कोळीवाड्याच्या फेरपुनर्वसनाचा प्रश्न ही जेएनपीटीची जबाबदारी - खा.तटकरे
 कोळीवाड्याच्या फेरपुनर्वसनाचा प्रश्न ही जेएनपीटीची जबाबदारी - खा.तटकरे


उरण
 केंद्र सरकारच्या जहाज वाहतूक विभागातर्फे सागरतट समृद्धी योजनेसंदर्भात जहाज वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे खासदारांसोबत संवाद साधला. यावेळी जेएनपीटीबंदराच्या विकासासाठी पुनर्वसन करण्यात आलेल्या उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांच्या व्यथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी केंद्र सरकारकडे मांडल्या. त्यांच्या लांबणीवर पडलेल्या फेरपुनर्वसनाची जबाबदारी जेएनपीटीची असून केंद्र सरकारने त्यांना तशा सूचना द्याव्या, अशी मागणी खा.तटकरे यांनी केली.या मागणीमुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या आशा आता पल्लवित झाल्या असून ग्रामस्थांनी खासदार तटकरे यांचे जाहीर आभार मानले आहे. 

 

उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथील महत्वाचा  पुनर्वसनाचा प्रश्न गेली 35 वर्षे प्रलंबितच आहे.गेल्या 35 वर्षांपासून फेरपुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या उरण तालुक्यातील  हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जेएनपीटी बंदराच्या विकासासाठी हे गाव विस्थापित करण्यात आले होते. 1985 साली उरण शहराजवळ बोरी-पाखाडी (भवरा) गावाजवळ चिखल व वाळवीग्रस्त मातीत भराव टाकून या गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. ग्रामस्थांना पुनर्वसनासाठी सोई-सुविधांसह 17 हेक्टर जागेची आवश्यकता होती. मात्र जेएनपीटीने २ हेक्टर जागेत पुनर्वसन केल्याने येथे अनेक वर्ष ग्रामस्थ दाटीवाटीने रहात आहेत. 256 घरांच्या या संपूर्ण गावालाच वाळवीने पोखरले आहे. अनेक कुटुंब गाव सोडून गेली आहेत, मात्र ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, ते कित्येक वर्ष हाल सोसत आहेत.वर्षानुवर्षे याबाबत हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते नरेश कोळी यांनी ग्रामपंचायत स्तरापासून ते केंद्र स्तरापर्यंत अनेक वेळा वर्षानुवर्षे या समस्या विषयी पत्रव्यव्हार करून हा पुनर्वसनाचा प्रश्न सुटावा यासाठी पाठपुरावा केला आहे. मात्र शासनाचे  याबाबत उदासीन धोरण दिसून येते. 

 

जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांना केंद्र सरकारकडून या गावाच्या फेरपुनर्वसनासंदर्भात सूचना देण्यात याव्या, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने खा. सुनिल तटकरे यांनी केली. तसेच इथले नागरिक आंदोलनाला बसले असल्याने केंद्र सरकारने तातडीने त्यांची दखल घ्यावी, अशी विनंती केली. यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच जेएनपीटीचे खाजगीकरण होणार नसल्याचेही सांगितले.त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्तांचे आशा पल्लवित झाल्या आहेत. 

 

खासदार सुनील तटकरे यांनी हनुमान कोळीवाडाचा पुनर्वसनचा  महत्वाचा प्रश्न केंद्रीय मंत्री मांडवीया यांच्यासमोर मांडल्यामुळे हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे त्यामुळे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही खासदार तटकरे साहेब यांचे जाहीर आभार मानतो. पक्षीय भेदाभेद विसरून या अन्याया विरोधात सर्वांनी सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटनांनी  एकजुटीने हा प्रश्न सोडवावा असे आवाहन हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते  नरेश कोळी  यांनी केले. 


 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA