कोरोनाचा अटकाव करण्यास जिल्हा परिषद प्रशासनाला यश
१५ हजार ६०५ नागरिकांची कोरोनावर यशस्वी मात
ठाणे
ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले असून आजच्या घडीला १५ हजार ६०५ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ११७८ रुग्ण उपचार घेत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या काळात कोरोना रुग्णाच्या संख्येत कमालीची घट झाली. मोहीमेची उत्तम अंमलबजावणी केल्याचे फलित असल्याची प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा अटकाव करण्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य विभाग, ग्रामपंचायत विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, या पाच तालुक्यात एकूण ४३१ ग्रामपंचायती असून यातील २०० हून अधिक ग्रामपंचायत कोरोनामुक्त आहेत. तर ४५ ग्रामपंचायत क्षेत्रात अद्याप कोरोनाचा शिरकावच झालेला नाही. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी राज्य सरकारकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत देखील जिल्हा परिषदेने चमकदार कामगिरी केली. पहिल्या फेरीत तब्बल १५ लाख २६ हजार ५०७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर ५ हजार हून अधिक नागरिकाना संदर्भ सेवा देण्यात आली. या मोहिमेच्या दुसर्या फेरीत देखील १५ लाख ५४ हजार ५८१ नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. १०४७ लोकांना संदर्भसेवा देण्यात आली.
स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे वेळोवेळी मिळत असलेले सहकार्य ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोलाचे ठरले आहे. याकाळात आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दौरा केला. आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यांना प्रोत्साहन दिले. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, लोकांमध्ये कोरोना विषयी जागृती व्हावी यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांनी विशेष मेहनत घेतली आहे. शून्य कोरोना रुग्ण हे ध्येय गाठण्यासाठी सणाच्या काळात नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
0 टिप्पण्या