सा.बा.वि.आणि नवी मुंबई पालिका यांच्यातील वादामुळे सायन-पनवेल महामार्गावर अंधार
नवी मुंबई
सायन पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरनाचे काम पूर्ण झाल्याने हा रस्ता खड्डे मुक्त झाला असल्याने वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र या रस्त्यावरील पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद असल्याने सुसज्ज असा रस्ता अंधारात आहे. यावर अनेक वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अंधारामुळे अपघाताची शक्यता वाढत आहे. पालिकेने रस्त्यावरील पथदिवे ताब्यात घ्यावेत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणी केली आहे. मात्र नवी मुंबई महानगर पालिकेला या रस्त्यावरील जाहीरात मालकी हक्क हवा आहे.त्यामुळे हा तिढा न सुटल्याने या रस्त्यावरील पथदिव्यांचा हस्तांतरणाचा प्रश्न तसाच आहे.
सायन-पनवेल महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात आणि लाखो प्रवासी वाहनांने प्रवास करतात. या महामार्गावर सानपाडा तुर्भे पोलिस ठाण्यासमोर संततधार पावसामुळे दरवर्षी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण होत असते. तर कधी या खड्ड्यामुळे अपघात होऊन दुचाकी स्वारांच्या जीवावर देखील बेतले आहे. त्यामुळे हे पडलले खड्डे भरण्यासाठी नवी मुंबईतील विविध राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलने करीत रस्ता बनविन्यासाठी मागण्या केल्या होत्या.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दरवर्षी रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून या रस्ताचे काँक्रीटीकरणं करण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास ८० कोटी खर्च करुन १६ महिण्यात या रस्त्याचे काँक्रीट चे काम पूर्ण केले.त्यामुळे यंदा हा रस्ता पूर्णपणे खड्डे मुक्त झाल्याने वाहन चालक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र अधारामुळे पुन्हा वाहतुक चालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
0 टिप्पण्या