Top Post Ad

दिवाळीः दोन संस्कृती

दिवाळीः हिंदूंची व वैदिकांची
 
 हिंदू कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी बलीप्रतिपदा दाखविलेली असते. दिवाळीच्या पूर्ण आठवड्यात आपण गायगोरस-बारस, धनतेरस म्हणजे धनाच्या लक्ष्मीच्या पूजेचा दिवस साजरा करतो. नरक चतुर्थी व दिवाळीही साजरी करतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी येणारा भाऊबीजेचा दिवसही साजरा करतो. मात्र ज्याच्या बलीदानाने हे सर्व घडले त्या बळीराजाची बलीप्रतिपदा मात्र साजरी करीत नाहीत.
भालदेव म्हणजे बलीदेव आणि बळीदेव म्हणजे बळीराजा होय. आजही ग्रामीण भागात दिवाळी-दसर्‍याच्या सणांमध्ये आमच्या आया-बहिणी आपल्या नातेवाईक पुरूषांना ओवाळतांना मोठ्या प्रेमाने म्हणतात, ‘ईडापीडा जाओ, आणि बळीचं राज्य येवो!’. पाच हजार वर्षांनंतरही बळीच्या राज्याची मागणी होत आहे. आजही शेतकर्‍याला बळीराजा म्हटले जाते. तसेच बळीराजा म्हणजे शेतकर्‍यांचा राजा असे म्हटले जाते. पाच हजार वर्षानंतरही ज्या बळीराजाची आठवण आम्ही आजही करतो,
 
बळीचं राज्य नवखंडांचं! अफगाणीस्थानच्या बलुचीस्थानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत म्हणजे पूर्ण अशिया खंडच समझा! ईशान्येकडील राज्यांना बालेय प्रदेश म्हटले जाते. म्हणून तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले भारत खंडाला बलीस्थान म्हणतात. पृथ्वीतलावरचा हा पहिला सम्राट, पहिला चक्रवर्ती, पहिला राजर्षी आणि पहीला छत्रपतीसुद्धा! कारण पाच हजार वर्षांपुर्वी पृथ्वीतलावर कोणत्याही भागात सुशासित राज्य स्थापन करण्याइतपत प्रगती केलेला माणूस अस्तित्वात नव्हता. पृथ्वीवर जेथे जेथे मानवी वस्ती होती, ती रानटी अवस्थेतील मानवांचीच होती. भारतात मात्र सहा हजार वर्षांपूर्वीच सिंधू संस्कृती जन्माला आली होती.
 
आपण चौथ्या इयत्तेतील इतिहासाचं पुस्तक वाचलंच असेल, त्यातील एका पानावर मोहेंजोदडो व हडप्पा या दोन शहरांची चित्रं दिसतात. ही दोन्ही गावे म्हणजे सिंधू संस्कृतीच्या भरभराटीची साक्ष देतात! सिंधू नदीच्या खोर्‍यात फुललेली-बहरलेली ही संस्कृती होती. इतिहास काळात कधीतरी जमिनीत गाडली गेलेली. ही शहरे आधुनिक शहरांसारखीच आहेत. बळीराजा हा अशा प्रगत सिंधू संस्कृतीचा वारसदार होय. सिंधू संस्कृतीची संस्थापक **निऋति **होय. तीने हाताच्या साहाय्याने शेती करण्याचे तंत्र शोधून काढले. त्यानंतर बळीच्या राज्यात शेतीचे तंत्र विकसित झाले. बळीराजा हा आपल्या प्रगत शेती तंत्राचा व कृषी संस्कृतीचा प्रचारक होता. नांगराच्या व बैलाच्या साहाय्याने शेती करण्याचे नवे तंत्र बळीराज्यात शोधले गेले. त्यामुळे शेतीचा विस्तार झाला व उत्पादनही शेकडो पटीने वाढले. ज्या ज्या रानटी मानव समुहांनी हे प्रगत तंत्र स्वीकारले त्यांचा विकास झाला. त्यांनी स्वतःहूनच बळीराजाला आपला राजा मानलं. त्यामुळे बळीराजाला राज्याचा विस्तार करण्यासाठी कधीच युद्ध करावं लागलं नाही. बैल या प्राण्याची पूजा ‘नंदी’ म्हणून होऊ लागली. त्याकाळच्या आदिवासी नायक असलेल्या महादेवाने आपले वाहन म्हणून ‘नंदी-बैल’चा स्वीकार केला, कारण बैल हा नव्या क्रांतीचा ‘सहनायक’ होता.
 
