फिरत्या हौदावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप

फिरत्या हौदावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपपुणे 


राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच पुण्यात विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या हौदावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हे फिरते हौद म्हणजे कचरा कुंड्याच असल्याचा गंभीर आरोप करत विसर्जन बंद पाडण्यात आले होते. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी या मुद्यावरून महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांनाच उचलून नेले आणि हे आंदोलन हाणून पाडले.  विसर्जनासाठी वापरण्यात येणारे फिरते हौद हे कचरा कुंड्या असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ भलतेच संतापले आहेत. महापौरांनी थेट कचराकुंडी आणि फिरते हौद समोरासमोर आणून विरोधकांना प्रतिउत्तर देत खोटे पाडले.


विसर्जनाच्या पावित्र्य भंगाचा गंभीर आरोप झाल्याने महापौरांनी थेट कचरा कुंडी आणि फिरते हौदाच्या गाड्याच माध्यमांसमोर उभ्या केल्या. आयुक्तांनाही त्यासाठी सोबत घेतले. गणेश विसर्जनासारख्या पवित्र विषयावरून विरोधक घाणेरडे राजकारण करत असल्याचा पलटवार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला.  महापौरांचे आरोप मनसेने फेटाळून लावले आहेत. आधी पुणेकरांना महापौरांनी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मग बोलावे असा प्रत्यारोप मनसेचे नेते बाबु वागसकर यांनी केला आहे. पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावेळी नदीपात्रातील विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. पण मग विसर्जनाला पर्याय काय असा सवाल विरोधकांनी करताच पालिकेने फिरते हौद पुढे केले आणि याच फिरत्या हौदांवरून राजकारण पेटले आहे.
दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुण्यातील जुन्नर तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेला नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायत परिसर के असून २७ ऑगस्टपासून या भागात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय तहसीलदारांनी घेतला आहे. यामुळे या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन पाचव्या दिवशीच करून प्रशासनाला सहकार्य करावे. असे अवाहन नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी केले आहे.

लोकसंख्येची जास्त घनता असलेली तालुक्यातील नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायत परिसर मार्च ते जून दरम्यान कोरोनामुक्त ठेवण्यात येथील ग्रामपंचायत, आरोग्य व पोलिस प्रशासनाला यश आले होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मागील दीड महिन्यांत या परिसरात सुमारे १३० कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच मागील दोन दिवसांत या भागात ३६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या