कोरोना महामारीमुळे ९० टक्के वकील आर्थिक संकटात

कोरोना महामारीमुळे ९० टक्के वकील आर्थिक संकटात



मुंबई
 
करोना संकटामुळे लॉकडाउनच्या कालावधीत  न्यायव्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेल्या वकीलवर्गातील हजारो कनिष्ठ वकील पुरते हवालदिल झाले आहेत. न्यायालयांतील प्रकरणांमुळे मिळणारे काम बंद, नवीन अशील मिळणे बंद, जुन्या अशिलांकडून मेहनताना मिळणे बंद, वरिष्ठांकडून मिळणारे अर्थसाह्य बंद, पर्यायी उत्पन्नाचे मार्ग बंद, अशी चौफेर आर्थिक कोंडी झाल्याने हे वकील संकटात सापडले आहेत. कायद्यानुसार वकिलीव्यतिरिक्त अन्य काहीही अधिकृतरीत्या करता येत नसल्याने किंवा कामच मिळत नसल्याने बहुतांश वकील हे कोणत्याही कामाविना घरीच बसून आहेत.  ज्यातील पावणेदोन लाख वकिलांपैकी जवळपास ९० टक्के वकील हे आज अक्षरश: बेरोजगार बनले असल्याची खंत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष  अॅड. वसंत भोसले यांनी व्यक्त केले. 


२४ मार्चला लागू झालेल्या लॉकडाउननंतर सुरुवातीच्या काळात काही दिवस मुंबई उच्च न्यायालयासह राज्यभरातील सर्वच न्यायालयांमधील कामकाज ठप्प झाले होते. कालांतराने उच्च न्यायालयात ‌'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'च्या माध्यमातून तातडीच्या व अतिमहत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी सुरू झाली. आजही तीच पद्धत सुरू आहे. कनिष्ठ न्यायालयांमध्ये लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ८ जूनपासून अत्यंत मर्यादित प्रमाणात प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. त्यात प्रामुख्याने नव्याने अटक झालेल्या आरोपींची कोठडी, करोनाच्या आधारावर आरोपींचे तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज, अशा स्वरूपाच्या तातडीच्या प्रकरणांचाच समावेश आहे. ही कामेही काही निवडक वकिलांनाच मिळत असतात. त्यामुळे विशेषत: नव्याने वकिली व्यवसायात दाखल झालेले किंवा पाच ते दहा वर्षांपर्यंतच्या वकिलीचा अनुभव असलेल्या हजारो वकिलांचा एकमेव उत्पन्नाचा मार्गच चार महिन्यांपासून बंद आहे.


मुंबईत मागच्या पाच- सहा वर्षांपासून वकिली करत असलेले मूळचे लातूरमधील अॅड. किरण काही वर्षांपासून नवी मुंबईतील नेरूळमध्ये दोन भाऊ व एका बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहतात. दोन्ही भाऊ शिकत आहेत, तर बहीण एका रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका म्हणून काम करते. फ्लॅटचे भाडे १२ हजार रुपये आहे. 'चार महिन्यांपूर्वी काम बंद झाल्यापासून पुरती आर्थिक कोंडी झाली आहे. वरिष्ठ वकिलांनी सुरुवातीच्या काळात आर्थिक साह्य केले. मात्र, सर्वांचीच प्रचंड आर्थिक कोंडी झाल्याने अधिक अपेक्षा ठेवणेही गैर ठरते. न्यायालयांचे कामकाज जवळपास ठप्प झाल्याने माझ्यासकट कित्येक नवोदित वकिलांचे खूप हाल होत आहेत. खरे तर गावी असलेल्या आई-वडिलांना नियमित पैसे पाठवायचो. परंतु, सध्या आमचीच मोठी कोंडी झाल्याने हतबल झालो आहे. तेही गावी कसेबसे दिवस काढत आहेत', अशी कैफियत अॅड. किरण यांनी मांडली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA