील याची आठवणही यावेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली. मुख्यमंत्री म्हणाले, की हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!


मुख्यमंत्री पुढे  म्हणाले, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच. याची आठवणही यावेळी उद्धव ठाकरेंनी करून दिली.  भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंदीर प्रश्नांवरून चांगलीच चुरस रंगली होती. भाजपने मंदिर आणि प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. तर याच प्रकरणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. तर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचा प्रार्थनास्थळांचा वाद चक्क केंद्र सरकारपर्यंत गेला होता.


 


पंढरपूर :
कोरोनाच्या संकटामुळे 17 मार्च रोजी बंद झालेले विठ्ठल मंदिर दिवाळीच्या पाडव्याला उघडणार आहे. मंदिर उघडणार असल्याचे समजताचं पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदाय, व्यापारी संघटना, वंचित आणि मनसे यांनी शहरात तुफानी फटाक्यांची आतषबाजी करीत ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. कोरोनाचे संकट सुरु झाल्यानंतर तब्बल 8 महिन्यानंतर देव आपल्या लाडक्या भक्तांना भेटणार असून भाविकांनाही आता सावळ्या विठुरायाचे मुखकमल बघण्याची ओढ असह्य झाली आहे.मंदिर बंद असूनही रोज हजारोंच्या संख्येने भाविक मंदिराजवळ येऊन नामदेव पायरीचे दर्शन घेऊन जात होते. मंदिर उघडण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अनेक आंदोलने केली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत मंदिर उघडण्यास परवानगी दिल्याने वारकरी संप्रदायातून याचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.


आज विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ प्रकाश आंबेडकर यांच्या अनुयायांनी हा निर्णय येताच फटाक्यांची अताषबाजीला सुरुवात केली. यानंतर व्यापारी संघटना, मनसे आणि वारकरी संप्रदायांनी पेढे वाटून आणि फटाके उडवून जल्लोष केला. मंदिराच्या पश्चिम द्वार व्यापारी संघटनांनी विठूरायाची मूर्ती आणून तिला हार घालीत पेढे वाटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे वारकरी संप्रदायाने स्वागत करताना आता मर्यादित संख्येत कोरोनाचे नियम पाळून भजन कीर्तनासही परवानगी देण्याची मागणी केली. मंदिर समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचना मिळताच भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी आम्ही सज्ज असून आमची तयारी यापूर्वीच झाल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. मंदिरात येणाऱ्या भाविकाला मास्क बंधनकारक केला जाणार असून दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यासाठी मात्र रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा येणार आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी रोज 70 ते 80 हजार भाविक येत असतात. आता मात्र काही दिवस दीड ते दोन हजार भाविकांची दर्शन व्यवस्था करणे मंदिर प्रशासनाला शक्य होणार आहे. याचसोबत सुरुवातीला काही दिवस विठुरायाचे दुरून दर्शन घ्यावे लागणार असून याबाबत राज्य सरकारच्या सूचना मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे पुदलवाड यांनी सांगितले.


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com