तुमच्या देवावर तुमचा भरोसा नाही का

तुमच्या देवावर तुमचा भरोसा नाही का


आज 22 वर्षे झाली मी देव मानत नाही.. मी नास्तिक बनण्याची प्रक्रिया 12वी पासून सुरू झाली.. तेंव्हापासून मी ईशनिंदक आहे.. पण मला कधी काही झालं नाही, की देवानं धडा वगैरे शिकवला नाही किंवा एखादा शाप दिला नाही.. कधी भूत लागलं नाही, कधी साडेसाती लागली नाही.. कधी पैसे चोरीला गेले नाहीत, कधी ऍक्सिडेंट झाला नाही, कुठला मोठा रोग/आजार झाला नाही.. उलट चांगली मार्क पडून Advocate झाले, अजून अभ्यास करून बँरिस्टर झाले, प्रॅक्टिस पण उत्तम चालते आहे, कसलाही शारीरिक, मानसिक, कौटुंबिक ताणतणाव नाही.. देव न मानण्यानं माझं काहीही बिघडलं नाही, की देवानं माझं काही वाकडं वाईट केलं नाही.. मी पूर्वी मित्रांशी वादविवादात देवाची खूप टिंगलटवाळी करायचे.. पण मग मित्र नाराज व्हायचे.. म्हणून जहाल भाषा वापरणं मी बंद केलं आहे.. मी स्वतःहून कोणाच्या तोंडाला लागत नाही.. जो जे वांच्छील तो ते करू देते, जोपर्यंत मला त्याचा त्रास होत नाही.. सामाजिक जीवनात कोणाच्या भावनांना कुरवाळत नसले तरी तुच्छही लेखत नाही.. कुठलेच कठीण प्रसंग माझ्या आयुष्यात आलेच नाहीत असं नाही.. पण देवाचा धावा करून कुठला मार्ग मिळतो किंवा कसलं बळ मिळतं यावर माझा अजिबात विश्वास नाही..


वैयक्तिक जीवनात लग्न झाल्यापासून मी घरात कोणतंही कर्मकांड केलं नाही.. कोणती व्रतवैकल्ये केली नाहीत, कुंकू-टिकली लावली नाही की मंगळसूत्र घातलं नाही.. सणवार केले नाहीत, आम्ही दोघांनीही घर बांधताना वास्तुशास्त्र बघितले नाही, वास्तुशांती केली नाही, की कधी घरात पूजा घातली नाही.. कधी घट बसवले नाहीत, कधी गणपती बसवला नाही, की कधी लक्ष्मीपूजन केलं नाही.. घराला काळ्या बाहुल्या अडकवल्या नाहीत, बोटांत खड्यांच्या अंगठ्या घातल्या नाहीत, गळ्यात ताईत घातले नाहीत, की कुठला अंगारा लावला नाही.. काहीही नाही.. माझ्या मटण चिकन खाण्याला कुठल्या सणावाराचे बंधन नाही.. नवीन गाडीची कधी पूजा केली नाही, की कार मध्ये गणपती ठेवला नाही.. मी सणावाराचं, देवाधर्माचं कसलंच काहीच केलं नाही.. पण तरीही मला कधी मंगळ आडवा आला नाही, की शनी माझ्या वाटेला गेला नाही.. किंवा कुठलाही छोटा मोठा अथवा जागृत वगैरे देव माझ्यावर कोपला नाही..पण देवाचे भक्त मात्र माझ्यावर बरेच कोपलेत.. देवाबद्दल आणि त्याच्या नावावर आजूबाजूच्या चाललेल्या भिकारचोटपणाबद्दल बोलल्यावर लिहिल्यावर धार्मिकांनी बराच त्रास दिलाय.. फेसबुकवर शिवीगाळ केलीये, व्हाट्सएप ग्रुपवरून काढलंय, मेसेंजर वरून धमक्या दिल्यात, आणि एकदा मुस्लिमांकडून पोलीस कम्प्लेन्ट पण होता होता राहिलीये..


दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती.. ही शिकवण अस्तिकांसाठी फक्त पुराण कुराण आणि बायबलातच आहे.. अहिंसा, अध्यात्म, मनःशांती, अनुभूती हे केवळ पोकळ देखावे आहेत.. उलट हीच माणसं जास्त 'हिंसक' असतात.. लॉजिकल उत्तरं देणं जमलं नाही की हे लगेच आपली लायकी काढतात, आपल्याला शहाणपणा शिकवू पाहतात, नाही गप्प बसलं तर शिवीगाळ करतात, आणि मारधाडीवर येतात.. आणि हे म्हणे अध्यात्मिक! असले कसले डोंबलाचे धार्मिक हे!!
देवावर टीका करणाऱ्याला देव स्वतःच शिक्षा करेल याच्यावर त्यांचा स्वतःचाच विश्वास नसतो.. म्हणून मग 'हे काम' ते स्वतःच्या हातात घेतात..