आताच्या आशिया खंडाच्या आकाराएवढे बळीचं राज्य! मात्र तरीही या राज्यात कायदा व सुव्यवस्था अगदी उत्तम होती. आज जगातल्या सगळ्या देशांमध्ये शासन-प्रशासनाची जशी रचना आपणास दिसते अगदी तशीच किंवा त्यापेक्षाही सरस व कार्यक्षम शासन-प्रशासनव्यवस्था बळीने आपल्या राज्यात निर्माण केलेली होती. बलीस्थानचे नऊ खंड होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा या नावाने ओळखले जात होते. म्हणजे ज्याप्रमाणे भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसारखे राज्य आहेत, त्याप्रमाणे बळीच्या राज्यातही खंड (राज्य) होते. राज्याचा प्रमूख मुख्यमंत्री, तसा खंडाचा प्रमुख खंडोबा! आजचे  मुख्यमंत्री हे आपल्या बलिस्थानातील महाराष्ट्राचे खंडोबा होय! राज्यात जसे जिल्हे असतात तसे बलीस्थानातील प्रत्येक खंडात अनेक जिल्हे असायचे व जिल्ह्याच्या प्रमुखाला जोतिबा म्हणायचे! म्हणजे आजचे धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  हे बलीस्थानातील महाराष्ट्र खंडाच्या धुळे जिल्ह्याचे जोतीबा होत.
 
आज प्रशासकीय सोयीसाठी तीन चार जिल्हे मिळून एक महसूल विभाग तयार केला जातो. उदाहरणार्थ, आपला नाशिक महसूल विभाग घ्या. धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर व नाशिक अशा पाच जिल्ह्यांचा मिळून नाशिक महसूल विभाग तयार केलेला आहे. तसे बळीच्या बलीस्थानात महसूल विभाग होते. त्यांना महासुभा म्हणत व त्याच्या प्रमुखाला  महासुभेदार  म्हणत. या शब्दाचा अपभ्रंश होऊन म्हसोबा झाला. आज आपल्या नाशिक महसूल विभागाचे प्रमुख (आयुक्त) हे आपल्या बलीस्थानातील नाशिक महसूल विभागाचे म्हसोबा आहेत. या प्रमाणे बलीस्थानात मल्हारी, भैरव असे काही दरबारी मंत्री व प्रशासकीय अधिकारी होते. हे सर्व मंत्री व अधिकारी इतके प्रामाणिक व कर्तव्यदक्ष होते की लोक त्यांना देव मानू लागले. आजही आपला बहुजन समाज जोतीबा, खंडोबा, मल्हार या दैवतांची पुजा करतात. पाच हजार वर्षांपूर्वी इतकी प्रगत समाजव्यवस्था जगात कोठेच अस्तित्वात नव्हती. बळीराष्ट्र इतके प्रगत होते. याचा आपल्याला अभिमान असला पाहीजे.
बळीच्या राज्यात स्त्रियांना समान अधिकार होते. कारण बळीचं राज्य हे विंध्यावली राणीचं मातृवंशसत्ताक राज्य होते. तिने बळीशी लग्न केलं म्हणून बळी या राज्याचा राजा झाला. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला हे आता जगभरचे शास्त्रज्ञ मान्य करतात. भारतखंडात शेतीचा शोध सर्वप्रथम सिंधू नदीच्या खोर्‍यातील स्त्रियांनी लावला.
 
