आजपासून राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग सुरू
मुंबई
मध्य रेल्वेने आज २ सप्टेंबर २०२० पासून राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग सुरू होत असल्याचे जाहीर केले आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भातील एक पत्रक जारी केले आहे. रेल्वेने या पत्रकामध्ये २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व प्रवाशांना राज्यांतर्गत प्रवासासाठी तिकीट बुकींग करता येणार असल्याचेही रेल्वेने म्हटले आहे. राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात रद्द करण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेने आता राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यानंतर प्रवासी रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. लॉकडाउनदरम्यान परराज्यातील कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन्स चालवण्यात आल्या. दुसरीकडे विशेष मर्यादित लोकल गाड्यांची वाहतूक मुंबईतील अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी सुरु आहे. अद्याप कोणताही निर्णय मुंबई लोकलसंदर्भात झालेला नाही. यादरम्यान मध्य रेल्वेने परिपत्रक प्रसिद्ध करत आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली आहे. सप्टेंबरच्या १ तारखेपासून अनलॉक ४ ची सुरुवात झाली. याच धर्तीवर केंद्राकडून काही महत्त्वाचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. ज्याच्या अंमलबजावणीसही सुरुवात झाली. अनेक व्यवहार धीम्या गतीनं पूर्वपदावर येत असतानाच सर्वात महत्वाची असलेली रेल्वेसेवा पूर्वपदावर येणार तरी कधी हा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारत होता. त्यामुळे रेल्वेला रुळावर आणण्यासाठी आता संबंधित मंत्रालयाकडूनही हालचाली केल्या जात असल्याचे दिसत आहे.
0 टिप्पण्या