Top Post Ad

दीड हजार वैद्यकीय कर्मचारी देत आहेत ७,६५० बेडच्या जम्‍बो कोविड केंद्रामध्‍ये सेवा

सुमारे दीड हजार वैद्यकीय कर्मचारी देत आहेत ७,६५० बेडच्या जम्‍बो कोविड केंद्रामध्‍ये सेवा


मुंबई


‘कोविड - १९’ या साथरोगाला प्रतिबंध करण्‍यासाठी मुंबई महापालिका सर्वस्‍तरीय प्रयत्‍न सातत्‍याने करीत आहे. त्‍याचबरोबर कोविड बाधा झालेल्‍या रुग्‍णांना अधिकाधिक प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी ‘जम्‍बो कोविड केंद्र’ (DCH / DCHC) सुरु केले आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने भायखळा, एन.एस.सी.आय.-वरळी, बीकेसी, नेस्‍को-गोरेगाव, मुलुंड आणि दहिसर परिसरांचा समावेश आहे. या ठिकाणी सुमारे ७ हजार ६५० रुग्‍णशैय्या (बेड) उपलब्‍ध आहेत. तसेच या ठिकाणी साधारणपणे १ हजार ४६६ वैद्यकीय कर्मचारीही अव्‍याहतपणे कार्यरत आहेत. यामध्‍ये महापालिकेच्‍या केईएम, नायर, शीव आदी प्रमुख रुग्‍णालयांमधील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांसह परिचारीका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय इत्‍यादींचा समावेश आहे.


महापालिकेच्‍या या उपचार केंद्रांमध्‍ये दाखल असलेल्‍या रुग्णांना अधिक प्रभावी वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच कोविडच्‍या अनुषंगाने सातत्‍याने उपलब्‍ध होत असलेल्‍या अनुभवजन्‍य ज्ञानाची देवाण-घेवाण व्‍हावी, या प्रमुख उद्देशाने  ११ खासगी रुग्‍णांलयामध्‍ये कार्यरत असणारी ३५ तज्‍ज्ञ डॉक्‍टर मंडळी आता आपल्‍या सेवा दूरध्‍वनीद्वारे महापालिकेच्‍या जम्‍बो कोविड केंद्रांना देखील उपलब्‍ध करुन देणार आहेत. तसेच ते आवश्‍यकतेनुसार या उपचार केंद्रांना भेट देऊन तेथील डॉक्‍टरांशी वैद्यकीय उपचारांच्‍या अनुषंगाने सल्‍ला मसलत देखील करणार आहेत. या केंद्रामध्‍ये गरजेनुसार वैद्यकीय कर्मचा-यांची संख्‍या वाढवण्‍याची तरतूदही करण्‍यात आली आहे.या उपचार केंद्रांमध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत २० हजार ७२२ कोविड बाधित रुग्‍णांवर उपचार करण्‍यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिली आहे.


कोविड बाधित रुग्‍णांवर प्रभावी उपचार करता यावे, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी ‘जम्‍बो कोविड केंद्र’ (DCH / DCHC) सुरु केले आहेत. यापैकीच एक केंद्र ‘ई’ विभागातील व भायखळा परिसरातील ‘रिचर्डसन आणि क्रुडास’ या कंपनीच्‍या आवारात उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण १ हजार रुग्‍णशैय्या असून सुमारे १०० वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळावी, यासाठी जसलोक रुग्‍णालयातील २ व भाटिया रुग्‍णालयातील ३; यानुसार सदर दोन्‍ही खासगी रुग्‍णालयातील ५ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या ठिकाणी प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत १ हजार ५९८ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.


'जी दक्षिण’ विभागातील व वरळी परिसरातील ‘एन.एस.सी.आय’ च्‍या आवारात ‘जम्‍बो कोविड उपचार केंद्र’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण ५५१ रुग्‍णशैय्या असून सुमारे १८७ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळावी, यासाठी बॉम्‍बे रुग्‍णालय व ब्रिच कॅन्‍डी रुग्‍णालय या दोन खासगी रुग्‍णालयातील अनुक्रमे ५ व ३ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत ३ हजार ५६१ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.


‘एच पूर्व’ विभागातील ‘वांद्रे कुर्ला संकूल’ (बीकेसी) येथील मैदानात ‘जम्‍बो कोविड सेंटर’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण १,८२४ रुग्‍णशैय्या असून सुमारे ५२२ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्‍यात, यासाठी लिलावती रुग्‍णालयातील ३ तज्‍ज्ञ डॉक्‍टर व हिंदुजा रुग्‍णालयातील ४ तज्‍ज्ञ डॉक्‍टर; यानुसार सदर दोन्‍ही खासगी रुग्‍णालयातील ७ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत ७ हजार ५८८ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.


‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव परिसरातील नेस्‍को मैदानात ‘जम्‍बो कोविड सेंटर’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण २,१६० रुग्‍णशैय्या असून सुमारे ४९८ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळावी, यासाठी नाणावटी रुग्‍णालयातील ४ तज्‍ज्ञ डॉक्‍टर व कोकीलाबेन धिरुभाई अंबाणी रुग्‍णालयातील २ तज्‍ज्ञ डॉक्‍टर; यानुसार सदर दोन्‍ही खासगी रुग्‍णालयातील ६ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत ४ हजार ९१७ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.


‘टी’ विभागातील व मुलुंड परिसरातील ‘रिचर्डसन आणि क्रुडास’ या कंपनीच्‍या आवारात ‘जम्‍बो कोविड सेंटर’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी एकूण १,६५० रुग्‍णशैय्या असून सुमारे २०५ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळावी, यासाठी फोर्टीस रुग्‍णालयातील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत १ हजार ६५२ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.


‘आर उत्‍तर’ विभागातील दहिसर परिसरात ‘जम्‍बो कोविड सेंटर’ उभारण्‍यात आले आहे. या ठिकाणी ६८५ रुग्‍णशैय्या असून सुमारे २२४ वैद्य‍कीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्‍ये डॉक्‍टर, नर्स व इतर आवश्‍यक कर्मचा-यांचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल असणा-या रुग्‍णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सोयी सुविधा मिळावी, यासाठी बॉम्‍बे रुग्‍णालयातील ५ तज्‍ज्ञ डॉक्‍टर व सुराणा रुग्‍णालयातील ३ तज्‍ज्ञ डॉक्‍टर; यानुसार सदर दोन्‍ही खासगी रुग्‍णालयातील ८ तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्‍या सेवा सल्‍लागार स्‍वरुपात या उपचार केंद्रात प्राप्‍त होत आहेत. या कोविड सेंटर मध्‍ये १५ सप्‍टेंबर पर्यंत १ हजार ४०६ कोविड बाधित रुग्‍णांवर वैद्य‍कीय उपचार करण्‍यात आले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com