समस्त ठाणेकरांनी मोहिमेत सक्रीय सहभागी होवून आपल्या कुटूंबाचे जीवन सुरक्षित करावे- महापौर

समस्त ठाणेकरांनी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सक्रीय सहभागी होवून आपल्या कुटूंबाचे जीवन सुरक्षित करावे- महापौर


ठाणे 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, परंतु लॉकडाऊन शिथील झाल्यावर मागील दोन आडवडयात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. कोविड-19 वर नियंत्रण आण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे.  यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम महापालिका कार्यक्षेत्रात कार्यान्वित करण्यात आली असून, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते व समस्त ठाणेकरांनी या मोहिमेत सक्रीय सहभागी होवून आपल्या कुटूंबाचे जीवन सुरक्षित करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.


तसेच  कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही आपली जबाबदारी ओळखून करदात्यांनी वेळेत मालमत्ता कर भरल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी तब्बल 213 कोटी रुपये जमा झाले आहेत. महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेवून नागरिकांनी कर्तव्याची जाणीव ठेवली त्याबद्द्लही महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांचे कौतुक करुन आभार व्यक्त केले आहेत. सदरची मुदतही दि.15 सप्टेंबर 2020 रोजी संपुष्टात येत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद पाहता या योजनेस दि.30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी महापौर यांनी लेखी पत्रान्वये प्रशासनास केली आहे.  यास आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी तातडीने मान्यता देवून अर्लीबर्ड योजना दि.30 सप्टेंबर पर्यंत वाढविली आहे अशी माहिती महापौर यांनी यावेळी दिली.


ठाण्यातील करदात्यांनी सदर योजना लाभ घेवून आजवर महापालिकेला जसे सहकार्य केले आहे तसेच सहकार्य करावे असे आवाहन नरेश म्हस्के यांनी केले आहे. तसेच प्रशासनाचे देखील आभार व्यक्त केले.


शासनाने निर्देश दिल्यानुसार माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम ठाण्यामध्ये पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.  या अंतर्गत दि.17 सप्टेंबर ते दि.10 ऑक्टोबर 2020  अशी 15 दिवस पहिली मोहिम तर दि.14 ऑक्टोबर ते दि.24 ऑक्टोबर 2020 अशी 10 दिवस दुसरी मोहिम असणार आहे.  यासाठी ठाण्यातील अंदाजे 25 लक्ष लोकसंख्या गृहीत धरुन एकूण 453 पथके तयार करण्यात आलेली आहे.  यामध्ये काम करणाऱ्या सदस्यांना करोना दुत म्हणून संबोधण्यात येईल. सदरची मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्वाचा आहे असेही महापौर यांनी यावेळी नमूद केले.


या मोहिमेमध्ये घरोघरी भेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आलेली आहे.  एका पथकामध्ये 1 आरोग्य कर्मचारी व 2 स्वयंसेविका असतील व हे पथक दररोज 50 घरांना भेट देणार आहे. यावेळी घरातील सर्व सदस्यांचे तापमान तपासणे, को-मॉर्बिड कंडिशन आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाईल. ताप, खोकला, दमा लागणे, SPO2 कमी असणे अशी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिकमध्ये पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल. फिवर क्लिनिकमध्ये कोविड-19 ची तपासणी करुन तातडीने पुढील उपचार करण्यात येतील.  को-मॉर्बिडीटी असणारे रुग्ण नियमितपणे उपचार घेतात की नाही याची देखील यावेळी खात्री करण्यात येईल. तसेच घरातील सर्व सदस्यांना व्यक्तिश: प्रि-कोविड, कोविड आणि पोस्ट-कोविड स्थितीबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA