बहुजन विकास आघाडी राबवणार वसई-विरारमध्ये विशेष सर्वेक्षण मोहीम
वसई
करोना विषाणू नियंत्रणासाठी राज्यसरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने बहुजन विकास आघाडीच्या वतीने विशेष सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येणार आहे.या मोहिमेत घरोघरी जाऊन संपूर्ण कुटुंबांची आरोग्यविषयक माहिती घेतली जाईल.सोबतच कुणी आजारी असल्यास त्यावर वेळोवेळी होणाऱ्या औषधोपचाराची देखील माहिती घेण्यात येईल. यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, मा. महापौर प्रवीण शेट्टी आणि नारायण मानकर तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते व मा. नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्ष उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासन माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यासाठी सज्ज झाले असून, महानगरपालिकेच्या सहकार्याने बहुजन विकास आघाडीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला नागरिकांनी सहभाग देवून मोहिम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे व कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार क्षितीज ठाकूर यांनी यावेळी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, परंतु लॉकडाऊन शिथील झाल्यावर मागील दोन आडवडयात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या मोहिमेमध्ये घरोघरी भेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आलेली आहे. एका पथकामध्ये 1 आरोग्य कर्मचारी व 2 स्वयंसेविका असतील व हे पथक दररोज 50 घरांना भेट देणार आहे. यावेळी घरातील सर्व सदस्यांचे तापमान तपासणे, को-मॉर्बिड कंडिशन आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाईल. ताप, खोकला, दमा लागणे, SPO2 कमी असणे अशी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिकमध्ये पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल. फिवर क्लिनिकमध्ये कोविड-19 ची तपासणी करुन तातडीने पुढील उपचार करण्यात येतील. को-मॉर्बिडीटी असणारे रुग्ण नियमितपणे उपचार घेतात की नाही याची देखील यावेळी खात्री करण्यात येईल. तसेच घरातील सर्व सदस्यांना व्यक्तिश: प्रि-कोविड, कोविड आणि पोस्ट-कोविड स्थितीबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या