मला माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे.
अखंड कोसळणाऱ्या पावसात उभं राहून मुंबईकरांना सुरक्षित ठेवणाऱ्या माझ्या मुंबई पोलिसाचा हा फोटो सहज समोर आला म्हणून हे लिहावं वाटलं. एक मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला नक्कीच मुंबई पोलीसांवर, त्यांच्या क्षमतेवर, यंत्रणेवर, कार्यक्षमतेवर आणि तत्परतेवर पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे.
येत्या काळात येऊ घातलेल्या बिहार निवडणुकीच्या निमित्ताने मिडियाकडून सुशांतसिंग प्रकरण जास्तीत जास्त चालवलं जातं आहे, यात प्रमुख रणनीती ही मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस किंवा थेट महाराष्ट्र विरुद्ध बिहार अश्या प्रकारचं चित्र बिहारी जनतेच्या मनात तयार करून मतांची झोळी भरण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. खरंतर मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहराला गेले कित्येक दशकं सुरक्षित ठेवणारे हेच मुंबई पोलीस आहेत, मुंबईतील गँगवार संपवणारे, बॉम्ब स्फोट आणि आतंकवादी हल्ल्यांना निधड्या छातीने सामोरे जाणारे, देशातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत मुंबईत महिला सुरक्षित आहेत कारण हेच मुंबई पोलीस, देशातील सर्वात मोठे उद्योजक याच मुंबईत सुरक्षित राहतात कारण हेच मुंबई पोलीस, ऊन-वारा-पाऊस प्रसंग कोणताही असो त्या ठिकाणी पाय रोवून सामान्य मुंबईकर नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभा असणारे हेच मुंबई पोलीस आहेत. खरंतर मुंबई पोलीस हे देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच हृदयचं म्हणावं लागेल कारण जो पर्यंत मुंबई पोलीस दक्ष आहेत तो पर्यंत इथला प्रत्येक मुंबईकर सुरक्षित आहे, वेळ कोणतीही आणि कितीही अडचणीची असो.
परंतु गेले काही दिवस फक्त राजकीय गोळाबेरीज करण्यासाठी ज्या पद्धतीने मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही मीडिया, राजकारणी आणि अमृता फडणवीस सारख्या मूर्ख लोकांकडून सुरू आहे तो निंदनीय आहे. खरंतर सुशांतसिंग हा बिहारच्या प्रगतीचा मुद्दा असूच शकत नाही. बिहारसाठी उद्योग, शिक्षण, रोजगार, स्वास्थ आणि विकास हे खरे मुद्दे असायला हवेत, मुंबई पोलीस आणि सुशांतसिंग नव्हे. परंतु या सगळ्या निमित्ताने, हिंदी माध्यमांनी ज्या पद्धतीने मुंबई पोलिसांची एकूणच महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न चालवला आहे किंवा ज्या पद्धतीने एक चुकीचं चित्र देशापुढे मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या बद्दल नक्कीच मनापासून वाईट वाटतं. बरोबरीने आपल्याच महाराष्ट्रातील सत्तेसाठी तडफडणारे काही मूर्ख ज्यावेळी मुंबई सुरक्षित नाही हे जाहीरपणे बोलून दाखवतात त्यावेळी महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून नक्कीच वेदना होतात.
- योगेश जाधव
0 टिप्पण्या