Trending

6/recent/ticker-posts

सोळा लाखांची वीजचोरी करणाऱ्या ४१ वीजचोरांना महावितरणचा झटका

सोळा लाखांची वीजचोरी करणाऱ्या ४१ वीजचोरांना महावितरणचा झटकाकल्याण


महावितरणच्या शहापूर उपविभागीय कार्यालयाने वीजचोरांविरुद्ध उघडलेली मोहीम अधिक तीव्र केली आहे. मागील तीन दिवसात झालेल्या कारवाईत ४१ ठिकाणी वीजचोरी आढळली असून या वीजचोरांनी जवळपास १६ लाख रुपयांची ९० हजार युनिट वीज चोरून वापरल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आठवाड्यात देखील या मोहिमेत २२ वीज चोरांवर कारवाई करून १४ लाख ५० हजार रुपयांची ९८ हजार युनिट विजेची चोरी उघडकीस आणली होती.  विद्युत कायदा-२००३ नुसार वीजचोरी हा अजामीनपात्र तसेच तीन वर्षांपर्यंत कारावास व दंडाच्या शिक्षेची तरतूद असलेला गुन्हा आहे. त्यामुळे विजेचा चोरटा व अनधिकृत वापर टाळून संभाव्य कायदेशीर कारवाईपासून दूर राहण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. 


उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील किन्हवली, आसनगाव, खर्डी, सोगांव, शिरवंजे, अस्नोली व लगतच्या भागात वीजजोडण्याची तपासणी करण्यात आली. यात ४१ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले. संबंधितांनी जवळपास १६ लाख रुपयांची ९० हजार युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांवर विद्युत कायदा-२००३ च्या कलम १३५ व १२६ अन्वये कारवाई सुरु आहे. गेल्या आठवड्यात शेणवा, पाली व किन्हवली येथील २२ वीज चोरांवर कारवाई झाली होती. मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६३ वीज चोरांविरुद्ध कारवाई करून ३० लाख ५० हजार रुपयांची सुमारे १ लाख ८८ हजार युनिट विजेची चोरी उघडकीस आणण्यात आली आहे. या मोहिमेला मुख्य अभियंता अग्रवाल, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावडे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके यांचे मार्गदर्शन मिळाले. कटकवार यांच्यासह सहायक लेखापाल विशाल सानप, ७ सहायक अभियंते व २२ तांत्रिक कर्मचारी मोहिमेत सहभागी होते.


Post a Comment

0 Comments