-2-
वामनाने बळीराजाचा कपटाने खून केला, तो दिवस होता अश्विन शूद्ध दशमीचा! तेव्हापासून आर्यांनी हा विजयोत्सव ‘दसरा’ म्हणून साजरा करायला सुरूवात केली. दसर्‍याला बळीराजाचा खून झाल्यावर संध्याकाळी बाणासुराने आपल्या प्रजेची कशीबशी समजूत घालीत तीला शांत केलं. आपला बळीराजा आपल्याला 21 दिवसांनी पुन्हा भेटायला येणार आहे, असे सांगून प्रजेच्या मनात बळीराजा परत येईल, अशी आशा जागवली. दसर्‍यापासून तो एकविसावा दिवस म्हणजे ‘बलीप्रतिपदा’ होय!
आमच्यासारखे काही मूठभर फुलेआंबेडकरवादी गेल्या 20 वर्षांपासून बळीप्रतिपदा साजरी करायला लागलेत. त्याची धास्ती बामनवाद्यांनी घेतली आहे. बामनवाद्यांनी आता बळिप्रतिपदेच्याच दिवशी ‘पहाट-पाडवा’ नावाचा सनातनी कार्यक्रम सुरू केला आहे व आमचे बहुजन म्हणविणारे नगरसेवक-आमदार वगैरे राजकारणी लोक पैसे देऊन या सनातनी कार्यक्रमात समील होत असतात. या बहुजन राजकारण्यांना बलीप्रतिपदा साजरी करायला सांगीतली, तर त्यांची नानी मरते, नालायकांची!
 
अश्विन वद्य दशमीस बळीराजाचा खून केल्यानंतर वामन व त्याच्या सैन्याने राज्यात हाहाःकार माजल्याची संधी साधली व प्रचंड लुटमार केली. ही लूटलेली संपत्ती घेऊन वामन आपल्या घरी परतला, तेव्हा त्याच्या बायकोने कणकेचा बळीराजा बनवून घराच्या उंबरठ्यावर ठेवला. वामनाने त्या कणकेच्या बळीच्या पोटात पुन्हा तोच सुरा खुपसला व घरात प्रवेश केला. आपल्या नवर्‍याने महापराक्रमी असलेल्या बळीला मारले व संपत्ती लुटून आणली या आनंदाने तीने नवर्‍याला ओवाळले. तेव्हापासून दसर्‍याच्या दिवशी प्रत्येक आर्य-ब्राम्हणांच्या घरात बळीराजाचा खून केला जातो. मात्र बळीराजावर प्रेम करणारी जनता याच दिवशी ‘बळीचे राज्य येऊ दे’ असा आक्रोश करते. या दोन्ही परस्परविरोधी घटना एकाच दिवशी म्हणजे दसर्‍यालाच घडतात.
या केवळ दोन विरोधी घटना नाहीत तर, दोन संस्कृतीमधला संघर्ष आहे. रणांगणावरच्या युद्धात आर्यलोक कधीच जिंकले नाहीत. मात्र आपण बहुजन नेहमीच इतिहासाच्या पानांवर पराभूत होत असतो. इतिहास निर्माण करीत असतांना तो लेखीस्वरूपात नोंदही करून ठेवायचा असतो. आम्ही शूद्रातिअतिशूद्रातील बुद्धीजीवी पोटभरू आहोत, त्यामुळे आम्ही पोटापुरते लिहीतो व बोलतो. त्याच्याने तुमचे पोट भरत असेल, मात्र तुमच्या पुढच्या अनेक पिढ्या तुम्ही दुःख दारिद्र्याच्या खाईत लोटतात. कारण त्यांच्यासाठी तुम्ही काहीच लिहीत नाहीत व बोलतही नाहीत.
धन्यवाद! इडा पिडा जाओ! बळीचं राज्य येवो!! सत्य की जय हो!
 
(लेखनः 07 नोव्हेंबर व प्रकाशनः दै. लोकमंथन 08 नोव्हेंबर 2020-------
प्रा.श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com