जेईई-नीट परीक्षा: केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने
ठाणे
एकीकडे कोरोना महामारीमुळे केंद्र सरकार ऑनलाईन आणि व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आपले कामकाज चालवित असताना देशभरात जेईई- नीटची परीक्षा घेऊन सुमारे 25 लाख विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण केला जात आहे, या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल कांबळे, कळवा विभाग अध्यक्ष आकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात कार्याध्यक्ष शाहरुख सय्यद, समर ढोले,आदित्य करुळकर,अक्षय मोहिते,तुषार सिंह, फाहाद शेख, प्रणील कुडक आणि इतर विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी प्रफुल्ल कांबळे यांनी, देशातील अकरा राज्यांनी या परीक्षा घेऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, केंद्र सरकार हुकूमशाही वृत्तीने आपला कारभार करीत आहेत. गोरगरीब घरातील मुलांचे जीव घेण्याचा ह्या सरकारचा डाव आहे का?, असा सवाल करुन जेईई-नीटच्या परिक्षांबाबत सुप्रीम कोर्टाने केद्र सरकार व त्या त्या राज्यातील सरकार यांनी एकत्रित बैठका घेउन निर्णय घ्यावा असे निर्देश दिले आहे,पंरतु राज्यातील सरकारना विश्वासात न घेता केद्रातील भा.ज.पा.शासीत सरकारने विद्यार्थ्यांना कोरोनाच्या घशात ढकलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ही अरेरावी येथील विद्यार्थी सहन करणार नाही. ज्या प्रमाणे महाराष्ट्र सरकारने कुलगुरुंशी चर्चा करुन अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. तसेच केंद्र सरकारनेही करावे, अशी मागणी केली. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या हे आंदोलन करण्यात आले.
0 टिप्पण्या