‘ऑनलाइन शिक्षण – ऑफ लाइन विद्यार्थी’
ठाणे
‘ऑनलाइन शिक्षण – ऑफ लाइन विद्यार्थी’ हा ऑनलाइन शिक्षणावर विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामधील परिचर्चेचा कार्यक्रमातील तिसरे पुष्प नुकतेच संपन्न झाले. दिवंगत जेष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांना मानवंदना म्हणून समता विचार प्रसारक संस्थेने मतकरी स्मृती माला हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये प्रत्येक महिन्यात गरीब वस्तीतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि विचारशक्तीला चालना देणारा आदरांजली कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. सद्दयाच्या कोविड साथीमुळे १७ सप्टेंबर रोजी झूमवर सादर झालेला या तिसऱ्या पुष्पांच्या अध्यक्षस्थानी समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया होते. संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी प्रस्तावना केली आणि एकलव्य कार्यकर्ते दीपक वाडेकर आणि सुशांत जगताप यांनी सूत्र संचालन केले.
या कार्यक्रमात नाटयजल्लोषच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधला. अक्षता दंडवते, तेजल बोबडे, आर्या कुशवाह, रिया मेवाणी, एंजल खैरालिया, मंगम्मा धनगर, ओम, प्रतीक, रवी या महानगर पालिकेच्या शाळेत आणि खाजगी शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. या कार्यक्रमाची तांत्रिक धुरा एकलव्य कार्यकर्ता पंकज गुरव याने सांभाळली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यास संस्थेच्या उपाध्यक्ष लतिका सु. मो., अध्यक्ष मनीषा जोशी, सह खजिनदार अजय भोसले, प्रवीण खैरालिया, कल्पना भांडारकर आदि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. फेसबुक लाईव्ह असलेला हा कार्यक्रम ठाण्यातील व ठाण्याबाहेरीलही अनेकांनी पाहीला.
ऑनलाइन शिक्षण हे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही कठीण जातंय. पण हे तात्पुरतं आहे, हे पुढे संपणार आहेच. आणि मुलांनी हे लक्षात ठेवावं की की जेव्हा हे संपेल तेव्हा त्यांनी मोबाइल पासून दूर जावं, आपल्या बुद्धीला ताजंतवानं होवू द्या, स्मरणशक्तीला ताण द्यावा, आपल्या डोळ्यांना विश्रांती द्यावी. आता जास्तच जास्त पाठ्यपुस्तक वाचायला सुरुवात करा. झाडे लावा, छोटे छोटे प्रयोग करा, पत्रे लिहा, अभ्यासाशी नातं तोडू नका, शिक्षकांनी मुलांना असं काही वेगळं आणि त्यांच्या क्रियाशक्तीला चालना मिळेल असं मुलांना सांगावं, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालशिक्षण तज्ज्ञ आणि लेखिका डॉ. श्रुती पानसे यांनी या स्मृती मालेत बोलताना केले. तर सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक विजू माने म्हणाले, ऑनलाइन मध्ये शिक्षण होत आहे असे वाटत नाही, पण ज्ञान तरी पोहोचवावं असा प्रयत्न शिक्षकांमार्फत करावा. विद्यार्थी अजून शिक्षणापासून वंचित राहू नयेत.
जगदीश खैरालिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संगितले की ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तिथे शाळा सुरू केल्या पाहिजेत. या सर्व कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांचा अभ्यास चालू राहावा यासाठी सरकार, शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ, पालक, सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून मार्ग काढायला हवा. शैक्षणिक विषमता वाढणे समाजासाठी हानिकारक आहे. कार्यक्रमाचा शेवट सुप्रसिद्ध नाट्य कलाकार विक्रम गायकवाड यांनी केलेल्या कै. रत्नाकर मतकरी यांनी लिहीलेल्या ‘तुम्हीच वाक्य दिलं होतं’ या शिक्षणावरील कथेच्या वाचनाने झाली.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा परिचर्चेत उत्फुर्त सहभाग
अक्षता दंडवते ही १२वी त शिकणारी मुलगी म्हणाली, घरी शिकताना एक मोबाइल आम्हा ४ बहिणींना मिळून वापरावा लागतो. अभ्यासात येणार्या अडचणी सोडवता येत नाहीत. आता आम्ही घरीच असतो तर कॉलेज मधील लायब्ररी, प्रयोगशाळा, अशा सारख्या शाळेतील सुविधांसाठी आमच्याकडून फी का घेतायत? तेजल बोबडे ही १० वीट शिकणारी विद्यार्थिनी म्हणाली पोर्शन संपवायचा म्हणून शिक्षक खूप भरभर शिकवतात. बर्याच गोष्टी कळत नाहीत. अडीच तासाचा वर्ग, मध्ये ब्रेक नाही, असे तीन वर्ग , दिवसभर बसायचा त्रास होतो, डोळे दुखतात, कान दुखतात. परीक्षा ऑनलाइन होते. बरेचवेळा नेटवर्क नसल्यामुळे पेपर वेळेवर सबमिट होत नाही आणि त्या पेपरचे मार्क्स धरले जात नाहीत. आर्यन कुशवाह हा ७ वीतील विद्यार्थी म्हणाला अडचणी सोडवल्या जात नाहीत. नेटवर्क बरेच वेळा नसतं, अभ्यास बुडतो.
