कोरोना महामारीने लाखो धारावीकरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
मुंबई (धारावी)
धारावी एक विशालकाय उद्योगनगरी म्हणून परिचित आहे. उपनगरी रेल्वेच्या डब्यात सकाळच्या वेळी न्याहरीकरिता इडली-मेंदूवडा बनविणारे अनेक कारखाने येथे आहेत. चकली, लाडू गोळ्या, बिस्कीट्स, खारे शेंगदाणे, चणे, डाळी, गुलाबजाम, पापड, लोणची इतकेच काय, अखिल मुंबईत प्रसिध्द असलेला पंजाबी घसीटराम हलवाई याचा कारखानाही धारावीतच आहे. असे एक ना अनेक उद्योगाची नगरी म्हणून धारावी नावारुपास असतानाच कोरोनाच्या महामारीने तीची दशा केली असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे धारावीची बदनामी झाल्याने ग्राहकांनी पाठ फिरवली, परिणामी सर्वच उद्योगधंद्यावर संकट आले आहे. सुमारे ५० टक्के दुकानदारांनी दुकाने रिकामी केली आहेत. बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने दुकानदार भाडेही भरू शकलेले नाहीत. येथे केवळ औषध निर्माता कंपन्या आणि थोड्याफार प्रमाणात भेटवस्तूंची मागणी होत आहे. हब ऑफ इंटरनॅशनल एक्स्पोर्ट अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोनामुळे लोक यायलाही घाबरत आहेत. येथे आतापर्यंत २७०० हून जास्त रुग्ण आढळले आहेत. मात्र, सध्या सक्रिय रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे. तरीही ग्राहक येण्यास धास्तावत असल्याने उद्योग बंद पडत आहेत..
मी सकाळी ९ वाजताच दुकानात आलो आहे. संध्याकाळचे ७ वाजले आहेत. मात्र, सकाळपासून एकही ग्राहक आलेला नाही. धारावीतील चामड्यासह इतर वस्तूंची आयात जवळपास ठप्प झाली आहे. धारावी लेदर गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सोनावणे यांनी ही वस्तुस्थिती सांगितली. येथील कुंभारवाडा मातीच्या वस्तूंसाठी मुंबईत प्रसिद्ध आहे. येथील प्रजापती सहकारी उत्पादक संघाचे अध्यक्ष कमलेश चित्रोडांनी सांगितले, नवरात्री ते दिवाळीपर्यंत आमचे दोन लाख दिवे विकले जातात. यंदा तेवढे तयारही झालेले नाहीत. कोरोनामुळे मजुरांचीही कमतरता आहे. गोदामात फिजिकल डिस्टन्सिंगमुळे मजूर एकत्र येऊ शकत नाहीत. त्यांना आरोग्यासह दंडाचीही भीती आहे. धारावीमध्ये मातीचे दिवे बनवण्याचे काम किमान दोन ते तीन महिन्यांआधी सुरू व्हायचे. मात्र, यंदा आम्ही फक्त ५० टक्के दिवे बनवू शकू.
भंगारात फेकून दिलेल्या औषधांच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या येथे स्वच्छ केल्या जातात. त्याचे आकार व रंगानुसार वर्गीकरण करुन त्या व्यवस्थित पॅक करुन पुन्हा त्यांचा नामांकित औषध कंपन्यांनाच पुरवठा केला जातो. येथील बाटल्या धुण्याच्या या उद्योगात हजारो महिला आज रोजंदारीवर काम करत होत्या. मात्र हे उद्योगही आता बंद होत असल्याने या महिलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आखातात पाठविल्या जाणाऱया एक्स्पोर्ट गारमंटचेही अनेक कारखाने अद्यापही मंदावस्थेत आहेत. लहान मुलांच्या खेळण्यांपासून, महाविद्यालयीन अभ्यासक्रमाची पुस्तके छापण्यापर्यंतचे अनेक उद्योग-कारखाने अद्यापही बंद अवस्थेत आहेत. विविध उद्योगांमध्ये व परस्परांना पूरक जोडउद्योगांमध्ये असलेल्या लाखो लोकांवर कोरोना महामारीमुळे आज बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
0 टिप्पण्या