Top Post Ad

सूर्यग्रहण.......त्या महिलेने दिला सदृढ बाळाला जन्म

सूर्यग्रहणात ज्या गरोदर महिलेने भाजी चिरली होती,
त्या महिलेनी दिलाय सदृढ बाळाला जन्म..
ग्रहणामुळे बाळाला व्यंग निर्माण होते' ही अंधश्रद्धा - अंनिस


 


"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने इस्लामपूर येथील गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रद्धा झुगारून स्वतः ग्रहण पाहिलं त्या महिलेची नुकतीच प्रसूती झाली असून तिने एका छानशा कन्येला जन्म दिला आहे.  ते बाळ सदृढ व निरोगी आहे.  ग्रहणाचा मानवी जीवनावर कसलाही परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाले आहे", अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली. जाधव कुटुंबियांच्या मनातून गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रा. डॉ. नितीन शिंदे,  संजय बनसोडे, प्रा. तृप्ती थोरात, विनोद मोहिते, प्रा.बी आर जाधव, अवधूत कांबळे, योगेश कुदळे, प्रा. विष्णू होनमोरे, प्रा. प्रमोद गंगनममाले, प्रशांत इंगळे यांनी विशेष प्रयत्न केले.



        इस्लामपूर जिल्हा सांगली येथील सौ समृद्धी चंदन जाधव या तरुणीने 21 जून रोजी झालेल्या  सूर्यग्रहण काळात गर्भवती असूनही ही ग्रहण काळात ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या सर्व निर्भयपणे केल्या. त्यामध्ये भाजी चिरणे, पाने फुले फळे तोडणे, अन्नपदार्थ खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालने, मांडी घालून बसणे, एवढेच नव्हे तर सोलर फिल्टर मधून ग्रहण ही  पाहिले. समाजात ग्रहणा बाबत मोठ्या अंधश्रद्धा आहेत.  ग्रहण काळात गर्भवती महिलेने अशा काही गोष्टी केल्यास  जन्माला येणार अपत्य हे व्यंग घेऊन येतं किंवा त्या बाळाला जन्मताच काही दोष तयार होतात ,असे गैरसमज आहेत. हे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याचं काम महा. अं नि स  सातत्याने  करत आहे.


राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे आणि कार्यकर्त्यांनी या जाधव कुटुंबियांचं प्रबोधन केलं आणि खात्री दिली की ग्रहण काळामध्ये  मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही .त्यामुळे गर्भवती महिलेवर सुद्धा किंवा होणाऱ्या बाळावर  कोणते परिणाम होणार नाहीत.त्यामुळे हे कुटुंबीय ग्रहण काळातील अंधश्रद्धा झुगारून देण्यास तयार झाले. ग्रहण काळात  जे जे करायचे नाही ते ते सर्व या गर्भवती महिलेने धाडसाने केले. जाधव कुटुंबियातील समृद्धी ची सासू सिंधुताई, पती चंदन, दीर दीपक यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले.  काही दिवसांपूर्वीच समृद्धीची प्रसूती झाली. तिला कन्यारत्न झालं. ही मुलगी  गुटगुटीत व निरोगी असून. कुटुंबात आनंदी वातावरण बनले आहे. ग्रहणाचा या बाळावर ,तिच्या आईवर कोणताही परिणाम झाला नाही. अनेक अंधश्रद्धा तुन भीती तयार होते आणि त्यातून मानसिक गुलामगिरी तयार होते. या सर्वाला मुक्त करण्याचे काम जाधव कुटुंबीयांनी करून समाजापुढे एक नवा पायंडा उभा केला आहे. सामान्य कुटुंबात असूनही ही त्यांनी उचललेलं पुरोगामी पाऊल  निश्चितच कौतुकास्पद आहे.
          यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ समृद्धी जाधव म्हणाल्या, "ग्रहणाचा मानवी जीवनावर, गर्भवती महिलेवर किंबहुना त्याच्या बाळावर कोणताही परिणाम होत नाही हा माझा अनुभव आहे. अं नि स च्या कार्यकर्त्यांनी माझं व माझ्या कुटुंबाचे प्रबोधन केल्यामुळे हे धाडसाचे पाऊल उचलू शकले. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धांना आपण बाजूला केले पाहिजे. यापुढील प्रत्येक ग्रहणाच्या वेळी मी व माझे कुटुंबीय प्रबोधन करणार .'विज्ञान निर्भयता नीती नसे कशाचीही भीती' ही घोषणा सर्वांनी लक्षात ठेवावी."   "समृद्धी जाधव यांनी टाकलेलं कृतिशील पाऊल समाजाला प्रेरणादायी ठरेल. या कृतिशिल उपक्रमाने पुढील काळात ग्रहणाच्या वेळी लोकांची जागृती करण्यासाठी हे उदाहरण महत्त्वाचे ठरेल. खगोलीय आविष्कार आणि ग्रहण याबाबत अनिस नेहमीच प्रबोधन करते" असे प्रतिक्रिया महाराष्ट्र अं नि स राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी दिली.
          


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com