रस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा एकदा तलावपाळी परिसरातील वृक्षांचा बळी
ठाणे
विकासाच्या नावावर राबवण्यात येणाऱया मोठ मोठ्या प्रकल्पांकरिता आजपर्यंत प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. याबाबत अनेक वृक्षप्रेमी संघटनांनी आवाज उठवला आंदोलनेही केली. मात्र याकडे ठाणे महानगर पालिका सातत्याने जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. लॉकडाऊनच्या आधीपर्यंत मासुंदा तलाव अर्थात ठाण्याच्या तलावपाळी परिसरात ठाणे स्टेशन ते जांभळी नाका या मार्गालगत अनेक मोठ मोठी वृक्ष होती. लॉकडाऊनच्या काळात रस्तारुंदीकरणामध्ये या सर्व वृक्षांनाही मुठमाती देण्यात आली. कॉरोनाच्या महामारीत कोणीही नागरीक रस्त्यावर नसल्याने बिनदीक्कतपणे ही वृक्षतोड करण्यात आल्याने वृक्षप्रेमी आणि सर्व सामान्य नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. आधीच मेट्रोच्या कामाकरिता आणि रस्तारुंदीकरणामध्ये अनेक झाडे तोडण्यात आली. त्यातच ठाण्याचे वैभव तलावपाळीवर असलेले मोठ मोठे वृक्षही आता दिसेनासे झाले आहेत. पर्यावरण प्रेमीं या नात्याने लवकरच ठाणे महानगर पालिकेला निवेदन देऊन याबाबत विचारणा करण्यात येईल असे एनवायरमेन्ट पोल्युशन कन्ट्रोल एन्ड सेफ्टी फाऊन्डेशन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण गुंडे यांनी सांगितले.
वेगवेगळ्या प्रकल्पावर काम करणारे ठेकेदार बेमालुमपणे ही वृक्षतोड करीत आहेत. तरी अशा प्रकारची छुपी वृक्षतोड शहरात कोठेही सुरू नाही, वृक्ष लागवड,त्यांचे पुनरुज्जीवन, यासारखे जवळपास बारा उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाबरोबरच वनसंवर्धनाचा उद्देश पर्यावरण मंत्रालयाने सर्वच राज्यांना दिला आहे. मात्र अधिक्रायांच्या खिसेभरू प्रवृत्तीमुळे वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दूरच राहिले. याआधीही ठाण्यातील रेंमड कंपनी, हिरानंदानी मेडोज, जेमिनी टॉवर, घोडबंदर, वागळे इस्टेट, राबोडी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने वृक्षतोड झाली आहे. न्यायालयाने शहरातील वृक्षतोडीस मनाई केली असली तरी मोठ्या प्रमाणावर छुपी वृक्षतोड आजही सुरुच असल्याचा दावा अनेक वृक्षप्रेमी संघटना करीत आहेत. शहरातील काही भागांमध्ये वृक्षांवर विषप्रयोग होत असून काही ठिकाणी तोडलेले वृक्ष पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले जात आहेत, असा आरोपही गुंडे यांनी केला.
ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने गेल्या काही वर्षांत बिल्डरांचे प्रकल्प तसेच रस्तारुंदीकरणासाठी हजारोंच्या संख्येने वृक्ष कत्तलीस परवानगी दिली आहे. नौपाड्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी जुन्या वृक्षांवर क्रुहाड चालविण्यात आली होती. शहरातील काही भागांत विकास हस्तांतर हक्काच्या आधारे उभारण्यात येत असलेले रस्ते तसेच इतर सुविधांसाठी झाडांची कत्तल झाली . या पार्श्वभूमीवर शहरातील काही पर्यावरण प्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वृक्ष प्राधिकरण समितीकडून वादग्रस्त पद्धतीने झाडांच्या कत्तलीस परवानगी दिली जात असल्याचा मुद्दाही या याचिकेत मांडण्यात आला होता. त्यानंतर अशा स्वरूपाच्या वृक्षतोडीस न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र लॉकडाऊनच्या कार्यकाळाचा फायदा घेत तलावपाळी मार्गावरील मोठ मोठी वृक्ष जमिनदोस्त करण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या