ठाकूरपाडा अंगणवाडी केंद्राची दुरावस्था, वर्ष झाले प्रस्ताव धुळखात पडून
ठाकूरपाडा अंगणवाडी केंद्राची दुरावस्था, वर्ष झाले प्रस्ताव धुळखात पडून 
गळके छप्पर व भेगा पडलेल्या भिंतीमुळे बालकांच्या जीवितास धोका

 


 

शहापूर
शहापूर तालुक्यातील अघई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरपाडा अंगणवाडी केंद्राची इमारत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. या इमारतीचे छप्पर गळत असून भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याने ही इमारत कधीही कोसळू शकते त्यामुळे येथील बालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.  याबाबत येथील अंगणवाडी सेविकेने अघई ग्रुप ग्रामपंचयातीकडे तक्रार केल्याने अखेर ग्रामपंचायतीच्या प्रस्तावानुसार २३ जुलै २०१९ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शहापूर विभाग यांनी जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधकाम करणेसाठीचा प्रस्ताव उप अभियंता, बांधकाम विभाग पंचायत समिती शहापूर यांच्याकडे  पूर्ततेसाठी सादर केला परंतु  एक वर्ष उलटून देखील हा प्रस्ताव शासकीय फायलींच्या गठ्ठयात अडकून धूळ खात पडला आहे. 

 

अघई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरपाडा ही १०० टक्के आदिवासी वाडी असून येथील ठाकूरपाडा अंगणवाडी केंद्रात २० मुली तर १२ मुले असे एकूण ३२ बालके  लाभ घेत आहेत.  या अंगणवाडीची इमारत मागील १२ वर्षांपूर्वी सन २००८ साली टाटा फाऊंडेशन या संस्थेकडून बांधण्यात आली असून ती जीर्ण झाली आहे.  या इमारतीच्या भिंतींना मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. इमारतीचे छप्पर कौलारू असल्याने कौले ठिसूळ झाल्याने मागील तीन वर्षांपासून छप्पर गळत आहे. तसेच इमारतीच्या तीनही बाजूला मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. तसेच अतिदुर्गम भाग असल्याने येथे साप देखील येतात.  सर्पदंशाचा तसेच जीर्ण इमारत कधीही कोसळून बालकांची जीवितहानी होण्याचा मोठा धोका संभावत आहे. सन २०१०-११ साली अघई ग्रुप ग्रामपंचयातीने अंगणवाडी नूतनीकरण अंतर्गत या अंगणवाडीस संरक्षक भिंत व गेट बनविले. परंतू जुनी इमारत जैसी थी तशीच ठेवण्यात आली. इमारत गळत असल्याने मागील तीन वर्षांपासून पावसाळ्यात अंगणवाडी शेजारच्या गंगू बाळू कोरडे यांच्या घरात भरवली जाते. 

 

वरिष्ठ कार्यालयात निर्लेखनाचा प्रस्ताव २३ जुलै २०१९ ला पाठवला असून प्रस्ताव लवकर मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करू." 

 - विवेक एस. चौधरी, ( बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती शहापूर ) 


 

 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या