Top Post Ad

लहान मुलांची कामगिरी कौतुकास्पद !   विनिता राणे, महापौर , क.डों.म.पा 

 लहान मुलांनी आपापली जबाबदारी वक्तृत्व आणि अभिनयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविली हे कौतुकास्पद ! 
 विनिता राणे, महापौर , क.डों.म.पा कल्याण
लहान मुलांनी आपापली जबाबदारी वक्तृत्व आणि अभिनयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविली हे कौतुकास्पद आहे, असे उदगार महापौर विनिता राणे यांनी आज काढले. " माझे कुटूंब, माझी जबाबदारी" या मोहिमे अंतर्गत याच विषयावर महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजिलेल्या वक्तृत्व व अभिनय स्पर्धेच्या अंतिम फेरी प्रसंगी त्यांनी हे उदगार काढले, अशी जबाबदारी प्रत्येकाने उचलल्यास कोरोना विषाणूचा नायनाट करण्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ असे त्या पुढे म्हणाल्या.
लहान मुलांनी आज दिलेले तीन मंत्र म्हणजेच " मास्क लावणे, हात वारंवार धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे " हे सर्वांनीच पाळावेत, असे उदगार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी काढले. अजून संकट मोठं आहे ते आपण जिंकलं पाहिजे यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे असेही ते यावेळी म्हणाले.   कोरोना  विषयी जनजागृती व्हावी  यासाठी " माझे कुटूंब, माझी जबाबदारी" या मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन वक्तृत्व व अभिनय स्पर्धा आयोजित करून  घरातील बालकांपासून पालकांपर्यन्त पोहचणारी  कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे.


या स्पर्धेस मिळालेला बाळ-गोपाळांचा भरघोस प्रतिसाद आणि आत्मविश्वास वाखाणण्यासारखा आहे , अशा शब्दात त्यांनी मुलांचे कौतुक केले. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे संकल्पनेतून साकारलेल्या " माझे कुटूंब, माझी जबाबदारी" या मोहिमे अंतर्गत याच विषयावर महापालिका क्षेत्रातील 5 वी ते 10 वी या गटातील सर्व शालेय विदयार्थ्यांसाठी महापालिकेने आयोजिलेल्या ऑनलाईन वक्तृत्व व अभिनय स्पर्धेस महापालिका शाळांपासून इंटरनॅशनल स्कूल पर्यन्त अनेक शाळांतून  प्रचंड प्रतिसाद मिळाला असून यामध्ये सुमारे 1200 विदयार्थ्यांच्या एन्ट्री (प्रवेशिका) प्राप्त झाल्या, महापालिकेने नियुक्त केलेल्या परिक्षक मंडळांने यापैकी 787 एन्ट्री (प्रवेशिका) पात्र ठरवून त्यांचे अवलोकन करुन यामधून एकूण 20 विदयार्थी स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले. सदर विदयार्थ्यांच्या आज झालेल्या अंतिम फेरीत खालील विदयार्थी  पुरस्कारास पात्र ठरले आहेत.


 विजेते स्पर्धक - 
प्रथम पुरस्कार- ओवी प्रशांत महाजन-रोख पारितोषिक- रु.11,000/- स्मृतीचिन्ह
द्वितीय पुरस्कार- आयुषी अजीत देवस्थळी-रोख पारितोषिक- रु.8,000/- स्मृतीचिन्ह
तृतीय पुरस्कार- गायत्री अनिल देव-रोख पारितोषिक- रु.5,000/- स्मृतीचिन्ह
 उत्तेजनार्थ पारितोषिक - 
समय संजीव तांबे - रोख पारितोषिक- रु.2,000/- स्मृतीचिन्ह
अन्सारी ईशा सकील - रोख पारितोषिक- रु.2,000/- स्मृतीचिन्ह
सिरत झोरा मसुर अन्सारी - रोख पारितोषिक- रु.2,000/- स्मृतीचिन्ह


या स्पर्धेत प्राथमिक फेरीसाठी रवींद्र लाखे,शुभांगी भुजबळ, दिपाली काळे तसेच  अंतिम फेरीसाठी अश्विनी मुकादम, मयुर खांडगे, ऋतुराज फडके या प्रख्यात कलाकारांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय लदवा यांनी केले. सोशल डिस्टंसिंगचे भान राखुन यावेळी महापौर विनिता राणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त रामदास कोकरे, वैदयकीय आरोग्य‍ अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, महापालिका सचिव व जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, अत्रे रंग मंदिराचे माणिक शिंदे आणि 20 स्पर्धक विदयार्थी यावेळी उपस्थित होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने व सजगपणे आपापले सादरीकरण केले.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com