८९० बेड्सची क्षमता असलेले बुश कंपनी येथील कोवीड रूग्णालय ठाणेकरांच्या सेवेत
ठाणे
कोरोना विरूद्धच्या लढाईला बळ देण्याकरिता बुश कंपनी येथे ठाणे महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड रूग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा १४ सप्टेंबर रोजी राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातंर्गत बाळकुम-साकेत येथे पहिल्या विस्तारित १०४३ बेडची क्षमता असलेले कोविड रूग्णालय त्यानंतर दुसऱ्या विस्तारित टप्प्यातंर्गत वागळे प्रभाग समितीतंर्गत बुश कंपनी येथे जवळपास ४९० बेडसची क्षमता असलेल्या कोविड रूग्णालयाची उभारणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. या रूग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ठाणे शहरामध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी या रूग्णालयामुळे मोठे बळ प्राप्त झाले आहे. शहरातील एकही व्यक्ती बेडपासून वंचित राहणार नाही ही आमची भूमिका असून या रूग्णालयामुळे ठाणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे
महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सांगितले की, कोरोनाविरूद्धच्या लढाईचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सक्षम असून या रूग्णालयामुळे नागरिकांना नवीन सुविधा प्राप्त झाली आले. या रूग्णालयामध्ये एकूण ४४० बेडस् असून यातील ३५० बेडस् हे ॲाक्सीजन बेडस् आहेत तर साधे बेडसची क्षमता ९० इतकी आहे. यापुढे हे रूग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणार आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सर्व अधिका-यांना दिले. १५ सप्टेंबरपासून राबविण्यात येणारी ही राज्यव्यापी मोहिम ठाणे शहरात कशा पद्धतीने प्रभावीपणे राबविता येईल याचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आज कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्व अधिका-यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महापालिका आयुक्तांनी या मोहिमेच्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने आढावा घेवून या योजनेच्या यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करण्याचे आदेश त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले. यावेळी त्यांनी या मोहिमेची व्यापक जनजागृती करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या