सुशांत जगताप या सदद्या आपल्या गावामधून इकडच्या कॉलेजच्या वर्गांना ऑनलाइन हजर होतो तो म्हणाला, खेड्यात लोकांकडे मोबाइल नाहीत याचं इथल्या लोकांना खूप दडपण येतं. विद्यार्थी शाळेत जातात म्हणून घरच्या कामांतून त्यांची सुटका होवून त्यांचा भ्यास होतो पण घरी असल्यावर त्यांना कमला जुंपलं जातं. सगळ्या विद्यार्थ्यांच्या अशाच तक्रारी होत्या. आम्हाला या ऑनलाइन वर्गा नकोत,लवकर शाळा सुरू करा हीच त्यांची इच्छा होती. राखी खैरालिया, शोभाताई तुपारे, कल्पना भोजने, सुनील दिवेकर या पालकांनी संगितले की मुले मोबाइलवर काय करतात कळत नाही. वर्ग संपल्यावर आज काय शिकलात विचारले तर काही कळले नाही असं उत्तर देतात. त्यांचे डोळे दुखतात, कान दुखतात.
दिनेश जाधव या शिक्षकांनी सांगितलं की शिक्षकांना मानधनपेक्षा समाधानाचं धन महत्वाचं असतं ते ऑनलाइन शिक्षणात मिळत नाही. या पद्धतीत ही भावनारहित निरस प्रक्रिया होते. शिक्षकांना आणि मुलांना दोघांनाही त्रास होतो त्यामुळे ही ‘सर्व शिक्षा नाही सर्वांना शिक्षा अभियान’ आहे असं वाटतं. साधारण ३५% विद्यार्थी ऑनलाइन वर्गांना उपस्थित असतात. ऑनलाइन शिक्षण म्हणजे मृगजळ आहे, शिक्षण आहे असं वाटतं, पण खरं तर होत नसतं. शिक्षक शिकवतात, मुलं शिकतात हा समज आहे आणि त्यांना समजतंय हा गैरसमज आहे.
दूसरे शिक्षक सुनील जंगले सर म्हणाले, हे ऑनलाइन शिक्षण नसून, ऑनलाइन विद्यार्थी – ऑफलाइन शिक्षण असं प्रकार आहे. सरकारने ऑनलाइन शिक्षण सुरू केलंय पण त्याची अंमलबजावणी कशी होते आहे यावर कुणाचेच लक्ष नाही. ट्रायल आणि एरर चालू आहे. मुलांचे खूप नुकसान होते आहे. रेखा पाटील या शिशु वर्गाला शिकवणार्या शिक्षिकेणा संगितले की एवढ्या लहान वयात मुलांना मोबाइल बघणे त्यांच्या डोळ्यांसाठी चांगले नाही म्हणून आम्ही गोष्टी, गाणी वगैरे अॅक्टिविटी घेतो. संस्थेच्या कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर यांनी महानगर पालिकेतील शिक्षकांशी बोलून त्यांचे म्हणणे मांडले. शिक्षकांच्या मते महानगर पालिकेत वंचित समाजातील मुले शिकतात. जेमतेम २०% मुलांकडे स्मार्ट फोन असतो. साधने नसल्यामुळे ८० ते ९० % विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले आहेत. या कोविड काळात या मुलांचे शिक्षण पूर्ण बंद आहे.
जाहिरात ------------------------------------------------------------------------
| मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र |
| जमिन खरेदी, विक्री, कुळ कायदा, भू-संपादन, वारसाहक्क, |
| जमिनीचे वाटप, बिनशेती, इनाम, वतन, नवीन शर्त जमिन, |
| दाखले, परवाने, सरकारी गृहनिर्माण सोसायटी योजना |
| इत्यादींबाबत मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन |
| दररोज दुपारी ३ ते ५ (रविवारी बंद) |
| गाळा क्र.५१, दादोजी कोंडदेव स्टेडियम, नागसेन नगर, |
| सिडको रोड, ठाणे (पश्चिम), ४०० ६०१. |
|-------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या