राज्यपालांकर्वी राज्य चालवण्याचा भाजपचा प्रयत्न - मंत्री हसन मुश्रीफ

राज्यपालांकर्वी राज्य चालवण्याचा भाजपचा प्रयत्न - मंत्री हसन मुश्रीफ


कोल्हापूर
राज्य सरकारचे राज्यपालांनी ऐकावे अशी प्रथा आहे पण राज्यपालांचे कार्य असंविधानिक होत आहे असा आरोप  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.  राज्यपालांकर्वी राज्य चालवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपचे चाललेले हे राजकारण अत्यंत घातक आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयाला खो घालण्याचे काम ते राज्यपालांच्या माध्यमातून करत आहेत. राज्य शासनाचे सर्व निर्णय आडवले जात आहेत असा गंभीर आरोपही मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे. महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त विविध क्षेत्रातील बारा आमदारांची निवड करण्यात येणार आहे. महाविकास आघाडितील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस पक्षांतर्गत चर्चेचे गुऱ्हाळ थांबवून बारा नावे निश्र्चित झाली आहेत. मात्र या नावांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी रेड सिग्नल दाखवणार असल्याचा गौप्यस्फोट  मुश्रीफ यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच यासंदर्भात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्यात चर्चा झाल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी कोल्हापूरात केला.


मुश्रीफ म्हणाले, राज्याचे माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. याप्रसंगी आपले समर्थक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक भैय्या माने, भूविकास बॅंकेचे अध्यक्ष युवराज पाटील सांत्वन करण्यासाठी कोरे यांचेकडे गेले होते. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही सांत्वन करण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची चर्चा सुरू झाली होती. यावेळी चर्चेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोरे यांना देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्यात चर्चा झाली आहे, महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी जी बारा नावे येतील ती बाजूला ठेवण्यात येणार आहेत असेही पाटील यांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर भैय्या माने व युवराज पाटील यांनी मास्क घातला असल्याने चंद्रकांत पाटील यांना त्यांची ओळख पटली नाही.


दरम्यान काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, रेणुका शहाणे तर दुसरीकडे शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांना संधी देणार असल्याची चर्चा होती. पण, संभाव्य उमेदवारींची यादी आता पूर्ण झाली असून चर्चेतील नावांना वगळण्यात आले आहे. अखेर ही यादी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊन ही यादी तयार केली आहे.
संभाव्य उमेदवारी यादी -  राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल हिंगे / आदिती नलावडे, आनंद शिंदे
काँग्रेस : मुजफ्फर हुसेन, सचिन सावंत   शिवसेना : सचिन अहिर, नितीन बानगुडे पाटील
कला, साहित्य, संस्कृती, समाजसेवा, क्रीडा अशा क्षेत्रातल्या मान्यवरांची आमदार म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्यपालांकडे आहेत. राज्य मंत्रिमंडळ या मान्यवरांची नावे निश्चित करते आणि ती राज्यपालांकडे पाठवली जातात. राज्यपालांनी त्याला मान्यता द्यावी असे संकेत असले तरी त्यावर राज्यपाल आक्षेप घेऊ शकतात.


 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या