पण आता इथून पुढे कोणीही उठसूट धार्मिक भावना दुखावल्याची नाटकं करत गुन्हा दाखल करू शकणार नाही.. कारण, आता ईशनिंदाविरोधी IPC सेक्शन २९५ ए अंतर्गत पोलिसांनी थेट कारवाई करण्याला उच्च न्यायालयाने चाप लावला आहे.. जर कोणी तुमच्याविरुद्ध अशी ईशनिंदेची (धार्मिक भावना दुखावल्याची) तक्रार घेऊन पोलिसात गेला, तर पोलिसांना कोर्टाचे हे व्हर्डीक्ट डाऊनलोड करून दाखवावे लागेल फक्त.. पण हा कायदा माझे सरकारपासून संरक्षण करतो, लोकांपासून नाही.. Freedom of expression only protects you form government's prosecution, not from the people who are desperate to shoot me! 
कायद्याला घाबरणे वेगळी गोष्ट आहे आणि डोकं फिरलेल्या माणसांना घाबरणे वेगळी गोष्ट आहे.. स्टीफन हॉकिंग यांचं एक वाक्य आहे (त्यांचं आहे की त्यांच्या नावावर खपवलंय माहिती नाही) - "ईशनिंदेबाबतीत मी देवाला घाबरत नाही (कारण तो नाहीच हे मला माहिती आहे), पण मी त्याच्या भक्तांना मात्र घाबरते.." म्हणून देवावर टीका/चिकित्सा/टिंगल करताना आजूबाजूच्या टोलधाडीचा विचार हा केलाच पाहिजे.. जिथं एकही शब्द कठोर अथवा वावगा न वापरणारे दाभोळकर समाजाला रुचले नाहीत, तिथं माझ्यासारख्या सामान्याची काय कथा!


काही जण म्हणतात, चिकित्सा करा, पण टिंगल करू नका! अरे, टिंगल कोण करतंय.. मी तर फक्त फॅक्टस मांडतेय.. टिंगल तर पुराणे करताहेत विज्ञानाची! त्यांच्या पानापानांवर 'कॉमन सेन्स'ची माताभगिनी एक केलेली आहे.. आणि तरीही कोणी टिंगल नाही करायची म्हणे..ज्या काळात दरवाजाला कडी लावायची सोय नव्हती त्याकाळी मनुष्याला हत्तीचे तोंड बसविण्याची (अवयवरोपण) शस्त्रक्रिया अस्तित्वात होती.. त्या अंजनीने वायूचे वीर्य गिळले आणि तिच्या पोटी मारुती जन्माला आले.. मारुतीच्या घामाचा थेंब (!!) एका सुसरीने गिळला आणि त्याला मकरध्वज नावाचा पुत्र झाला… याची काय कप्पाळ चिकित्सा करणार?! याची तर टिंगलच होणार.. बरं ते जाऊ द्या, जर देव आहे, आणि तो सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ (सर्वज्ञ म्हणजे आपोआप सर्व जाणणारा) आहे, असं तुम्ही समजता, तर मग मी त्याच्यावर टीका करते, त्याची टिंगलटवाळी करते, हे काय त्याला कळत नसणार का? मग याबद्दल मला तो देईल की शिक्षा.. तो शिकवेल मला चांगला धडा.. तुम्ही स्वतःच का चवताळून उठताहेत..?


फारतर तुम्ही माझं वाईट होण्याबद्दल रोज प्रार्थना करा.. किंवा एखादा सत्यनारायण घाला.. किंवा मंत्रतंत्र म्हणा, लिंबू उतरून टाका, बोकड वगैरे कापा (आणि मलाही खायला बोलवा!) मग तुमचा देव तुमचं जरूर ऐकेल आणि मला शासन करेल याबद्दल तुम्ही निश्चिन्त राहा.. उगीच शिव्यागाळीवर आणि हाणामारीवर का येता? तुमच्या देवाची किंवा धर्मग्रंथातली शिकवण तुम्ही का विसरता? 
तुमच्या देवावर तुमचाच भरोसा नाही काय?


आपली एकता


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या