भंडाऱ्यानिमित्त नातेवाईकांना बोलावून केला हल्ला... जालन्यात खैरलांजीची पुनरावृत्ती


भंडाऱ्यानिमित्त नातेवाईकांना बोलावून केला हल्ला... जालन्यात खैरलांजीची पुनरावृत्ती


जालना
जालना जिल्ह्यात पुन्हा खैरलांजी प्रमाणे प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 जालना शहरालगत असलेल्या पानशेंद्रा शिवारात जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे, तर तिसरा भाऊ गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. या खळबळजनक घटनेमुळे पानशेंद्रा गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. पानशेंद्रा येथील बोरुडे बंधूंसोबत पोळा सणाला गावातील काही लोकांसोबत वाद झाला होता. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हेही दाखल करण्यात आले होते.  त्या वादातूनच पुढे चार सप्टेंबर रोजी भंडाऱ्यानिमित्त आपल्या नातेवाईकांना मोठ्या संख्येने बोलावून बोरूडे कुटुंबियांवर हल्ला करण्यात आला.  "या प्रकरणाचा तपास सुरू असून एवढ्या गंभीर घटनेमागं नेमकं काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्यापपर्यंत अकरा जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने या सर्वांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे," असं जालना तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी संजय लोहकरे यांनी सांगितलं. 


 जमावानं लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडनं केलेल्या बेदम मारहाणीत राहुल बोरुडे (25 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या प्रदीप बोरुडे (23वर्षे ) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या मारहाणीत तिसरा भाऊ रामेश्वर बोरुडे (वय-28) हा देखील गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.


घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना रामेश्वर बोरुडे म्हणाले, "मी, माझी आई, पत्नी, मुलगी आणि दोन भावांसह पानशेंद्रा शिवारातील वस्तीत राहतो. मिळालेल्या गायरान जमिनीवर आम्ही उदरनिर्वाह करतो. 18 ऑगस्ट म्हणजेच पोळ्याच्या दिवशी आम्ही आमचे बैल आमच्या घरासमोर सजवले. या बैलांना निळा रंग लावला. यानंतर शेजारीच राहत असलेल्या वाघ, पवार आणि गायकवाड कुटुंबीयांचेही बैल समोरून आले. या लगबगीत वाघ कुटुंबातील भगवान वाघ यांना प्रदीप बोरुडेच्या बैलाचा धक्का लागला आणि ते खड्ड्यात पडले आणि वादाला सुरुवात झाली."  यानंतर याप्रकरणी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिल्या आणि स्थानिक पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांवर कलम 324 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र या वादाचे परिणाम चार तारखेला संपुर्ण कुटुंबाला भोगावे लागले. संपूर्ण कुटुंबालाच संपविण्याचा कट असल्याचा आरोपही यावेळी बोरूडे यांनी केला.  याविषयी रामेश्वर पुढे सांगतात, "असं काही होईल याची कधीही कल्पना नव्हती. शेजारी राहत असलेल्या वाघ यांनी गुरुवारी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी भंडारा घातला. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना बोलावलं आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळच्या सुमारास याच मंडळींनी आमच्या कुटुंबावर हल्ला केला. यात प्रदीप आणि राहुल यांना घराजवळच्या मोकळ्या जागेत लाठ्याकाठ्यांनी मारण्यात आलं, तर मी हल्ल्यानंतर दोन तास बेशुद्ध होतो. "आई शेजारच्या घरात पळाल्यानं त्यांचा जीव वाचला. मी आणि माझी मुलगी घरात लपून बसल्यानं आमचाही जीव वाचला," असं रामेश्वर यांच्या पत्नी वर्षा बोरुडे यांनी सांगितलं.

 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA