आंदोलनाची दखल : पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मुखदर्शनाची परवानगी
पंढरपूर
मंदिरे सुरू करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मुखदर्शनाची परवानगी देत सरकारनं लवकरच मंदिरं खुली करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील सर्वसामान्य वारकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. 'मला आणि 15 जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आले. मंदिरं खुली करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. लोकांच्या भावनेचा आदर केल्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. आपण आठ ते दहा दिवस थांबू, दहा दिवसात आदेश आले नाही तर पुन्हा पंढरपुरात येणार,' असेही आंबेडकर म्हणाले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला विशिष्ट कालावधीनंतर प्रकाश आंबेडकरांनी विरोध सुरू केला होता. लोकांनी बिनधास्त नातेवाईकांना भेटावे. नेहमीप्रमाणे कामे करावीत, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मोबाइलवर सतत वाजणाऱ्या करोनाच्या कॉलर ट्यूनलाही विरोध करत त्यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्याच भूमिकेच्या अनुषंगानं त्यांनी राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी केली होती. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि वारकऱ्यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिराबाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र, त्याआधीच प्रकाश आंबेडकर यांच्यासह १५ जणांना नियम पाळून मुखदर्शनाची परवानगी देण्यात आली.यावेळी प्रकाश आंबेडकरांनी काही वारकऱ्यांसोबत मंदिरात जाऊन विठुमाऊलीचे दर्शन घेतले. 'मला मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या आठ दिवसात नियमावली जाहीर करुन राज्यातील मंदिरे, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिर सुरू केली जाणार आहे, अशी माहिती आंबेडकरांनी दिली.
'आम्ही नियम मोडण्यासाठीच इथे आलो आहोत. मंदिरे उघडण्यासाठीच ही गर्दी जमली आहे. मंदिरे खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत नाही, हेच आम्हाला सरकारला दाखवायचे आहे. कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, 'आम्ही रस्त्यावर लढणारी माणसे आहोत, पुन्हा या प्रश्नांवर आम्हाला लढायला लावू नका. इथले जिल्हाधिकारी, पोलिस कार्यालय यांनी जी भूमिका घेतली त्याबाबद्दल मी जाहीर अभिनंदन करतो. आपले आंदोलन या ठिकाणी थांबवतोय. ज्या शांतपणे आपण सहकार्य केले, त्याच पद्धतीने तुम्ही गावाला जा, 10 दिवसांनंतर पुन्हा यावे लागले तर तयारी ठेवा,'असेही आंबेडकर म्हणाले.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनावर संजय राऊत म्हणाले की, ' 'पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी फक्त तिथे जमलेले आंदोलकच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आसूसलेला आहे. पण सोशल डिस्टन्सिंग हा कोरोना काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मंदिर बंद ठेवणे हे कोणी आनंदाने करत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकार हे टप्प्याटप्याने अनेक गोष्टी सुरू करत आहे. लवकरच मंदिरांचा विचार करण्यात येईल. प्रकाश आंबेडकरांसारख्या प्रमुख नेत्याच्या मागे अख्खा समाज आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी किंवा गृहमंत्र्यांशी चर्चा करावी. पण अशाप्रकारे विठ्ठल मंदिराच्या बाहेर लोकांना वेठीस धरू नये. तसेच महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारताना दिसत आहे कोरोनासंदर्भात त्यात पुन्हा तणाव निर्माण करू नये', असेही संजय राऊत म्हणाले.
0 टिप्पण्या