Top Post Ad

चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रम ऑनलाईन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी
चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रम सर्वांपर्यंत ऑनलाईन पोहोचविणार
विधानभवन मुंबई येथे उच्चस्तरीय बैठकीत निर्णय



 
            मुंबई,
भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातून तसेच जगभरातून अनुयायी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमी येथे दरवर्षी अभिवादनासाठी उपस्थित राहतात. यावर्षी कोरोना महामारीचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून केवळ शासकीय मानवंदना देण्याच्या समन्वय समितीच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात यावा. यासंदर्भात शक्य तितक्या लवकर मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शासन निर्णय जाहीर व्हावा जेणेकरून सर्वांना पूर्वसूचना प्राप्त होईल. शासकीय अभिवादन सोहळा, हॅलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि सर्व समाजमाध्यमांतून ऑनलाईन प्रक्षेपण करण्यासंदर्भात शासन आणि महानगरपालिका स्तरावर उचित निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाच्यावतीने करावयाच्या सेवा-सुविधांबाबत तसेच मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यासंदर्भात आज विधानभवन येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे, खासदार राहुल शेवाळे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, बेस्टचे  सुरेंद्र बागडे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, प्रधान सचिव विनित अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, मयुर कांबळे, सदानंद मोहिते, चंद्रशेखर कांबळे, सुबोध भारत आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
       


    ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या धर्तीवर ‘माझी चैत्यभूमी, माझी जबाबदारी’ अशा आशयाच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, सामाजिक न्याय व विशेष सहाय विकास मंत्री धनंजय मुंडे, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
       नाना पटोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी महानगरपालिका व शासनामार्फत अनुयायांसाठी योग्य व्यवस्थापन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोना महामारीच्या काळात संसंर्ग पसरू नये यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या संख्येने अनुयायी येऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि राज्य शासन यांच्यामार्फत योग्य उपाययोजना आखण्यात याव्यात.
         


  अनुयायांच्या भावना समजून शासकीय मानवंदना आणि हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल, जेणेकरून गावपातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत प्रत्येक अनुयायाला ऑनलाईन स्वरूपात अभिवादन कार्यक्रम पाहता येईल. विविध समाजमाध्यमांद्वारे ऑनलाईन प्रसारणही करण्यात येईल, यासाठी शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
            समन्वय समितीने कोविड १९ पार्श्वभूमीवर घेतलेल्या गर्दी टाळण्याच्या जागरूकतेच्या भूमिकेचे शासन स्तरावर स्वागत केले. शासन आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम अतिशय सुयोग्य प्रकारे आयोजित केला जाईल. अनुयायांना चैत्यभूमीला येणे शक्य नसल्याने हा कार्यक्रम सर्व अनुयायांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. या अभिवादन कार्यक्रमासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेऊन त्वरित शासकीय परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com