समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ
ठाणे
जुलै, ऑगस्ट महिन्यांचे काही दिवस कडक उन्हाचे गेल्याने यावर्षी धरणे भरणार का?, शेती करता येईल की नाही, पिण्याच्या पाण्याचे काय? ठाणे जिल्ह्यात पावसाचा सुरू असलेला लपंडाव, त्यात धरणक्षेत्रात पावसाने दिलेली ओढ यामुळे धरणांच्या पाणीपातळीत होत घट होत होती. यामुळे मुंबईसह ठाणे जिल्हावासीयांना भविष्यात पाणीचिंता भेडसावणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण भागांसह धरणांच्या क्षेत्रातदेखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने हे चित्र पूर्णत: बदलले आहे.
सध्या मोडकसागर १०० टक्के भरून वाहू लागले आहे. तसेच भातसा आणि बारवी धरणांतील पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणक्षेत्रातील पाणीसाठा ७७.८८ टक्क्यांवर पोहोचला.तर, मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठादेखील ९१.७१ टक्क्यांवर गेला आहे. तानसा धरणातील पाणीसाठ्याचीही ९२.१८ टक्के इतकी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाने या धरणांच्या क्षेत्रात असेच बरसणे सुरू ठेवल्यास ही धरणेदेखील लवकरच भरून वाहण्यास सुरुवात होईल, शहापूर तालुक्यातील सर्व धरणे भरुन वाहू लागली आहेत. भातसा धरण देखील पूर्ण भरले असून धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात सुरु करम्यात आला आहे. भातसा धरण क्रमांक-१ चे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी आमदार दौलत दरोडा, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय निमसे, मनोज विशे यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि ठाणे शहराच्या काही भागासह ग्रामीण क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील आंध्रा धरण क्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला. या धरणात सध्या ५९ टक्के पाणीसाठा आहे. या धरणात गेल्या वर्षी या दिवशी १०० टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी या धरणात १९ मि.मी. पाऊस पडला तर, बारवी धरणात शुक्रवारी ८३ टक्के पाणी जमा झाले. उल्हास नदीवरील शहाडजवळील मोहने बंधारा येथून स्टेम प्राधिकरणाद्वारे मनपा, भिवंडीच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. उल्हास नदीला कर्जतजवळ भीवपुरी येथील टाटांच्या मालकीच्या या आंध्रा धरणातून पाणी सोडले जाते. यावर्षी या धरणात केवळ ५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. उल्हास नदीच्या परिसरात पावसाचा जोर वाढल्यानंतर आंध्रात धरणात पाणीसाठा तयार होईल. आजमितीस धरणामध्ये २०२ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. बारवी धरण भरुन वाहण्याकरिता त्यामध्ये अवघा १.९५ मीटर साठा होणे बाकी आहे. तर बारवी धरणात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास ते लवकरच भरण्याचे चिन्हे दिसत आहे. शुक्रवारी या धरण परिसरात सरासरी ८६ मि.मी. पाऊस पडला.
0 टिप्पण्या